Sun, Feb 23, 2020 17:32होमपेज › Kolhapur › रस्ते, इमारतींसाठी 155 कोटींची मागणी

रस्ते, इमारतींसाठी 155 कोटींची मागणी

Published On: Aug 20 2019 1:45AM | Last Updated: Aug 20 2019 1:45AM
कोल्हापूर : सुनील सकटे 

कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात नुकत्याच आलेल्या महापुराने रस्ते आणि शासकीय इमारतींनाही मोठा फटका बसला आहे. या दोन्ही जिल्ह्यांतील रस्ते मोठ्या प्रमाणात खराब झाले आहेत; तर शासकीय कार्यालयांचेही मोठे नुकसान झाले आहे. पुराने झालेल्या नुकसानीबाबत  शासनाने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे माहिती मागविली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यांसाठी 142 कोटी 25 लाख सात हजार आणि कोल्हापुरातील इमारतीसाठी 12 कोटी 52 लाख 25 हजार रुपयांची मागणी केली आहे. 

कोल्हापूर जिल्ह्यातील राज्य महामार्ग, प्रमुख जिल्हा मार्ग असे एकूण 180 रस्ते खराब झाले आहेत. 16 रस्त्यांवर दरड कोसळल्या असून त्यासाठी तीन कोटी 17 लाख सात हजार रुपयांचा प्रस्ताव आहे. 17 ठिकाणी रस्ते मोर्‍या, पुलाचा पोच भाग वाहून गेल्याने दोन कोटी 56 लाख 95 हजार रुपयांची गरज आहे. 73 पूल व बंधारे खराब झाले आहेत. त्यासाठी 14 कोटी 86 लाख चार हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. 29 ठिकाणी संरक्षण भिंती ढासळल्या असून त्यासाठी सात कोटी 30 लाख 56 हजार रुपये खर्च आहे. 22 रस्ते खचले असून ते दुरुस्त करण्यासाठी 51 कोटी 31 लाख 20 हजार रुपये खर्च येणार आहे. 23 रस्त्यांचा पृष्ठभाग वाहून गेला आहे. त्याच्या दुरुस्तीसाठी सहा कोटी 17 लाख 50 हजार रुपयांची गरज आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील रस्ते, पूल, मोर्‍या, संरक्षक भिंती आदीसाठी 85 कोटी 39 लाख 32 हजार रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

सांगली जिल्ह्यातील राज्य महामार्ग, प्रमुख जिल्हा मार्ग असे एकूण 120 रस्ते खराब झाले आहेत. चार रस्त्यांवर दरडी कोसळल्या असून त्यासाठी सात कोटी 25 लाख  रुपयांचा प्रस्ताव आहे. तीन ठिकाणी रस्ते मोर्‍या, पुलाचा पोच भाग वाहून गेल्याने 95 लाख रुपयांची गरज आहे. 45 पूल व बंधारे खराब झाले आहेत. त्यासाठी 10 कोटी 11 लाख 75 हजार रुपये खर्च अपेक्षित आहे.  15 ठिकाणी संरक्षण भिंती ढासळल्या असून त्यासाठी दोन कोटी 94 लाख 50 हजार रुपये खर्च आहे. पाच रस्ते खचले असून ते दुरुस्त करण्यासाठी 37   कोटी 62  लाख 25 हजार रुपये खर्च येणार आहे. 48 रस्त्यांचा पृष्ठभाग वाहून गेला आहे. त्याच्या दुरुस्तीसाठी 37 कोटी 62 लाख 25  हजार रुपयांची गरज आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील रस्ते, पूल, मोर्‍या, संरक्षक भिंती आदीसाठी 56 कोटी 85 लाख 75 हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. 

कोल्हापूर जिल्ह्यातील  शासकीय कार्यालयांच्या 61 इमारतीना पुराचा फटका बसला आहे. त्याच्या दुरुस्तीसाठी आठ कोटी 29 लाख 75 हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. यामध्ये कायमस्वरूपी दुरुस्तीसाठी सात कोटी 59 लाख 75 हजार रुपये आणि तात्पुरत्या दुरुस्तीसाठी 70 लाख रुपयेे खर्च येणार आहे. तर कर्मचारी अधिकारी निवासस्थानाच्या 28 इमारतींना पुराची झळ बसली आहे. त्याच्या दुरुस्तीसाठी चार कोटी 21 लाख 50 हजार रुपये खर्च येणार आहे.  यामध्ये कायमस्वरूपी तीन कोटी 21 लाख 75 हजार रुपये खर्च येणार आहे. तर तात्पुरती दुरुस्तीकरिता 99 लाख 75 हजार रुपये खर्च येणार आहे.