Thu, Apr 25, 2019 03:45होमपेज › Kolhapur › दिल्‍लीचा कृष्णकुमार  ‘जनसुराज्यशक्‍ती श्री’

दिल्‍लीचा कृष्णकुमार  ‘जनसुराज्यशक्‍ती श्री’

Published On: Dec 14 2017 2:18AM | Last Updated: Dec 14 2017 1:30AM

बुकमार्क करा

वारणानगर : प्रकाश मोहरेकर

क्षणाक्षणाला उत्कंठा वाढविणारी आणि कुस्तीशौकिनांना श्‍वास रोखून धरायला लावणार्‍या कुस्तीत दोन गुणांची आघाडी घेत भारत केसरी जास्सा पट्टी याला हिंदकेसरी कृष्णकुमारने हरवून प्रथम क्रमांकाची लढत जिंकत मानाचा ‘जनसुराज्यशक्‍ती श्री’ किताब पटकाविला. द्वितीय क्रमांकाच्या  प्रेक्षणीय  लढतीत जोगींदरसिंहला एकचाक डावावर चितपट करत हिंदकेसरी गुरुसाहेब साबाने मानाचा दूध-साखर शक्‍ती किताब पटकाविला. तृतीय क्रमांकाच्या लढतीत दिल्लीच्या अजय गुज्जरने पाचव्या मिनिटाला समोरून हप्ता मारून लपेट डावावर पाचव्या मिनिटाला पुण्याच्या किरण भगतला आस्मान दाखवून कुस्तीशौकिनांची मने जिंकली.

श्री वारणा सहकारी विविध उद्योग व शिक्षण समूह आयोजित व भारतीय कुस्ती संघ, राज्य कुस्तीगीर परिषद व कोल्हापूर जिल्हा व शहर राष्ट्रीय तालीम संघाच्या मान्यतेने सहकारमहर्षी तात्यासाहेब कोरे यांच्या तेवीसाव्या पूण्यस्मरणार्थ लाल मातीतील निकाली कुस्त्यांचा ‘वारणा कुस्ती महासंग्राम’ अत्यंत प्रेक्षणीय लढतीत पार पडला.

या मैदानात ‘जनसुराज्यशक्‍ती श्री’ किताबासाठीची प्रथम क्रमांकाची लढत पंजाबच्या पिद्दी आखाड्याचा हिंदकेसरी जास्सा पट्टी व सोनीपतचा हिंदकेसरी पै. कृष्णकुमार यांच्यात झाली. प्रथमपासून दोन्ही मल्लांनी आक्रमक खेळ करीत एकमेकांचे डाव-प्रतिडाव उलथवून लावले. दोघेही देशातील लाल मातीतील प्रथम क्रमांकाचे मल्ल असल्याचे सिद्ध केले. सुमारे 25 मिनिटे ही कुस्ती झाली. शेवटी ती पाच मिनिटांच्या गुणावर घेण्यात आली. यापैकी दोन गुणांची आघाडी घेत कृष्णकुमारने ही कुस्ती जिंकून या मैदानातील प्रथम क्रमांकाची कुस्ती जिंकली. या कुस्तीसाठी राष्ट्रीय पंच म्हणून संभाजी वरूटे यांनी काम पाहिले.ं 

 वारणा साखर शक्‍ती श्री किताबासाठी द्वितीय क्रमांकाची कुस्ती देशातील अव्वल हिंदकेसरी साहेबसिंग साबा विरुद्ध चांदरूप आखाड्याचा हिंदकेसरी जोगींद्रसिंह यांच्यात तब्बल 32 मिनिटे झाली. शेवटी डॉ. विनय कोरे यांनी राष्ट्रीय नियमाप्रमाणे नाणेफेक करून एकमेकांना डाव देण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. यामध्ये जोगिंदरने प्रथम डाव दिला. त्यानंतर साबाने दिला मात्र शेवटच्या काही मिनिटांत आक्रमक खेळ करीत एकचाक डावावर जोगींदरला आस्मान दाखवून गुरुसिंह साबाने ही कुस्ती जिंकून प्रेक्षकांची वाहवा मिळविली. याच साबाने 2015 च्या मैदानात रुबलवर मात करून प्रथम क्रमांकाची कुस्ती जिंकली होती.

तृतीय क्रमांकासाठीची कुस्ती पुण्याचा राष्ट्रीय विजेता किरण भगत विरुद्ध दिल्लीचा राष्ट्रीय विजेता अजय गुज्जर यांच्यातील कुस्ती प्रेक्षणीय झाली पहिल्यापासून दोन्ही मल्लांनी आक्रमक खेळ करीत केला. गुजरने  भगतचा ताबा घेतला आणि चौथ्या मिनिटाला समोरून हप्ता मारून लपेट डावावर किरण भगतला आस्मान दाखवून या मैदानातील मानाचा तात्यासाहेब कोरे दूध-वाहतूक शक्‍ती किताब जिंकला. 

वारणा दूध संघ शक्‍ती किताबासाठीच्या लढत  महाराष्ट्र केसरी माऊली जमदाडे विरुद्ध उत्तरप्रदेश केसरी गोपाल यादव यांच्यात झाली. अत्यंत आक्रमक असलेल्या कुस्तीत पाचव्या मिनिटाला माऊली जमदाडेने नौदळ काढून घिस्सा डावावर गोपाल यादवला आस्मान दाखविले. ही कुस्तीने प्रेक्षकांच्या डोळ्याचे पारणे फेडले. वारणा ट्रॅक्टर वाहतूक शक्‍ती किताबासाठीच्या लढतीत महाराष्ट्र केसरी जखमी झाल्याने कर्नाटक केसरी कार्तिक काटेला विजयी घोषित करण्यात आले. 

वारणा बँक शक्‍ती किताबासाठी  न्यू मोतीबागचा बाला रफिक व  हरियाणाचा भोला यांच्यात तब्बल 22 मिनिटे खडाखडी झाली. अखेर बाहेरून आकडी लावत बाला रफिकला शेवटी आक्रमक झालेल्या प्रवीण भोलाने घुटना डावावर  चितपट केले.ईडीएफ मान शक्‍ती किताबासाठी भारत मदने आणि हरियाणा केसरी शिवराज राक्षे यांच्यात अत्यंत आक्रमक लढत झाली. पाचव्या मिनिटाला निकाल डावावर शिवराज राक्षेने मदनेला आस्मान दाखवून विजय प्राप्त केला. 

शेतीपूरक शक्‍ती किताबासाठी लढतीत कौतुक डफळे खेळताना जखमी झाल्याने राष्ट्रीय विजेता लवप्रितला विजयी घोषित करण्यात आले. बिल्ट्युब शक्‍ती किताबासाठी च्या लढतीत राष्ट्रीय विजेता विलास डोईफोडेने झोळी डावावर योगेश बोंबाळेला चितपट केले. वारणा शिक्षण मंडळ शक्‍ती किताबासाठीच्या लढतीत गणेश जगतापला गुणावर चितपट करून संतोष दोरवड विजयी झाला. कोल्हापूरच्या संग्राम पाटीलला घुटना डावावर चितपट करून गोकुळ आवरेने दूध कामगार संघटना शक्‍ती किताब जिंकला. या दोन्ही प्रेक्षणीय लढती झाल्या.

या मैदानात शक्‍ती किताबाच्या 15 आणि पुरुस्कृत 27  लढती झाल्या. विजेत्या मल्लांना रोख रक्‍कम व स्मृतिचिन्ह देऊन वारणा समूहाचे प्रमुख व माजी मंत्री विनय कोरे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. तर 30 किलो ते 96 किलो वजन गटातील 236 कुस्त्यांसह एकूण 278 कुस्त्या कुस्तीशौकिनांना पाहण्यास मिळाल्या.

महत्त्वाच्या लढती (प्रथम विजयी) सचिन जामदार वि.वि. अंकीतकुमार, शिवाजी पाटील वि.वि. अशोककुमार, दत्ता नरळे वि.वि. विक्रम वडतिले,  नाना ठोंबरे वि.वि. मनोजकुमार, प्रशांत माने वि. वि. बल्लू, सुधाकर गुंड वि.वि राजाराम यमगर, राहुल मोरे वि. वि.राहुल सरग, जयपाल वाघमोडे वि.वि.पांडुरंग मांडवे, संतोष जगताप  वि. वि. रामदास पवार, संदीप काशीद वि. वि.सुनील शेवलकर, नाथा पालवे वि.वि.अनिल धोत्रे, प्रवीण सरग संतोष लवटे, गुलाब आगरकर वि.वि.सतीश मुडे, विकास बंडगर, नवनाथ इंगळे, सचिन केचे वि.वि. कपील सनगर, शुभम सिदनाळे वि.वि.गणेश तांबे. सोनू सोनटक्के वि.वि. जालंदर म्हारुगडे, बाळासो पुजारी वि.वि.अजय निकम, नामदेव केसरे वि.वि हणमंत शिंदे, ऋषिकेश पाटील वि.वि. विव्क नायकल, अभिजित भांगे वि. वि.अंकुश माने, सौरभ पाटील वि. वि. विपूल गुंडगे, धनाजी पाटील वि.वि.अक्षय गरूड, अजित पाटील वि.वि. शिवाजी तांबवे, नाथा पवार वि.वि. सौरभ रेडेकर.

वारणा विद्यालयाच्या पटांगणावर खास तयार करण्यात आलेल्या कुस्ती मैदानात युवा नेते विश्‍वेश कोरे, जोतीरादित्य कोरे व वारणा साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रतापराव पाटील यांच्या हस्ते मैदानाचे पूजन झाले. शिवाय कुस्तीशौकिनांना बसण्यासाठी खास गॅलरीची व्यवस्था करण्यात आली होती.  प्रेक्षणीय लढती पाहण्यासाठी लाखोंच्या संख्येने कुस्तीशौकीन उपस्थित होते. 

लाईट इफेक्टस्... फायरशॉटस्...आणि जल्लोषी उत्साह...

रिओ ऑलिम्पिक स्पर्धांच्या धर्तीवर वापरले जाणारे लाईट  इफेक्टस् व फायरशॉटस् व अद्ययावत ध्वनियंत्रणा यावर्षी वारणेच्या कुस्ती मैदानात प्रथमच वापरण्यात आली होती. त्यामुळे कुस्तीशौकिनांत क्षणोक्षणी मोठा उत्साह संचारला.  कुस्तीचे धावते वर्णन अत्यंत प्रभावी भाषेत शंकर पुजारी, ईश्‍वर पाटील यांनी केले. कुस्त्या पाहण्यासाठी महाराष्ट्र, कर्नाटक राज्यासह कुस्तीशौकीन मोठ्या संख्येने उपस्थित होते. गेली एकवीस वर्षे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय मैदान भरवणारे माजी मंत्री विनय कोरे यांचा ज्येष्ठ मल्ल रावसाहेब मगर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मोठ्या कुस्त्यांचे पंच म्हणून संभाजी वरूटे, संग्राम पोळ, संभाजी पाटील यांनी काम पाहिले.