Tue, Apr 23, 2019 05:59होमपेज › Kolhapur › ‘लिफ्ट’मुळे शाळेभोवती धोक्याची घंटा

‘लिफ्ट’मुळे शाळेभोवती धोक्याची घंटा

Published On: Jul 12 2018 1:41AM | Last Updated: Jul 11 2018 11:17PMहुपरी : वार्ताहर

सध्या शाळा, महाविद्यालये सुरू झाली आहेत. शाळेपर्यंत जाण्यासाठी रस्त्यावर विद्यार्थी मोटारसायकलस्वारांकडे ‘लिफ्ट’ मागताना ठिकठिकाणी दिसून येतात. वरकरणी यामध्ये काहीही गैर वाटत नसले तरी यातून मोठा धोका संभवू शकतो. त्यामुळे पालकांनी आपल्या पाल्यांना या बाबींपासून परावृत्त करणे गरजेचे आहे.

सध्या सोशल मीडियावर मुले पळवून नेणारी टोळी आल्याच्या अफवा पसरवल्या जात आहेत. या अफवांमुळे अनेक निरपराध लोकांना जीवाला मुकावे लागले आहे. अफवा पसरवणे मुळातच गुन्हा आहे. मात्र, सोशल मीडियाच्या माध्यमातून आलेली पोस्ट फॉरवर्ड करण्याच्या सवयीतून आपण कशाला खतपाणी घालतोय, याचा कोणतीही माहिती नसल्याने हे पेव फुटले आहे. सध्या शाळा सुरू झाल्या आहेत. पावसाच्या सरीही बरसत आहेत. आज तरी स्कूलबसची सोय उपलब्ध झाली असली तरी 50 टक्क्यांहून अधिक मुले पायी किंवा सायकलनेच शाळेला जातात. ग्रामीण भागात तर हेच चित्र आहे. परंतु, शाळेला लवकर पोहोचण्यासाठी किंवा चालत जाण्याचा कंटाळा करणारे अनेक विद्यार्थी मोटारसायकलस्वारांना हात दाखवून लिफ्टची मागणी करतात. मानवतेच्या द‍ृष्टिकोनातून वाहनधारकही लिफ्ट देतात. मात्र, या लिफ्टमध्ये अनेक धोके आहेत. प्रत्येकवेळी वाहनधारक परिचयाचा किंवा गावातील असेलच असे नाही. त्यामुळे काही गैरप्रकारही घडू शकतात. 

काहीवेळा अशा पध्दतीने अपहरणाचे प्रकारही घडले आहेत. वाहनचालक बेदरकारपणे वाहन चालवणारा असेल तर त्यामुळे विद्यार्थ्याच्या जीवालाही धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे पालकांनीही वेळीच दक्षता घेऊन मुलांना शक्यतो लिफ्ट मागणे टाळावे, आपल्या गावातील व ओळखीच्या वाहनधारकाच्या वाहनातूनच जावे, अशा सूचना देणे गरजेचे आहे. तरच गैरप्रकारांना आळा घालणे शक्य होणार आहे. 

पालक, शिक्षकांनी विद्यार्थ्यांत जागृती करण्याची गरज : मुख्याध्यापक माने

शाळेत लवकर पोहोचता यावे, तसेच वाहनांवर बसण्याचा आनंद लुटावा, यासाठी विद्यार्थी वाहनधारकांकडे लिफ्ट मागतात. मात्र, ते धोक्याचे ठरू शकते. त्यामुळे आम्ही दररोज प्रार्थनेच्यावेळी विद्यार्थ्यांना अनोळखी व्यक्‍तीच्या वाहनावरून येऊ नये, अशा सूचना देत असतो. सर्वच शाळांनी तसेच पालकांनी अशा सूचना द्याव्यात, असे मत केंद्रीय मराठी शाळेचे मुख्याध्यापक रावसाहेब माने यांनी व्यक्‍त केले.

विद्यार्थ्यांच्या बाबतीत धोकादायक घटना घडू नये : खाडे 

दोन वर्षांपूर्वी अशा पद्धतीने लिफ्ट मागणार्‍या दोन चिमुरड्या भावा-बहिणीला मोटारसायकलस्वाराने लांब अंतरापर्यंत नेऊन मुलीच्या पैंजण व कानातील सोन्याची रिंग लंपास केल्या होत्या. त्यावेळी काही लोकांच्या प्रसंगावधानाणे पुढील अनर्थ टळला होता. त्यामुळे पालकांनी पाल्यांना स्वतः शाळेत सोडावे, अन्यथा अनोळखी व्यक्‍तीच्या वाहनांवर न बसण्याचा सल्‍ला द्यावा, असे आवाहन पालक धनंजय खाडे यांनी केले आहे.