Wed, Mar 20, 2019 03:10होमपेज › Kolhapur › रसिकांसाठी नाट्य महोत्सवाचा खजिना

रसिकांसाठी नाट्य महोत्सवाचा खजिना

Published On: Jan 09 2018 1:33AM | Last Updated: Jan 08 2018 11:32PM

बुकमार्क करा
कोल्हापूर : प्रतिनिधी

कलेचे माहेरघर असणार्‍या कोल्हापूरनगरीमध्ये नाट्यचळवळीला प्रोत्साहन देण्यासाठी दै. ‘पुढारी’च्या वतीने नाट्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. केशवराव भोसले नाट्यगृह येथे दि. 25 ते 28 जानेवारी या कालावधीत हा महोत्सव भरवण्यात आला आहे. नाट्यप्रेमींना यानिमित्ताने अनेक दिग्गज कलाकारांची कलाकृती रंगमंचावर पाहण्याची संधी दै. ‘पुढारी’ने उपलब्ध करून दिली आहे. 

गेल्या अनेक वर्षांपासून नाट्यचळवळीच्या माध्यमातून नाट्यसृष्टीला अनेक मराठी कलाकार, दिग्दर्शक, तंत्रज्ञ मिळाले आहेत. दै. ‘पुढारी’ने कोल्हापूरच्या नाट्य व चित्रपट परंपरेला सततच प्रोत्साहन दिले आहे. प्रेक्षकांच्या मनोरंजनाचा धागा पकडून दै. ‘पुढारी’ने या नाट्य महोत्सवाचे आयोजन केले आहे. 

या महोत्सवाच्या माध्यमातून अभिनेता भरत जाधव, डॉ. गिरीश ओक, मकरंद अनासपुरे, पॅडी ऊर्फ पंढरीनाथ कांबळे, सिद्धार्थ जाधव अशा दिग्गज कलाकारांना रंगमंचावर पाहण्याची संधी मिळणार आहे. महोत्सवामधील सहभागी होणार्‍या नाटकांनी संपूर्ण महाराष्ट्रात धम्माल माजवली असून, मनोरंजनाचा खजाना या महोत्सवामध्ये खुला होणार आहे. 

महोत्सवांतर्गत - गुरुवार, दि. 25 जानेवारी सायं. 7 वा. लेखक - सौम्य जोशी, दिग्दर्शक - राजन ताम्हाणे, कलाकार - भरत जाधव व डॉ. गिरीश ओक यांच्या अभिनयाने सजलेले ‘वेलकम जिंदगी’ हे नाटक दाखवण्यात येणार आहे.  

शुक्रवार, दि. 26 जानेवारी सायं. 7 वा. लेखक - अक्षय जोशी, दिग्दर्शक - प्रसाद खांडेकर, कलाकार - सुशील इनामदार, रसिका वेंगुर्लेकर, अंतरा पाटील, डॉ. आदिती भास्कर, ओंकार पनवेलकर, पॅडी कांबळे आणि प्रसाद खांडेकर यांची भूमिका असणारा ‘दिल तो बच्चा है जी!’ हे नाटक सादर होणार आहे. शनिवार, दि. 27 जानेवारी सायं. 7 वा. ‘उलट-सुलट’ हे नाटक सादर होणार असून, लेखक - किरण माने, दिग्दर्शक - कुमार सोहोनी हे आहेत. या नाटकामध्ये मकरंद अनासपुरे, समीर देशपांडे, कृतिका तुळसकर, तन्वी पंडित, किरण माने यांच्या भूमिका आहेत. 

मराठी चित्रपटांमध्ये सध्या धम्माल उडवत असलेला सिद्धार्थ जाधव याच्या अभिनयाने सजलेले ‘गेला उडत!’ हे नाटक रविवार, दि. 28 जानेवारी सायं. 4 वा. प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. याचे लेखन- दिग्दर्शन - केदार शिंदे यांनी केले आहे. नाट्यप्रेमींनी दै. ‘पुढारी’ने आयोजित केलेल्या या नाट्य महोत्सवाचे साक्षीदार होण्यासाठी आजच आपल्या जागा निश्‍चित करून घ्याव्यात. 

अधिक माहितीसाठी संपर्क - संजय लोंढे (वैभव एंटरप्रायजेस) मोबा. 9890980321, 9923430190. तिकीट मिळण्याचे ठिकाण ः टोमॅटो एफ.एम. ऑफिस. पाचवा मजला, वसंत प्लाझा, राजाराम रोड, राजारामपुरी, कोल्हापूर. फोन. नं. ः 0231-6625943.