होमपेज › Kolhapur › शंभर वाड्या-वस्त्यांच्या आरोग्यसेवेचा बोजवारा 

शंभर वाड्या-वस्त्यांच्या आरोग्यसेवेचा बोजवारा 

Published On: Jun 01 2018 2:05AM | Last Updated: May 31 2018 10:26PMधामोड : रवी पाटील 

धामोड (ता. राधानगरी) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा कारभार वैद्यकीय अधिकार्‍यांच्या सवडीने गेले कित्येक दिवस सुरू असल्याचे उघडकीस आले आहे. जिल्हा परिषदेकडून येथे दोन वैद्यकीय अधिकार्‍यांची नियुक्‍ती असून त्यापैकी एका अधिकार्‍याची निवासी नियुक्‍ती आहे. चोवीस तास सेवा देणे बंधनकारक असतानाही सकाळी दहा ते दुपारी एक या तीन तासांतच रुग्णांवर उपचार केले जात असल्यामुळे रुग्ण सेवेचा बोजवारा उडाला आहे. तसेच येथील कर्मचार्‍यांवर अधिकार्‍यांचा वचक नसल्याने सात उपकेंद्रांचा कारभारही रामभरोसे चालला आहे. अधिकार्‍यांच्या मनमानी कारभाराकडे आरोग्य विभाग लक्ष देणार का, असा संतप्त सवाल धामोड परिसरातील ग्रामस्थांतून उपस्थित होत आहे. 

धामोड परिसरातील शंभरहून अधिक गावे व वाड्या-वस्त्यांवरील गीीं्ंरामस्थांचे आधारवड असलेल्या धामोड प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकार्‍यांचा मनमानी कारभार सुरू आहे. दोन वैद्यकीय अधिकार्‍यांनी आरोग्य केंद्रात हजर राहण्यासाठी तीन दिवसांचे पाळीपत्रक ठरविले असून हे वैद्यकीय अधिकारी त्याप्रमाणे काम करीत आहेत. येथील आरोग्य केंद्रांतर्गत धामोड, बुरंबाळी, तळगाव, पडसाळी, चौके, कोनोली व कोते अशी सात उपकेंद्रे असून उपकेंद्रातील कर्मचार्‍यांकडे वैद्यकीय अधिकार्‍यांचे दुर्लक्ष आहे.

खेड्या-पाड्यातून दहा ते पंधरा कि. मी. ची पायपीट करून येणार्‍या रुग्णांवर उपचार होत नसल्याने त्यांना खासगी दवाखान्यांचा आधार घ्यावा लागत आहे. वैद्यकीय अधिकारी हजर नसल्याने आरोग्यसेविका प्रसूती करण्यासाठी पुढाकार घेत नाहीत. पर्यायी प्रसूतीचे सर्व रुग्ण कोल्हापूरला ‘सीपीआर’मध्ये पाठविले जातात. सामान्य जनतेसाठी धामोड आरोग्य केंद्राचा उपयोग केवळ लसीकरणासाठी होत आहे. वैद्यकीय अधिकारीच दुपारनंतर गैरहजर असल्याने आरोग्य केंद्रात होणार्‍या प्रसूतीचे प्रमाण कमी झाले आहे.    

वैद्यकीय अधिकार्‍यांच्या आरोग्य केंद्रातील सावळ्या गोंधळाकडे जि. प. आरोग्य विभाग, पंचायत समिती प्रशासन व धामोड ग्रामपंचायतीचेही दुर्लक्ष होत आहे. परिणामी, रुग्ण सेवेसाठी शासनाने खर्च केलेले कोट्यवधी रुपये वाया जात आहेत. धामोड परिसरातील जनतेसाठी गेले कित्येक दिवस शासकीय रुग्णसेवा मृगजळ ठरत असून डोळ्यावर गांधारीप्रमाणे पट्टी बांधलेल्या आरोग्य विभागाला जाग येणार तरी केव्हा, असा संतप्त सवाल धामोड परिसरील जनतेतून विचारला जात आहे.