कागल : प्रतिनिधी
कागल बसस्थानकामध्ये एसटी बसचा धक्का लागून एक जण जागीच ठार झाला. दत्तात्रय आप्पा तिबिले (रा. पिंपळगाव तालुका भुदरगड) असे या मृत व्यक्तीचे नाव आहे. आज, गुरुवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास एसटी बस स्थानकात ही दुर्देवी घटना घडली. एसटीचा चालक सतीश राजगोंडा पाटील (रा. वंदूर, तालुका कागल) याच्यासह एसटी बस कागल पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.
याबाबत पोलिसाकडून मिळालेली माहिती अशी, रंकाळा कागल बस क्रमांक एम एच १४ BT-३७१५ रंकाळ्यावरून कागल मध्ये एसटी बस स्थानकात येत होती. कागल बसस्थानकावर महाविद्यालय सुटल्यामुळे विद्यार्थ्यांची मोठी गर्दी झाली होती. यातच रंकाळा कागल ही बस स्थानकामध्ये येत असताना दत्तात्रय तिबिले यास एसटीच्या डाव्याबाजूचा धक्का लागला. त्यामुळे तो खाली पडला. आणि एसटीच्या डाव्या बाजूचे मागील चाक त्याच्या डोक्यावरून गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
याबाबतची फिर्याद वाहतूक निरीक्षक लक्ष्मण राऊ माळी यांनी कागल पोलिसात दिली. त्यावरून पोलिसांनी एसटी चालक सतीश पाटील यास तिबिले यांच्या निधनास कारणीभूत धरत चालक पाटील यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. तसेच एसटी बस देखील पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. याबाबत अधिक तपास सहाय्यक फौजदार डावाळे करीत आहेत.