Mon, Mar 25, 2019 13:15होमपेज › Kolhapur › देशातील औद्योगिक उत्पादनात घट?

देशातील औद्योगिक उत्पादनात घट?

Published On: Jul 19 2018 1:37AM | Last Updated: Jul 18 2018 11:31PMकोल्हापूर : विशेष प्रतिनीधी

भारतात अपुरा भांडवल पुरवठा आणि व्याजदर वाढीमुळे औद्योगिक उत्पादनावर नकारात्मक परिणाम होऊ लागला आहे. नोटाबंदी आणि जीएसटीतून औद्योगिक क्षेत्र पूर्णपणे बाहेर येण्याच्या मार्गावर असतानाच महाग भांडवलाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. भांडवल पुरवठा वाढला नाही तर आगामी काळातही औद्योगिक उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता असोसिएटेड चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री ऑफ इंडिया (अ‍ॅसोचेम) या देशातील व्यापार क्षेत्रातील शिखर संस्थेने वर्तविली आहे. 

देशात मे महिन्यात औद्योगिक उत्पादन केवळ 3.2 टक्क्यांनी वाढले आहे. हा 7 महिन्यांचा नीचांक आहे. या महिन्यात मॅन्युफॅक्चरिंग आणि ऊर्जा क्षेत्राची उत्पादकता बरीच घसरली आहे. एप्रिल महिन्यात औद्योगिक उत्पादन 4.8 टक्क्यांनी वाढले होते. तर गेल्यावर्षी मे महिन्यात औद्योगिक उत्पादन 2.9 टक्क्यांनी वाढले होते. यावर्षी एप्रिल ते मे या काळात औद्योगिक उत्पादन 4.4 टक्क्यांनी वाढले आहे. गेल्या वर्षी या काळात औद्योगिक उत्पादन 3.1 टक्क्यांनी वाढले होते. मे महिन्यात मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राची उत्पादकता केवळ 2.8 टक्क्यांनी वाढली आहे. गेल्यावर्षी या क्षेत्राची उत्पादकता 2.6 टक्क्यांनी वाढली होती. ऊर्जा क्षेत्राची उत्पादकता वाढण्याऐवजी 5.7 टक्क्यांनी कमी झाली आहे. मे महिन्यात सर्वात खराब कामगिरी ग्राहक वस्तू क्षेत्राने केली आहे. याकडे ‘अ‍ॅसोचेम’ने लक्ष वेधले आहे. 

उद्योग क्षेत्राला अगोदरच भांडवलाचा पुरवठा कमी होत होता. बँका अडचणीत असल्यामुळे आणखी भांडवलाचा पुरवठा कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी काळात भांडवल पुरवठ्याच्या अभावामुळे औद्योगिक उत्पादन आणखी कमी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सेवा क्षेत्राच्या उत्पादकतेवर फारसा परिणाम होण्याची शक्यता कमी आहे. मात्र, या क्षेत्रातून तुलनेने कमी रोजगार निर्मिती होते. त्यामुळे औद्योगिक क्षेत्राची उत्पादकता वाढविण्यावर आगामी काळात भर देण्याची गरज असल्याचे औद्योगिक संघटनांचे मत आहे.