Fri, Feb 22, 2019 05:26होमपेज › Kolhapur › कागल पंचताराकित रस्त्यावर अंधाराचे साम्राज्य

कागल पंचताराकित रस्त्यावर अंधाराचे साम्राज्य

Published On: Feb 15 2018 1:56AM | Last Updated: Feb 14 2018 11:33PMकसबा सांगाव : कलंदर सनदी

कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील मुख्य रस्त्यांना जोडणार्‍या हमरस्त्यावर अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. महावितरणाच्या दुर्लक्षाने रस्त्याच्या दोन्ही बाजूने दिवसा दिसणारे विद्युत पोल शोभेचे बनले आहेत. त्यामुळे चोरीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. लूटमारीचे प्रकार वाढत असल्याने सायंकाळी महिला कामगारांना घरी जाणे धोकादायक बनले आहे. रात्री उशिरा येणार्‍या कामगारांत भीतीचे वातावरण आहे. औद्योगिक महामंडळ व ‘वीजवितरण’च्या अक्षम्य दुर्लक्षाने कामगार वर्गात नाराजी व्यक्त होत असून उद्योजक चिंतेत आहेत.

पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत कागल, करवीर, हातकणंगले, तालुक्यातील सांगाव, रणदेवीवाडी, हुपरी, तळंदगे, पट्टणकोडोली, हालसवडे या गावातून परिसरातील हजारो कामगारांची ये-जा सुरू असते. या गावांना जोडणार्‍या औद्योगिक वसाहतीच्या रस्त्यावर दोन्ही बाजूने विद्युत पोल उभे आहेत; पण त्यांचा प्रकाश पोल पुरताच मर्यादित पडतो. लांबून दिवे लागल्यासारखे दिसतात. त्यांचा प्रकाश रस्त्यापर्यंतही पोहोचत नाही.पंचतारांकित औद्योगिक वसाहतीला महामार्गापासून जोडणार्‍या मुख्य रस्त्यावरच मोठ्या प्रमाणात प्रकाशाची सोय झाली आहे. 1185 हेक्टरमध्ये वसलेल्या औद्योगिक वसाहतीत ए ते जी व टी पी अशा विभागात विभागली आहे; पण बहुतांशी ठिकाणी रस्त्यावर अंधारच आहे. रेमंड चौकाला सांगावकडून जोडणार्‍या हमरस्त्यावर पूर्णता अंधार असतो. सोकटास प्रा. लि., होलमार्क प्रा. लि. पुढून व मेट्रो हायटेक पार्कच्या पाठीमागून हा रस्ता जातो. या रस्त्यावरून सीमाभागातील हजारो कामगारांसह, कागल पूर्व भागातील महिला कामगारांची मोठ्या प्रमाणात ये-जा सुरू असते. सायंकाळी कामावरून चालत येताना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. अंधाराचा फायदा घेऊन अपप्रवृतीचे लोक महिलांना त्रास देतात. रणदेवीवाडी, तळंदगे, हालसवडे  फाट्यावरही तीच अवस्था असते. कारखान्यात स्क्रॅप चोरीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. 

रात्रीच्या वेळी कामावरून येणार्‍या कामगार विषेशत: कारखान्यात सुरक्षा रक्षक म्हणून काम करणार्‍या कामगारांवर अंधाराचा फायदा घेऊन दबा धरून बसलेल्या चोरांकडून लूटमारीचे प्रकार वाढले आहेत. कसबा सांगावमधील एका तरुणावर तिघांनी मिळून हल्ला केल्याने त्यांना प्रतिकार करताना तो जखमी झाला आहे.