Sun, Oct 20, 2019 01:08होमपेज › Kolhapur › सरकारच्या शिक्षण खात्याला सुबुद्धी दे : डॉ. श्रीपाल सबनिस

सरकारच्या शिक्षण खात्याला सुबुद्धी दे : डॉ. श्रीपाल सबनिस

Published On: Apr 07 2018 2:33PM | Last Updated: Apr 07 2018 2:33PMकोल्हापूर : प्रतिनिधी

शिक्षणाचे भवितव्य मुलांच्या भवितव्याशी जोडलेले आहे. शाळा आणि मुलांचे भवितव्य राज्य व देश व जगाशी जोडले गेले आहे. त्यामुळे पुरोगामी महाराष्ट्र सरकारच्या शिक्षण खात्याला लवकर जाग यावी, सुबुध्दी मिळावी. लोकशाहीला घातक आत्मघातकी निर्णय त्यांनी बंद करावेत, अशी टीका 89 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, ज्येष्ठ विचारवंत डॉ.श्रीपाल सबनीस यांच्या राज्य सरकारच्या शैक्षणिक धोरणावर केली.

कदमवाडी-भोसलेवाडी येथे व्याख्यानानिमित्त आलेल्या डॉ. सबनीस यांनी माध्यम प्रतिनिधी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, महात्मा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या शैक्षणिक विचारांना सुसंगत अशी व्यवस्था सध्याचे सरकार करु शकत नाही हे सिध्द झाले आहे. गरिबांच्या मुलांना शाळा, महाविद्यालयात शिकणे अवघड झाले आहे. विद्यार्थ्यांची संख्या वाढत असताना सकारचे शाळा बंद करण्याचे धोरण हे संविधान व मानवतेच्या विरोधी आहे. शिक्षण व्यवस्था ही गरिबांच्या मुलांसाठी असले पाहिजे, मात्र शासनाला गरिबीची जाणीव नसल्याचे दिसत आहे. 

शिक्षण हे नफेखोरे साधन नसून ती राष्ट्रासाठी केलेली गुंतवणूक आहे. शिक्षणक्षेत्रात नवीन निर्णय घेऊन लगेच मागे घेतले जातात हे लोकशाही राज्यात योग्य आहे असे वाटत नाही. त्यामुळे शिक्षणाच्या बाबतीत अधिक सुधारणा होणे आवश्यक आहे. गावातील आणि वाडी-वस्तीवरील प्रत्येक शाळा जगली पाहिजे. देशाचे नेतृत्व कठीण परिस्थितीत अनेकवेळा महाराष्ट्राने केले आहे. परंतु हे नेतृत्व कुपोषित होत असेल तर पुढची पिढी महाराष्ट्राचे नेतृत्व करण्यासाठी समर्थ ठरु शकणार नाही. हे सांस्कृतिक पाप सध्याचे सरकार करीत आहे. मतभेद आणि आदर्श हा वेगळा मुद्दा असला तरी लोकशाहीला सुसंगत शिक्षणाची विकेंद्रीत व्यवस्था महत्वाची असल्याचे डॉ. सबनीस म्हणाले.