Fri, May 24, 2019 09:17होमपेज › Kolhapur › बारावी उत्तरपत्रिकांचे गठ्ठे परत

बारावी उत्तरपत्रिकांचे गठ्ठे परत

Published On: Mar 13 2018 1:42AM | Last Updated: Mar 12 2018 10:47PMकोल्हापूर : प्रतिनिधी

प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित उच्च माध्यमिक शाळा कृती समितीच्या वतीने सोमवारी कोल्हापूर विभागीय शिक्षण मंडळाच्या कार्यालयासमोर घोषणाबाजी करीत निदर्शने करण्यात आली. विनाअनुदानित शिक्षकांनी बारावीच्या उत्तरपत्रिकांचे 50 ते 60 गठ्ठे बोर्डास परत केले. सुमारे 20 हजार उत्तरपत्रिका तशाच गठ्ठ्यांत सीलबंद पडून आहेत.

विनाअनुदानित शिक्षक अत्यल्प वेतन व काही ठिकाणी विनावेतन काम करीत आहेत. आजपर्यंत 210 आंदोलने झाली. मात्र, सरकारने विनाअनुदानित शाळांतील शिक्षकांनी वारंवार आंदोलने करूनही लक्ष दिलेले नाही. या शिक्षकांना कुटुंब चालविण्यासाठी शेतमजुरी, गवंडी काम, वेटरची कामे करावी लागत आहेत. कृती समितीच्या आंदोलनामुळे या शाळांचे मूल्यांकन होऊनही अनेक शाळा अपात्र ठरविण्यात आल्या. राज्यातील 123 शाळा व 23 शाळांच्या वाढीव तुकड्या अशाप्रकारे 146 शाळा अनुदानासाठी पात्र म्हणून घोषित करण्यात आल्या.  

अनेक शाळांना अपात्रतेच्या कारणामध्ये शाळांना शासन परवानगी पत्र नाही, असे स्पष्ट केले गेले. घोषित शाळांच्या अनुदानाबाबत कोणताच निर्णय घेतलेला नाही. म्हणून विनाअनुदानित शिक्षकांनी बोर्ड परीक्षा कामकाजावर बहिष्कार टाकला आहे. सोमवारी (दि. 12) दुपारी एकच्या सुमारास कृती समितीचे पदाधिकारी बोर्डाच्या कार्यालयात बारावी उत्तरपत्रिकांचे सीलबंद गठ्ठे घेऊन एकत्र जमले. त्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली. यावेळी बोर्डाच्या प्रभारी अध्यक्षा अनुपस्थित होत्या. त्यानंतर विनाअनुदानित शिक्षकांनी बोर्डाच्या कार्यालयात जाऊन संबंधित विभाग अधीक्षकांकडे उत्तरपत्रिकांचे  गठ्ठे परत केले. आंदोलनात रत्नाकर माळी, जयसिंग जाधव, पी. जे. चौधरी, चंद्रकांत कांबळे, के. आर.पाटील यांच्यासह शिक्षक, शिक्षिका सहभागी झाल्या होत्या.