Mon, Feb 18, 2019 20:13होमपेज › Kolhapur › श्रीक्षेत्र नृसिंहवाडीत आज दत्त जयंती उत्सव

श्रीक्षेत्र नृसिंहवाडीत आज दत्त जयंती उत्सव

Published On: Dec 03 2017 1:32AM | Last Updated: Dec 03 2017 12:14AM

बुकमार्क करा

नृसिंहवाडी : प्रतिनिधी

श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथील मुख्य मंदिरात रविवारी (दि. 3) दत्त जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम होत आहेत. पहाटे चार वाजता काकड आरती ते शेजारतीपर्यंतचे कार्यक्रम पुढीलप्रमाणे.

पहाटे चार वाजता काकड आरतीनंतर पंचामृत अभिषेक व दुपारी बारा वाजता श्री चरणावर महापूजा होईल. तीन वाजता पवमान पंच सूक्ताच्या पठणानंतर ‘श्रीं’ची उत्सवमूर्ती जन्मोत्सव सोहळ्यासाठी साडेचार वाजता मंदिरात आणण्यात येईल. सायं. पाच वा. श्री गुरुदेव दत्त जयजयकारात ‘जन्मकाळ’ होईल. यावेळी भाविकांना सुंठवड्याचे वाटप होणार आहे. रात्री नऊनंतर पालखी, शेजारती असे कार्यक्रम होणार आहेत. पुण्याचे कीर्तनसम्राट ह.भ.प. संदीप बुवा मांडके यांचे सुश्राव्य कीर्तन जन्मकाळअगोदर होणार आहे.

दत्त जयंती दिवशी होणारी गर्दी लक्षात घेऊन वरिष्ठ स्तरावरून यंत्रणा कार्यान्वित करण्याचा निर्णय अधिकारीवर्गाने घेतला आहे. बसस्थानक ते मंदिरापर्यंत चोख व्यवस्था ठेवली आहे. पुण्याचे दत्तभक्त शेखर शिंदे यांनी मंदिराची विविध पुष्पमाळांनी सजावट, आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे. जन्मोत्सव सोहळा झाल्यानंतर मंदिराचा मुख्य पाळणा ‘गणेश दत्त कुंज’ येथे दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. या ठिकाणी भाविक, तसेच नागरिकांना दर्शनाची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.