Sat, Apr 20, 2019 23:52होमपेज › Kolhapur › जमिनीसोबत बिघडतंय मानवी आरोग्य!

जमिनीसोबत बिघडतंय मानवी आरोग्य!

Published On: Dec 13 2017 1:55AM | Last Updated: Dec 13 2017 12:18AM

बुकमार्क करा

कागल : बा. ल. वंदुरकर

कागल तालुक्यातील बहुतांशी क्षेत्र सध्या बागायत झाले आहे. या बागायती क्षेत्रात होणारा रासायनिक खतांचा वापर भयंकर वाढला आहे. त्यामुळे भविष्यात जमिनीचे वाळवंटात रूपांतर होण्याची भीती व्यक्त केली जात असून याची सुरुवात तालुक्यातील काही भागात दिसून येत आहे. जमिनीला भरमसाठ पाणी आणि रासायनिक खतांचा ओव्हर डोस देण्यात येत असल्याने सुपीक जमिनीचे आरोग्य वेगाने बिघडू लागले आहे. शिरोळ, हातकणंगले, करवीर नंतर कागल तालुका रासायनिक खते वापरामध्ये आघाडीवर आहे. खते आणि कीटकनाशके वापरामुळे जमिनीबरोबरच मानवी आरोग्यही बिघडत आहे.

तालुक्यातील एकूण गावांची संख्या 86 असून एकूण भौगोलिक क्षेत्र 54 हजार 912.95 हेक्टर आहे. त्यापैकी बागायती क्षेत्र 16 हजार 400 हेक्टर, जिरायत क्षेत्र 38 हजार 512.95 हेक्टर, खरीप पीक क्षेत्र 45 हजार 200 हेक्टर, रब्बी पीक क्षेत्र 6 हजार 900, एकूण नद्या तीन, विहिरींची संख्या 3 हजार 596, एकूण खातेदार 54 हजार 741 इतके आहेत. मात्र, चिकोत्रा सोडली तर दूधगंगा आणि वेदगंगा नद्यांना बारमाही मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध आहे.

दूधगंगा आणि वेदगंगा नद्यांना उन्हाळा-पावसाळा भरून वाहत असल्याने सर्व विहिरी आणि तलाव भरलेल्या असतात. तळ कधी गाठतच नाहीत. त्यामुळे उसाच्या पिकांचे क्षेत्र दिवसेंदिवस वाढत आहे. उसाच्या पिकाला पाणी देण्यासाठी दरवर्षी पाईप लाईनची संख्या वाढतच आहे. मोठ्या प्रमाणात पाण्याचा वापर केला जात आहे. या वापरामुळे नदीकाठावरील जमिनीकडे जाण्यासाठी वाटच मिळत नाही. दलदल निर्माण झाली आहे.    

युरिया रासायनिक खतामध्ये नत्राचे प्रमाण 46 टक्के असते. मात्र, पिकांना दिलेल्या युरियातून केवळ 10 ते 15 टक्के नत्र पिकांना मिळते. उर्वरित जमिनीतून वाहून जाणे, हवेत मिसळण्याची प्रक्रिया होते. जमिनीत मिसळलेल्या युरियामुळे सुपिकता कमी होऊन जमिनीची अ‍ॅसिडीकता वाढत आहे. युरिया खताच्या वापरा नंतर पिकांची शाखीय वाढ झपाट्याने होते. मात्र, सतत युरिया वापरल्यामुळे पिकांची पाने कोवळी व लुसलुशीत होत असल्याने त्यावर किडीचा प्रादुर्भाव लवकर होतो. 

बदलते हवामान आणि अवेळी पडणारा पाऊस या बदलाचा पिकावर होणारा परिणाम यामुळे सध्या शेतकरी पीक पद्धत बदलण्याच्या विचारात आहेत. मात्र, शेतकर्‍यांनी शेणखत आणि सेंद्रिय आणि जैविक खताचा वापर वेळीच करायला हवा. या खताचा वापर केल्यास रासायनिक खतांवरील खर्च वाचवून जमिनीचे आरोग्य सांभाळता येईल. 

कागल तालुक्यात सध्या सेंद्रिय शेती करण्याकडे शेतकर्‍यांचा कल वाढू लागला आहे. गावागावांत सेंद्रिय शेती करणारे एखाद् दुसरे शेतकरी दिसून येत आहेत. कागल शहरात शेतकर्‍यांची संख्या अधिक आहे. करड्याळ, वंदूर, पिंपळगाव खुर्द येथे शेतकरी गटामार्फत सेंद्रिय शेती करतात. या तीन गावांतील अंदाजे 150 शेतकरी सेंद्रिय शेती करतात. ही बाब उल्लेखनीय ठरणारी आहे.