Tue, Jul 16, 2019 12:02होमपेज › Kolhapur › ‘दौलत’ बुडवणार्‍यांच्या, चालवणार्‍यांच्या दारात जा

‘दौलत’ बुडवणार्‍यांच्या, चालवणार्‍यांच्या दारात जा

Published On: Dec 03 2017 1:32AM | Last Updated: Dec 03 2017 12:12AM

बुकमार्क करा

गडहिंग्लज : प्रतिनिधी

ज्यांनी दौलत कारखाना बुडवला व ज्यांनी आता चालवण्यास घेतला त्यांच्या दारात जाऊन आंदोलन करण्याऐवजी अ‍ॅड. मळवीकर हे जिल्हा बँकेच्या कर्मचार्‍यांना त्रास देत आहेत. त्यांच्यामध्ये हिंमत असेल, तर त्यांनी या लोकांच्या दारात जाऊन त्यांची कोणती स्टाईल आहे त्याप्रमाणे आंदोलन करावे. जिल्हा बँकेच्या कर्मचार्‍यांच्या केसालाही धक्का लागला, तर गप्प बसणार नाही, असे सांगून मला चंदगड बंद करणारे ते कोण, असा प्रश्‍न करत अ‍ॅड. संतोष मळवीकर यांच्या आ. मुश्रीफांनी चंदगड बंदच्या विधानाची त्यांनी खिल्ली उडवली. नागपूरचे हिवाळी अधिवेशन संपले की चंदगडात मी नक्की येणार, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

‘दौलत’च्या विषयावर अ‍ॅड.संतोष मळवीकर यांनी आ. मुश्रीफ यांना चंदगडमध्ये येऊ देणार नाही, असे विधान केले होते. यावर आज मुश्रीफ यांनी जोरदार टीका केली. जिल्हा बँकेने ‘दौलत’ला कर्ज दिले म्हणजे काय चूक केली काय. बँक तोट्यात जात असताना ‘दौलत’च्या कर्जाची वसुली करणे आवश्यकच होते. 11 वेळा निविदा काढूनही कोणी कारखाना घेईनात. अविनाश भोसले यांनी निविदा भरली. मात्र, दुसर्‍या कारखान्याची एफ.आर.पी. भरली नाही म्हण्ाून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामुळे त्यांची निविदा रद्द केली. त्यानंतर न्यूट्रियन्सने निविदा भरली. त्यांना 34 कोटी एकरकमी व 34 कोटी पाच वर्षांच्या हप्त्याने देण्याच्या अटीवर जिल्हा बँकेने कारखाना 45 वर्षांसाठी चालवण्यास दिला असून, त्यांनी 34 कोटी रुपये भरून कारखान्यासाठी 7 कोटी रुपये खर्च केले आहेत.

कारखाना चालवण्यास घेतल्यानंतर त्यांनी एफ.आर.पी. व कामगारांचे पगार दिले नाहीत ही कंपनीची चूक असून, याबाबत अप्पी पाटील यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असून, एवढी मोठी रक्कम गुंतवूनही कंपनी याकडे का कानाडोळा करत आहे, हेच समजत नाही. या 31 मार्चला 10 कोटी रुपये भरले नाहीत, तर जिल्हा बँक कारखाना विकू शकते. ही स्थिती असताना अ‍ॅड. मळवीकर हे जिल्हा बँकेला यासाठी का दोषी धरत आहेत. ज्यांनी कारखाना बुडवला त्यांच्या दारात जाऊन आंदोलन करावे. आता ज्यांच्याकडे कारखाना चालवण्यास आहे त्यांना जाब विचारा. विनाकारण जिल्हा बँकेच्या कर्मचार्‍यांना दरडावू नये. मला चंदगड बंद करणारे ते कोण. हिवाळी अधिवेशन झाले की मी चंदगडमध्ये येऊन जातो, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.