Thu, Jul 18, 2019 16:57होमपेज › Kolhapur › दामदुप्पट आमिषाने 700 जणांना कोट्यवधीचा गंडा

दामदुप्पट आमिषाने 700 जणांना कोट्यवधीचा गंडा

Published On: Aug 12 2018 1:22AM | Last Updated: Aug 12 2018 1:22AMकोल्हापूर : प्रतिनिधी

दामदुप्पटसह मोफत विम्याच्या आमिषाने जिल्ह्यातील सुमारे 700 जणांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. फिनॉमिनल कंपनीच्या माध्यमातून मोफत आयुर्विमा, मोफत वैद्यकीय तपासणी सुविधांसह नऊ वर्षांत दुप्पट करण्याच्या नावाखाली रक्‍कम घेण्यात आली होती. याप्रकरणी मुंबईसह राज्यातील 18 संचालकांविरोधात शाहूपुरी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

गु्रप चेअरमन नंदलाल केशर सिंग, मीनबहाद्दूर केशर सिंग,श्रेना श्रीधरन नायर, मानतोष हरीनाथ विश्‍वकर्मा, विलास नारकर, मोनिका सावंत, सबेस्टियन रॅपेल मलिकन, थेके माडाथील श्रीधरन पद्मनाभम नायर, जोसेफ लाझर कन्‍नमपूजन, संजय तुकाराम पाटील, प्रदीप गल्‍लीक, अरुण कुमार (सर्व रा. मालाड, मुंबई), फुला भिला पाटील (रा. उस्मानपूर, औरंगाबाद), विष्णू शंकर सोनवणे (नांदेड), दिवेकर (आजरा), इनामदार (पुणे), शंकर पाटील (शाहूवाडी), बळवंत कळंत्रे (मलकापूर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

स्टेशन रोडवरील प्रभाकर प्लाझा इमारतीमध्ये कंपनीचे कार्यालय होते. मागील दहा वर्षांपासून या ठिकाणी हे कार्यालय सुरू होते. शहरात ठिकठिकाणी जाहिराती लावून कंपनीने सभासदांना आकर्षित केले. मोफत आयुर्विमा, मोफत वैद्यकीय तपासणी, अपघात विमा मिळवून देण्यासह रक्‍कम दामदुप्पट करण्याचे आमिष दाखविले. अरुणा यादव या फिर्यादींनी 2007 मध्ये 3 लाख 18 हजार रुपयांची गुंतवणूक केली. तसेच कुटुंबीयांच्या नावाने 17 लाख रुपये भरले होते. गुंतवणुकीला दहा वर्षे होऊनही रक्‍कम परत मिळत नसल्याने त्यांनी पोलिसांत फिर्याद दिली.

जिल्ह्यात मोठे जाळे

गुंतवणुकीच्या नावाखाली सात हजार रुपये ते पाच लाखांपर्यंतच्या रकमा ग्राहकांनी दिल्या आहेत. जिल्ह्यात कंपनीचे सुमारे 700 ग्राहक असल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले आहे. ग्राहकांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

महिन्याला सेमिनार

कंपनीचे काही संचालक प्रत्येक महिन्याला कोल्हापुरात येत होते. सेमिनार व स्लाईड शोच्या माध्यमातून ग्राहकांना योजनांची माहिती दिली जात होती. तसेच मोठा क्‍लेम मिळविलेल्या ग्राहकांना मंचावर बोलावून सत्कार करण्यात येत होता. याद्वारे अनेकांना या जाळ्यात ओढण्यात आले.

गुन्हा आर्थिक अन्वेषण शाखेकडे

या गुन्ह्याची व्याप्‍ती मोठी असल्याने गुन्हा आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे वर्ग करण्यात आला. अधिक तपास उपअधीक्षक आर. बी. शेडे करीत आहेत.