Wed, Mar 27, 2019 00:02होमपेज › Kolhapur › वादावर पडदा, दुखणे कायम...

वादावर पडदा, दुखणे कायम...

Published On: Mar 24 2018 1:49AM | Last Updated: Mar 23 2018 10:14PMकोल्हापूर : प्रतिनिधी 

अंगणवाडी इमारत बांधकाम दुरुस्ती यादी नव्याने करण्याचे निश्‍चित झाल्याने वादावर पडदा पडला आहे, पण लोकप्रतिनिधींचा मान, महिला सदस्यांच्या कारभार्‍यांचा वाढता हस्तक्षेप, अधिकारी व कर्मचार्‍यांची बेफिकिरी हे प्रश्‍न कायम असल्याने तात्पुरता वाद मिटला तरी मूळ दुखणे कायम राहिले आहे. ही जखम ठसठसत राहणे जिल्हा परिषदेच्या विकासाच्या द‍ृष्टीने अडचणीचे असल्याने यावर वेळीस इलाज करण्याची गरज आहे. 

अंगणवाडी इमारत बांधकाम व दुरुस्तीसाठी नियोजन मंडळाकडून 5 लाख 11 हजार रुपये मंजूर झाले होते. त्यात 63 बांधकामे, 488 दुरुस्त्या, 75 शौचालये अशी कामे करावयाची होती.58 प्रस्तावांना मतदारसंघनिहाय  प्रत्येकी एक तर उर्वरित पटसंख्या निकष लावून याद्या तयार करण्यात आल्या. या कामांना मान्यता देताना महिला बालकल्याण सभापती शुभांगी शिंदे यांना विश्‍वासात घेतले नसल्याचे सांगत सदस्यांनी गुरुवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत प्रचंड गोंधळ घातला होता. उपमुख्य कार्यकारी अधिकारी सोमनाथ रसाळ यांना सक्‍तीच्या रजेवर पाठवण्याचे आश्‍वासन देऊन गोंधळ शमवण्यात आला होता. 

सभा संपल्यानंतर सर्व अधिकार्‍यांनी अध्यक्ष शौमिका महाडिक यांची भेट घेऊन अशाप्रकारे दमदाटी करणार असाल तर सर्वच जण सामूहिक रजेवर जातो असे सांगत आपली कैफियत मांडली. महिला बालकल्याणमधील कर्मचार्‍यांनीही सीईओ डॉ. कुणाल खेमनार यांच्याकडे जाऊन पदाधिकार्‍यांकडून आपल्यावर येणार्‍या दबावाचे कथन केले. अध्यक्ष महाडिक यांनी यातून झालेला प्रकार गैरसमजातून झाला असल्याने येथून पुढे याची चर्चा बंद करून वादावर पडदा पडल्याचे जाहीर केले. उपमुख्य कार्यकारी अधिकारी सोमनाथ रसाळ यांना सक्‍तीच्या रजेवर न पाठवता कामावर हजर होण्यास सांगण्यात आले. 

लोकप्रतिनिधी म्हणून आपल्यालाही मान असावा अशी सदस्यांची रास्त अपेक्षा आहे, पण जि.प. तील काही अधिकारी, कर्मचार्‍यांकडून या अपेक्षेला वारंवार तडा दिला जातो. या प्रकरणातही आपल्यामार्फत प्रस्ताव यावेत, अशी सदस्यांची अपेक्षा होती, पण बांधकामचे शाखा अभियंता, अंगणवाडी पर्यवेक्षिका यांच्याकडून प्रस्ताव आल्याने त्यांचा अपेक्षाभंग होणे साहजिकच आहे. 

कारभार्‍यांचा वाढता हस्तक्षेप

महिला बालकल्याण समितीमध्ये सभापतीपासून सदस्यांपर्यंत सर्व महिलाच असल्याने त्यांचे नातेवाईक विशेषतः पतींच्या हस्तक्षेपाचा मुद्दा उफाळून वर येतो. याविरोधात कर्मचार्‍यांनीही वरिष्ठांकडे तक्रारी केल्या आहेत. सदस्यांपेक्षा  कारभार्‍यांनाच प्रत्येक गोष्ट विचारावी लागत असल्याने अधिकारीही वैतागले आहेत. 

असाही दुटप्पीपणा

जिल्हा परिषदेत महिला लोकप्रतिनिधींचा अपमान करणार्‍या अधिकार्‍यावर कारवाई करावी यासाठी गुरुवारी सभागृहात सदस्यांनी आक्रमक भूमिका घेतली. पण, हीच भूमिका महिला सभापती म्हणून काम करत असलेल्या पंचायत समितीत या सदस्यांची असत नाही. हातकणंगले पंचायत समितीच्या सभापतींना तेथील गटविकास अधिकारी शरदचंद्र माळी यांची बदली करावी यासाठी जि.प. अध्यक्ष, सीईओ, पालकमंत्री, मुख्यमंत्र्यांपर्यंत उंबरठे झिजवले तरी काही जि.प. सदस्यांनी माळी यांची पाठराखण सुरूच ठेवली आहे.

Tags : Kolhapur, Kolhapur News, Decide, revamp, the anganwadi, building repair list