Mon, Mar 25, 2019 13:15होमपेज › Kolhapur › ‘चांगभलं’च्या गजरात जोतिबा यात्रा

‘चांगभलं’च्या गजरात जोतिबा यात्रा

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

चांगभलंचा अखंड गजर, गुलाल आणि खोबर्‍याची उधळण करत लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या दख्खनचा राजा श्री जोतिबाची चैत्र यात्रा शनिवारी अमाप उत्साह आणि पारंपरिक वातावरणात साजरी झाली. महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश आणि कर्नाटकातून आलेल्या लाखो भाविकांनी श्री जोतिबाचे मनोभावे दर्शन घेतले. सळसळता उत्साह आणि भक्‍तिमय वातावरणात सासनकाठी मिरवणुकीचाही सोहळा रंगला. यंदा पाऊस चांगला होऊ दे, शेतकरी सुखी होऊ दे, असे साकडे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दख्खनच्या राजाला घातले. दक्षिण दरवाजात घडलेला चेंगराचेंगरीचा किरकोळ प्रकार वगळता यात्रा सुरळीत पार पडली.

शनिवारी यात्रेचा मुख्य दिवस होता. शुक्रवारी रात्रीपासूनच भाविक मोठ्या संख्येने डोंगरावर येत होते. मध्यरात्रीपासून डोंगरावर येणार्‍या भाविकांची गर्दी वाढली. पहाटे तर डोंगरावर येणारा रस्ता केवळ भाविकांच्या गर्दीनेच फुलून गेला होता. मंदिराकडे जाणार्‍या रस्त्यावर केवळ आणि केवळ भाविकांचे जथ्थेच दिसत होते. पहाटेपासूनच दर्शनासाठी मंदिरात रांगा लागल्या होत्या.पहाटे घंटानाद झाल्यानंतर काकड आरती झाली. यानंतर ‘श्री’च्या धार्मिक विधींना प्रारंभ झाला. पहाटे पाच वाजता पन्हाळ्याचे तहसीलदार रामचंद्र चोबे यांच्या हस्ते शासकीय अभिषेक झाला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, देवस्थानचे व्यवस्थापक लक्ष्मण डबाणे, महादेव दिंडे आदी उपस्थित होते. यानंतर ‘श्री’ची अलंकारी 

‘सरदारी’ रूपातील बैठी महापूजा बांधण्यात आली. विनोद मिटके, तुषार जुगर, गजानन आमाणे, सुमित भिवदर्णे, सचिन ठाकरे, बाबू सांगळे यांनी ‘श्री’ची पूजा बांधली. सकाळी दहा ते दुपारी बारा या वेळेत धुपारती झाली.कडाक्याच्या उन्हात अनवाणी पावलांनी सासनकाठ्या नाचवण्यात भाविक मग्‍नउन्हाचा तडाखा होता. मात्र, त्याचा कोणताच परिणाम भाविकांवर दिसत नव्हता. उन्हाच्या झळा बसत असूनही भाविकांचा उत्साह कमी होत नव्हता. उलट दर्शन रांग जसजशी पुढे जाईल, तसतसा उत्साह वाढतच होता. रणरणत्या उन्हाची कसलीही तमा न बाळगता, पायात चप्पल न घालता भाविक मोठ्या भक्‍तिभावाने सासनकाठ्या नाचवत होते. ढोल-ताशांचा कडकडाट, चांगभलंचा गजर आणि त्यात भक्‍तिरसात चिंब होणारे भाविक यामुळे जोतिबा डोंगरावरील वातावरण भक्‍तिमय झाले होते.

चांगला पाऊस पडू दे : पालकमंत्र्यांची प्रार्थना

दुपारी बारा वाजता पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे जोतिबा डोंगरावर आगमन झाले. त्यांनी ‘श्री’चे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी यावर्षी चांगला पाऊस पडू दे, सर्वांना सुखी, आनंदी आणि सुरक्षित ठेव, असे ‘श्री’ला साकडे घातले. यानंतर दुपारी दीड वाजता पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते मानाची पहिली सासनकाठी असलेल्या सातारा जिल्ह्यातील मौजे पाडळीची (निनाम) सासनकाठीची विधिवत पूजा करण्यात आली. यानंतर सासनकाठ्यांच्या मिरवणुकीला प्रारंभ झाला. शुभ्र टोप्या आणि शुभ्र वस्त्रे परिधान केलेले ग्रामस्थ फुलांच्या हारांनी सजवलेली गगनचुंबी सासनकाठी हलगी आणि ताशाच्या निनादात नाचवत पुढे नेत होते. त्यामागे मौजे विहे (ता. पाटण, जि. सातारा) येथील सासनकाठी होती. मिरज तालुक्यातील कसबे डिग्रज येथील सासनकाठी तिसर्‍या क्रमांकावर होती. एकापाठोपाठ एक अशा मानाच्या 150 सासनकाठ्या मिरवणुकीत सहभागी झाल्या होत्या. हत्ती, घोडे, उंट, तोफ, पालखी आदी विविध कलाकुसर केलेल्या सासनकाठ्या मिरवणूक मार्गावरून पुढे जाताना भाविकांत प्रचंड उत्साह संचारत होता. आकर्षक रंगांच्या सजावटीने सासनकाठी मिरवणूक अधिकच रंगतदार दिसत होती. सायंकाळी पाच वाजेपर्यंत सासनकाठ्या वाजतगाजत यमाई मंदिरात दाखल झाल्या.

यावेळी आ. सत्यजित पाटील-सरुडकर, आ. राजेश क्षीरसागर, आ. सतेज पाटील, आ. शंभुराजे देसाई, आ. बाळासाहेब पाटील, जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. शौमिका महाडिक, वाडी रत्नागिरीच्या सरपंच सौ. रिया सांगळे, जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमणार, पोलिस अधीक्षक संजय मोहिते, पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेश जाधव, सौ. वैशाली क्षीरसागर, शिवाजीराव जाधव, प्रमोद पाटील, संगीता खाडे, सचिव विजय पोवार, सहसचिव एस. एस. साळवी, पन्हाळ्याचे प्रांताधिकारी अजय पवार, अजितसिंह काटकर आदी उपस्थित होते.

जोतिबा पालखी सोहळा

सायंकाळी 5.45 वाजता तोफेची सलामी झाली. यानंतर पारंपरिक लवाजम्यासह श्री जोतिबाची पालखी यमाई देवीच्या भेटीसाठी बाहेर पडली. सायंकाळी 6.45 वाजता गोरज मुहूर्तावर जमदग्‍नी आणि रेणुका मातेचा विवाह सोहळा झाला. सायंकाळी 7.30 वाजता श्री जोतिबा पालखी परत येऊन मंदिरातील सदरेवर विराजमान झाली. रात्री नऊ वाजता तोफेची सलामी होऊन चैत्रपालखी सोहळ्याची सांगता झाली. यानंतर भाविकांना दर्शनासाठी रात्रभर मंदिर खुले ठेवण्यात आले. दुपारनंतर जिल्ह्यातील भाविकांची डोंगरावर गर्दी झाली. यामुळे सायंकाळनंतरही दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या.

जोतिबा विकासाचे काम वर्षभरात पूर्ण : पालकमंत्री

जोतिबा विकास आराखड्याचे 25 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. यापैकी पाच कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. त्यातून केल्या जाणार्‍या कामांचे टेंडर काढण्यात आले आहे. येत्या काही दिवसांत या कामाला प्रत्यक्ष सुरुवात होईल, तसेच अन्य निधीही उपलब्ध करून देऊन पुढील यात्रेपूर्वी जोतिबा विकास आराखड्यातील बहुतांशी कामे पूर्ण केली जातील, असा विश्‍वास पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी व्यक्‍त केला.

यावर्षी चांगला पाऊस पडू दे, चांगली पिके येऊ देत, चांगले उत्पादन होऊ दे, त्याला चांगला भाव मिळू दे, म्हणजे शेतकर्‍याला काही द्यावे लागणार नाही. तो सुखी आणि समाधानी होईल, असे साकडे दख्खनच्या राजाला घातले, असे सांगत पाटील म्हणाले, 12 लाख कोटींची विदेशी गुंतवणूक झाली आहे, ती व्यवहारात येऊ दे, शहरातील बेरोजगारी कमी होऊ दे, सर्व जनता सुखी, आनंदी आणि सुरक्षित राहू दे, असेही ‘श्री’चरणी साकडे घातल्याचे त्यांनी सांगितले.

दक्षिण दरवाजात चेंगराचेंगरी

दक्षिण दरवाजातून दर्शनासाठी येणार्‍या भाविकांना पोलिसांनी काही काळ रोखून धरले होते. सासनकाठी मिरवणूक सुरू असल्याने या दरवाजाबाहेर भाविकांची मोठी गर्दी झाली होती. दुपारी दोनच्या सुमारास हा दरवाजा उघडण्यात आला. यामुळे मोठ्या संख्येने भाविक मंदिरात आले. मंदिरात येणारे आणि बाहेर जाणारे भाविक मोठ्या संख्येने समोरासमोर आले. यावेळी दरवाजाची जागा तोकडी पडल्याने काही काळ चेंगराचेंगरी झाली. एक महिला व पुरुष भाविक खाली कोसळले, काही जण किरकोळ जखमी झाले. खाली पडलेल्या भाविकांना गर्दीतून सुखरूप बाहेर काढण्यात आले. या चेंगराचेंगरीने काही काळ दक्षिण दरवाजात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

वाहतुकीसह गर्दीचे नियोजन

चेंगराचेंगरीचे किरकोळ प्रकार वगळता यात्रा सुरळीत पार पडली. वाहतुकीसह गर्दीचेही नियोजन करण्यात आले होते. डोंगरावरील अतिक्रमणे काढण्यात आल्याने रस्ते प्रशस्त झाले होते. त्यामुळे दरवेळी होणारी कोंडी तुलनेने खूप कमी होत होती. भाविकांना सहजपणे मार्ग काढत पुढे जाता येत होते. दर्शनासाठी येणारे भाविक आणि परत जाणारे भाविक, असे दुहेरी मार्ग केल्याने समोरासमोर भाविक येऊन होणारी गर्दी तुलनेने कमी जाणवत होती. दुकानांसाठीही बॅरिकेटिंग करण्यात आले होते. यामुळे दुकानासमोरील गर्दी आणि रस्त्यावरील गर्दी विभागली जात होती. दक्षिण दरवाजाबाहेर पादचारी उड्डाण पूल उभारण्यात आला होता. यामुळे मंदिराबाहेर जाणार्‍या भाविकांचा अडथळा होत नव्हता.

पार्किंग व्यवस्था

वाहनांसाठीही यावर्षी उत्तम पार्किंग व्यवस्था करण्यात आली होती. दुचाकी, चारचाकीसह टेम्पो-ट्रक-खासगी बस आदी मोठ्या वाहनांसह बैलगाड्यांच्या पार्किंगसाठीही विविध ठिकाणी नियोजन करण्यात आले होते. त्यानुसारच वाहने सोडली जात होती. एक पार्किंग फुल्ल झाले की, वाहने दुसर्‍या ठिकाणी वळवली जात होती. पार्किंगकडे जाणारे आणि तेथून बाहेर पडणारे असे वेगवेगळे रस्ते केल्याने पार्किंग ठिकाणीही वाहतुकीची कोंडी अभावानेच दिसत होती. केर्ली ते गायमुख हा मार्ग एकेरी करण्यात आला होता. डोंगरावर जाणारी वाहने या मार्गाने जात होती, तर डोंगरावरून येणारी वाहने गायमुखवरून दाणेवाडी, वाघबीळमार्गे कोल्हापूरकडे येत होती. यामुळे मार्गावर वाहतुकीची कोंडी जाणवत नव्हती. पोलिस अधीक्षक संजय मोहिते, अप्पर पोलिस अधीक्षक तिरूपती काकडे, पोलिस उपअधीक्षक आर. आर. पाटील, शहर वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ आदींनी रस्तेनिहाय केलेल्या नियोजनामुळे वाहतुकीची समस्या फारशी जाणवली नाही.

दुचाकी, भाविकांसाठी मोफत केएमटी सेवा

गायमुखाजवळ दुचाकीचे पार्किंग करण्यात येत होते. तेथून डोंगरावर जाण्यासाठी देवस्थान समितीच्या वतीने मोफत केएमटी बसची व्यवस्था करण्यात आली होती. यासह चालत जाणारे भाविकही या मोफत सेवेचा लाभ घेत होते. झंवर ग्रुपच्या वतीनेही प्रतिवर्षीप्रमाणे पंचगंगा नदी घाट ते जोतिबा डोंगर अशी मोफत बससेवा राबविण्यात आली. बसमध्ये भाविकांना पाणी, सरबत, शेंगदाणा चिक्‍की दिली जात होती. या सेवेचा हजारो भाविकांनी लाभ घेतला. यावेळी निरज झंवर, रोहन झंवर, सौ.जिया झंवर, सौ. अंकिता झंवर, सौ.नीता झंवर, सौ. छाया सोमाणी आदी उपस्थित होते.

Tags : Kolhapur, Kolhapur News, Dakhan cha Raja Jotiba, Chaitra Yatra, celebrated,  Saturday, great enthusiasm,  traditional, atmosphere.


  •