Mon, May 20, 2019 08:00होमपेज › Kolhapur › पाणी विसर्गामुळे नदीत पोहणे धोकादायक

पाणी विसर्गामुळे नदीत पोहणे धोकादायक

Published On: May 10 2018 1:35AM | Last Updated: May 10 2018 12:27AMइचलकरंजी : प्रतिनिधी

उन्ह्याचा पारा चढत असताना  सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी शाळकरी मुलांची पाऊले आपसूकच नदी किंवा विहिरीकडे वळत आहेत. त्यामुळे गावाबाहेरच्या विहिरी आणि नदी घाटावर मुलांची तुडुंब गर्दी झालेली पहायला मिळत आहे. पोहायला न येणारी किंवा नवशिके मुलेही जीवाची पर्वा न करता मग पाण्यात उतरत असतात. पोहण्याचा हा मोह त्यांच्या जीवावर बेततोच; पण कुटुंबीयांना त्याचा जबर फटका सहन करावा लागतो. दरवर्षी अशी मालिका सुरू असताना योग्य ती काळजी घेतली जात नाही हेही तितकेच सत्य आहे. त्यामुळे पोहायला जाण्यापूर्वी पुरेशी काळजी घेणे आवश्यक आहे. दोन दिवसांपूर्वी धरणातून नदीत पाणी सोडण्यात आल्याने  पाण्याची पातळी वाढली आहे. अशावेळा नदीत पोहताना काळजी घेणे आवश्यक आहे.

उन्हाळ्याच्या सुट्टीत इचलकरंजी शहर व परिसरात अनेक विहिरींवर मुलांची तोबा गर्दी झालेली असते. परीक्षा झाल्यानंतर उन्हाळ्याच्या सुट्टीत पोहायला शिकायचे हा अलिखित नियमच आहे. पूर्वीच्या काळी मामाकडे सुट्टीला जाणार्‍या मुलांना तर केवळ पोहायला शिकणे हा अजेंडा असायचा. त्यामुळे गावाकडे सकाळी सकाळी विहिरीवर पोहायला शिकणार्‍यांची प्रचंड गर्दी जमत असते. मात्र, धकाधकीच्या जीवनात नातेसंबंध केवळ नावापुरतेच उरले. 

जलतरण तलावामध्ये पोहायला शिकलेली मुले पाण्याचा वेग, पाण्याची पातळी आदी गोष्टींत अनभिज्ञ असतात. त्यामुळे जलतरण तलावामध्ये सहज पोहता येणार्‍या अनेक मुलांना नदी किंवा विहिरीत पोहताना अनंत अडचणींना सामोरे जावे लागते. अशी मुले घाटावर पोहोचतात. नदी घाटावर पोहणारी मुले इतरांचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करताना क्षणात वाहून जातात. अनेकवेळा नदीकाठावरील नागरिकांकडून त्यांना वाचवले जाते. मात्र, काही वेळा प्रयत्न करूनही ही मुले हाती लागत नाहीत. 

गेल्या वर्षी गावभाग परिसरातील एका विहिरीत दोन मुलांचा बुडून मृत्यू झाला होता.  दोन महिन्यांपूर्वीच तांबेमाळ परिसरातील एका उदयोन्मुख कबड्डीपटूचा नदीत बुडून मृत्यू झाला होता. मंगळवार पेठेतील अवंतीकुमार तेलवे हा सोमवारी पोहण्यासाठी गेला असता तो वाहून गेला. त्यामुळे मुलांनी मोह टाळून किंवा जबाबदार व्यक्‍तीबरोबर पोहायला जाणे गरजेचे आहे.

धरणातील विसर्गानेच घेतला बळी

कडक उन्हामुळे व सततच्या उपशामुळे पंचगंगा नदीतील पाण्याची पातळी खालावली होती. त्यामुळे नदीत पोहणार्‍या मुलांना फारसा धोका नव्हता; परंतु दोन दिवसांपूर्वी धरणातून पाणी सोडण्यात आल्याने  पाण्याची पातळी वाढली आहे. तसेच या पाण्याला प्रवाहही आहे. त्यामुळे या पाण्यात पोहण्याचा मोह अवंतीकुमार तेलवे या मुलाच्या जीवावर बेतला. तो पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला. जेव्हा धरणातून पाणी सोडण्यात येते तेव्हा नदीतील धोकादायक स्थितीची माहिती देणारी कोणतीही यंत्रणा अस्तित्वात नाही. त्यामुळे पालिकेने याठिकाणी उपाययोजना करण्याची गरज आहे. 

प्रशिक्षणातील नियमांचे गांभीर्य नाहीच 

धावपळीच्या युगात पालकांना मुलांना पोहायला शिकवायला वेळ मिळत नाही. त्यामुळे समर कॅम्पला मुलांना पाठवण्याकडे पालकांचा ओघ वाढला आहे. एक किंवा दोन महिन्यांच्या प्रशिक्षणामध्ये मुलांना पोहायला शिकवले जाते. प्रशिक्षणादरम्यान काही महत्त्वाचे नियम सांगितले जातात. पोहताना नियम पाळावेत किंवा त्याची अंमलबजावणी करण्यात यावी ही अपेक्षा असते. मात्र, बहुतांशी वेळा मुलांकडून नियमांचे पालन केले जातच नाही.