होमपेज › Kolhapur › विद्यार्थीदशेतच करिअरची ब्ल्यू प्रिंट करा : विश्‍वास नांगरे-पाटील

विद्यार्थीदशेतच करिअरची ब्ल्यू प्रिंट करा : विश्‍वास नांगरे-पाटील

Published On: Mar 16 2018 12:45AM | Last Updated: Mar 15 2018 11:07PMगडहिंग्लज : प्रतिनिधी

आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल करिअरची दिशा विद्यार्थिदशेतच ठरवा. यासाठी याच कालावधीत त्याची ब्ल्यू प्रिंट तयार करा आणि मग वाटचाल करा, असा सल्‍ला कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांनी दिला. येथील केदारी रेडेकर फौंडेशनच्या वतीने आयोजित ‘संवाद ध्येयवेड्यांशी’ या व्याख्यानात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी रेडेकर समूहाच्या अध्यक्षा अंजनाताई रेडेकर होत्या. स्वागत समूहाचे सचिव प्रा. सुनील शिंत्रे यांनी केले.

 संकेश्‍वर रोडवरील म. दू. श्रेष्ठी विद्यालयाचे पटांगण तरुण-तरुणींनी खचाखच भरले होते. यावेळी नांगरे-पाटील म्हणाले, आज पालक, विद्यार्थी, मित्र, नातेसंबंध यांच्यामध्ये मौखिक संवाद हरपत असून सोशल मीडियावरच एकमेकांशी गप्पा सुरू आहेत. त्याचाच परिणाम म्हणून किशोरवयीन मुलांमध्ये हिंसात्मक बाबी वाढत आहेत. गडहिंग्लज ही शूरवीरांची भूमी असून येथे शौर्याची प्रतीके विद्यार्थ्यांना नवं काही तरी घडविण्यासाठी ऊर्जा देत आहेत. विद्यार्थीदशेतील आराम म्हणजे स्वतःवर गंज चढवून घेण्यासारखे आहे. त्यामुळे याकडे गांभीर्याने पाहून शर्यत जिंका, असेही त्यांनी सांगितलेे. संस्था समूहाचे उपाध्यक्ष अनिरुद्ध रेडेकर यांनी आभार मानले.  नांगरे-पाटील यांचे संवाद ध्येयवेड्यांशी हे व्याख्यान ऐकण्यासाठी कार्यक्रमासाठी गडहिंग्लज, आजरा व चंदगड तालुक्यातून शाळा-महाविद्यालयीन युवक, युवती, शिक्षक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामुळे येथील म. दू. श्रेष्ठी विद्यालयाच्या पटांगणावर यामुळे प्रचंड गर्दी झाली होती.