Tue, Feb 19, 2019 08:41होमपेज › Kolhapur › निलंबित सहायक फौजदार कुरळपकरला फरारी घोषित करा

निलंबित सहायक फौजदार कुरळपकरला फरारी घोषित करा

Published On: Dec 24 2017 1:44AM | Last Updated: Dec 24 2017 12:28AM

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

वारणानगर (ता. पन्हाळा) येथील शिक्षक कॉलनीतील 9 कोटी 18 लाख रुपयांच्या चोरीतील संशयित व सांगली पोलिस दलातील निलंबित सहायक फौजदार शरद कुरळपकरला फरारी घोषित करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.‘सीआयडी’कडून येत्या मंगळवारी पन्हाळा न्यायालयात अर्ज दाखल करण्यात येत आहे.

वारणानगर चोरीप्रकरणी संशयित व निलंबित पोलिस अधिकारी विश्‍वनाथ घनवट, सूरज चंदनशिवेसह सहा पोलिसांना अटक होऊन पाच महिने झाली; पण कुरळपकर तपास यंत्रणांना चकवा देत फरारी आहे. त्याच्या अटकेसाठी ‘सीआयडी’ने कोल्हापूर-सांगली, सातारा, पुणे, सोलापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरीसह कर्नाटक व गोव्यात शोधमोहीम राबविली; मात्र अद्यापही सुगावा लागला नाही.

अन्य संशयितांच्या अटकेसह संबंधिताविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण होऊनही कुरळपकरचा छडा न लागल्याने ‘सीआयडी’च्या वरिष्ठाधिकार्‍यांनी घटनेची दखल घेतली आहे. कुरळपकरला फरारी घोषित करण्यासाठी न्यायालयीन प्रक्रिया राबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

अप्पर पोलिस अधीक्षक नरेंद्र गायकवाड यांनी त्यास दुजोरा दिला. कुरळपकरला फरारी घोषित करण्याच्या मागणीसाठी मंगळवारी पन्हाळा येथील न्यायालयात अर्ज दाखल करण्यात येईल. याबाबत विधी सल्ला अधिकार्‍यांशी चर्चाही करण्यात आली आहे. त्याच्या स्थावर मालमत्तेवर टाच आणण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू झाली आहे, असेही गायकवाड यांनी सांगितले.

निलंबित पोलिस अधिकारी विश्‍वनाथ घनवट, रवींद्र पाटील, शंकर पाटील, मैनुद्दीन मुल्ला यांनी जामिनासाठी पन्हाळा न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. त्यावर 1 जानेवारीला सुनावणी होणार आहे, असेही ते म्हणाले.