Sat, Apr 20, 2019 15:53होमपेज › Kolhapur › ग्रामीण भागावरही डेग्यूचे सावट

ग्रामीण भागावरही डेग्यूचे सावट

Published On: Jul 11 2018 1:36AM | Last Updated: Jul 10 2018 11:03PMकोल्हापूर : प्रतिनिधी

जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या एकात्मिक डास निमूर्लन मोहिमेमुळे शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात डेंग्यूचे रुग्ण कमी असले तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत मात्र यंदा ग्रामीण भागात डेंग्यू रुग्णांची संख्या कमालीची वाढली असल्याचे आरोग्य विभागाच्या आकडेवारीवरून दिसून येते.डेंग्यूची साथ पसरण्यास सुरुवात झाल्यानंतर जिल्हा परिषद आरेाग्य विभागाच्या वतीने डास संहारक मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेत गावोगावी जाऊन लोकांचे प्रबोधन करण्याबरोबरच डास उत्त्पतीची स्थाने नष्ट करण्याचे काम सुरू आहे. त्याचप्रमाणे औषध फवारणीदेखील करण्यात येत आहे. मोहिमेत आतापर्यंत 11 हजार 82 गावांना भेटी देण्यात आल्या आहेत. त्यामध्ये डास अळ्या आढळून आलेल्या घरांची संख्या 911 इतकी असून, त्यापैकी 837 डास अळ्या नष्ट करण्यात आल्या आहेत. या मोहिमेत कोरडा दिवस पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यानुसार आतापर्यंत 71 गावांनी कोरडा दिवस पाळला आहे. मोहिमेत  536 डासांची स्थाने नष्ट करण्यात आली. याशिवाय पाण्यावर जळके ऑईल सोडणे, शक्य त्या ठिकाणी गप्पी मासे सोडणे, परिसराची स्वच्छता करणे आदी कामेही या मोहिमेत करण्यात आली आहेत. 

प्राथमिक आरेाग्य केंद्रांच्या कार्यक्षेत्रातील ताप आलेल्या रुग्णांचे 53 रक्‍त नमुने तपासण्यात आले. आळते व अंबप (ता. हातकणंगले) उचगाव व इस्पुर्ली (ता. करवीर), पिंपळगाव (ता. भुदरगड) व उत्तूर (ता. आजरा) या गावातील हे रक्‍त नमुने घेण्यात आले होते. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी ग्रामीण भागात डेंग्यूच्या रुग्णांच्या संख्येत वाढ झालेली दिसते. 2017 मध्ये जून महिन्यात केवळ 11 रुग्ण आढळून आले होते. यावर्षी 49 रुग्ण आढळून आले आहेत. मे महिन्यात देखील अशीच स्थिती होती. गेल्या वर्षी 9 रुग्णा आढळून आले होते तर यावर्षी डेंग्यूचे 19 रुग्ण आढळून आले आहेत. जानेवारीपासून ग्रामीण भागात 103 डेंग्यूचे रुग्ण आढळून आले आहेत.डेंग्यू सदृश्य रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन, आरोग्य प्रशासनाने युध्दपतळीवर जनजागृती सुरू केली आहे. या डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी युद्धपातळीवर मोहीम आखण्यात येत असून प्रशासनासह आता ग्रामस्थांनीही या मोहीमेच्या पार्श्‍वभूमीवर सजग राहणे गरजेचे आहे.