होमपेज › Kolhapur › जिल्ह्यात १ लाखावर शेतकर्‍यांना २१५ कोटी ३६ लाखांची कर्जमाफी

जिल्ह्यात १ लाखावर शेतकर्‍यांना २१५ कोटी ३६ लाखांची कर्जमाफी

Published On: Jan 05 2018 1:14AM | Last Updated: Jan 04 2018 8:39PM

बुकमार्क करा
कोल्हापूर : प्रतिनिधी

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत जिल्ह्यातील 1 लाख 3 हजार 923 शेतकर्‍यांना 215 कोटी 35 लाख 89 हजार 420 रुपयांचा कर्जमाफीचा लाभ मिळाल्याचे प्रभारी जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर यांनी मंगळवारी सांगितले. राज्य शासनाच्या ‘सिद्धी 2017-संकल्प 2018’ या अभियानानुसार जिल्ह्यात विविध विकासकामांची त्यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.

जिल्हा प्रशासन व जिल्हा परिषद यांच्याकडील 2017 मध्ये झालेल्या विविध विकासकामांची माहिती व  2018 मध्ये राबविण्यात येणार्‍या महत्त्वाचे संकल्प यांची यावेळी माहिती देण्यात आली. काटकर म्हणाले, जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत जिल्हा मध्यवर्ती बँक व राष्ट्रीयीकृत, वाणिज्यिक बँकांच्या माध्यमातून कर्जमाफीचा लाभ मिळालेल्या शेतकर्‍यांमध्ये 18921 शेतकरी थकबाकी योजनेचे, तर 85 हजार शेतकरी प्रोत्साहनपर योजनेचे आहेत. प्रलंबित शेतकर्‍यांना लवकरच कर्जमाफी देण्यात येणार आहे. मुद्रा बँक योजनेंतर्गत यावर्षी जिल्ह्यात 34451 लाभार्थ्यांना 439 कोटी 35 लाखांचे अर्थसाहाय्य दिले आहे.255 कोटीच्या श्री अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या 68 कोटींच्या पहिल्या टप्प्याला उच्चाधिकार समितीने मान्यता दिली आहे.  

जोतिबा मंदिर परिसर विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील 25 कोटींच्या आराखड्यास शिखर समितीने मान्यता दिली आहे. 5 कोटींचा निधी वर्ग करण्याचा निर्णय झाला आहे. राजर्षी शाहू जन्मस्थळ विकासाबरोबरचे शाहू महाराज संग्रहालयासाठी 13 कोटींस तत्त्वतः मान्यता मिळाली आहे. 5 कोटींचा ऐतिहासिक माणगाव परिषद स्मारक विकास आराखडा तयार केला आहे. तसेच पंचगंगा घाट विकास, पन्हाळा लाईट व साऊंड शो अशा उपक्रमासाठी निधीस मान्यता दिली आहे.  

गेल्या तीन वर्षांत वनपर्यटनासाठी साडेसहा कोटींचा पर्यटन विकासाची कामे हाती घेण्यात आली आहेत. पुढील वर्षी 23 हेक्टर्समध्ये मुडशिंगी नगर उद्यानपार्क, पन्हाळा जेऊर साहसी पर्यटन, रामलिंग, आंबा येथे मानोली ते कोकणदर्शन पॉईंट आणि रांगणा, भुदरगड, पारगड पर्यटन विकासाची कामे करण्यात येणार आहे. जिल्ह्यात महाराजस्व अभियानांतर्गत पावणेचार लाख दाखल्यांचे वाटप करण्यात आले आहे. तर जवळपास 650 किलोमीटर लांबीचे 538 अतिक्रमित रस्ते मोकळे केले आहेत.

जलयुक्‍त शिवार अभियानांतर्गत जिल्ह्यात पहिल्या दोन वर्षांत 89 गावांमध्ये 45 कोटी 30 लाख रुपये खर्चून 1646 कामे पूर्ण करण्यात आली. यामुळे जिल्ह्यात पहिल्या दोन वर्षांत 6184 टीसीएम इतका पाणीसाठा झाला. यावर्षी जिल्ह्यातील 18 गावांची निवड करण्यात आली असून 263 कामांसाठी 4 कोटी 73 लाख रुपये मंजूर असून कामे सुरू आहेत. कळंबा तलाव गेल्या वर्षी या अभियानातून गाळमुक्‍त करण्यात आला आहे. जिल्ह्यात ग्रीन आर्मीचे 86 हजार 514 सदस्य झाले असल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, माहिती उपसंचालक सतीश लळीत,  सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता सदाशिव साळुंखे, जिल्हा नियोजन अधिकारी सरिता यादव, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज मास्तोळी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.