Thu, Jun 27, 2019 13:42होमपेज › Kolhapur › कोल्हापूरला डेंग्यूचा विळखा

कोल्हापूरला डेंग्यूचा विळखा

Published On: Aug 26 2018 1:39AM | Last Updated: Aug 26 2018 1:39AMकोल्हापूर : प्रतिनिधी

कोल्हापूर शहर व परिसरात गेल्या काही महिन्यात तब्बल दहा हजारांहून अधिक जणांना डेंग्यूने विळखा दिला आहे. सरकारी आकडेवारीनुसार सुमारे दोन हजार जणांना डेंग्यू झाला असल्याचे स्पष्ट झाले असले, तरी प्रत्यक्षात हा आकडा पाच हजारांवर असल्याचे वैद्यकीय व्यावसायिक खासगीत सांगतात. डेंग्यूचा फैलाव ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात होत असल्याचे दिसत आहे. परिणामी, एकूणच कोल्हापूर जिल्ह्याला डेंग्यूचा ताप सहन करावा लागत आहे.  

कोल्हापूर शहरात गेल्या चार महिन्यांत डेंग्यूने पंधरा जणांचा बळी घेतला आहे. त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. परंतु, महापालिकेने डेंग्यून शहरात सहा जणांचा मृत्यू झाल्याचा दावा केला आहे. संजय अण्णा लोहार, सतीश हणमंत वंशे, मेघा प्रशांत कोळी, विष्णू शंकर दबडे, रूचिरा सुनील शिंदे व संजय रामचंद्र देसाई अशी त्यांची नावे असल्याची माहिती आरोग्याधिकारी डॉ. दिलीप पाटील यांनी दिली. 

5,701 ठिकाणी डेंग्यू डासांच्या अळ्या

गेल्या दोन महिन्यांत महापालिकेच्या वतीने कोल्हापूर शहरातील 54 हजार 291 घरांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्याअंतर्गत 2 लाख 45 हजार 219 लोकांचा सर्व्हे झाला. 
9 लाख 56 हजार 442 साठलेल्या पाण्याचे कंटेनर तपासण्यात आले. त्यापैकी 5 हजार 701 ठिकाणी डेंग्यू डासांच्या (एडिस इजिप्ती) अळ्या सापडल्या. त्यामुळे कोल्हापूर शहरात तब्बल पाच हजारांवर ठिकाणी या डासांच्या अळ्या असल्याचे स्पष्ट झाले. 

इथे वाढतो डेंग्यूचा डास

डेंग्यूचा डास हा स्वच्छ पाण्यात वाढतो. घरातील फ्रीजच्या मागील साईडच्या ट्रेमध्ये, नारळाची करवंटी, रिकाम्या टायरीत साचलेले पाणी, बाथरूममध्ये साठवलेले पाणी, पाण्याच्या टाक्या, कुंडी आदी ठिकाणी डेंग्यूचे डास अंडी घालतात. रस्त्यावर सखल भागात साचलेल्या पावसाच्या पाण्यातही डासांची उत्पती होते. त्यामुळे घरासह आसपासचे पाण्याचे साठे नष्ट करणे आवश्यक आहे. 

राधानगरी तालुका...

राधानगरी तालुक्यात गेल्या महिन्यात डेंग्यूचे सहा संशयित रुग्ण सापडले होते. उपचारानंतर ते बरे झाले आहेत. यावर्षी तालुक्यात सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे सर्वच गावांत डासांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. मात्र, अपवाद वगळता बहुतांशी गावांत पावडर फवारणीकडे दुर्लक्षच होत असल्याने साथीच्या आजारांचे सावट गडद झाले आहेत. 

शिरोळ तालुका...

शिरोळ तालुक्यातील ग्रामीण भागाचा विचार करता, स्वच्छ आणि सुंदर असा नावलौकिक असलेल्या जयसिंगपूर शहरात गेल्या महिन्यात एकाच गल्लीतील 8 ते 10 जणांना डेंग्यूची लागण झाल्याने पालिका व प्राथमिक आरोग्य केंद्राची यंत्रणा हादरली होती. विशेष म्हणजे त्यात नगरपालिकेच्या एका कर्मचार्‍याचा समावेश होता. गेल्या आठवड्यात डवरी सोसायटीत आरोग्य सेविकेलाच डेंग्यूने गाठले. 
या पार्श्‍वभूमीवर जिल्हा आरोग्य यंत्रणेची तारांबळ उडाली.

भुदरगड तालुका...

भुदरगड तालुक्यात शासकीय आरोग्य यंत्रणेला 14 संशयित डेंग्यूचे रुग्ण आढळून आले असून, खासगी रुग्णालयातही उपचार घेतलेल्या रुग्णांचा आकडा मात्र गुलदस्त्यात आहे. रुग्णांचे प्लेटलेटस् कमी होण्याच्या प्रमाणात कमालीची वाढ झाली आहे. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. 

गडहिंग्लज तालुका...

गडहिंग्लज तालुक्यामध्ये डेंग्यूचा फैलाव आजघडीला नसला, तरी आरोग्य खात्याकडून आवश्यक असणार्‍या उपाययोजना मात्र तोकड्याच पडत आहेत. गेल्या सहा महिन्यांपूर्वी काही ठिकाणी डेंग्यूचे रुग्ण आढळले होते. मात्र, त्यावर उपाययोजना तातडीने झाल्याने डेंग्यूचा फैलाव रोखण्यास मदत झाली आहे. डेंग्यू होऊ नये म्हणून आवश्यक असणार्‍या उपाययोजना करण्याबाबत अद्यापही आरोग्य विभागाकडून कार्यवाही होत नसल्याने त्याचा फटका बसत आहे.