Fri, Jul 19, 2019 07:52होमपेज › Kolhapur › डी.जे. व साथीदारांची येरवड्याला रवानगी

डी.जे. व साथीदारांची येरवड्याला रवानगी

Published On: Apr 26 2018 1:23AM | Last Updated: Apr 26 2018 1:18AMकोल्हापूर : प्रतिनिधी

पाचगाव (ता. करवीर) येथील माजी सरपंच अशोक पाटील खूनप्रकरणी आजन्म कारावासाची शिक्षा झालेल्या प्रतिस्पर्धी टोळीचा म्होरक्या दिलीप जाधव ऊर्फ डी.जे.सह टोळीतील पाचही कैद्यांना शस्त्रधारी पोलिसांच्या बंदोबस्तात बुधवारी पुण्यातील येरवडा कारागृहात हलविण्यात आले. धनाजी गाडगीळ खूनप्रकरणी आजन्म कारावास झालेल्या अशोक पाटील याच्या दोन मुलांसह अन्य सहा जणांना अन्यत्र हलविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.दोन गटांतील साथीदारांना शिक्षेनंतर एकाच कारागृहात ठेवण्यात आल्याने सुरक्षिततेच्या कारणावरून कळंबा कारागृहात तणाव होता. दोन्हीही गटातील कैदी एकमेकांसमोर येऊ नयेत, यासाठी सुरक्षारक्षक दोन दिवस डोळ्यात तेल घालून ड्युटी बजावत होते.

डी.जे.सह त्याच्या साथीदारांना एका स्वतंत्र, तर अशोक पाटील याच्या मुलासह सहा जणांना स्वतंत्र बरॅकमध्ये ठेवण्यात आले होते. दोनही बरॅकसमोर शस्त्रधारी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दोनही गट कोणत्याही क्षणी समोरासमोर आल्यास शांतता-सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ शकतो, ही शक्यता गृहीत धरून कारागृह अधीक्षक शरद शेळके यांनी दोनही गटातील कैद्यांना तातडीने अन्यत्र हलविण्याचा प्रस्ताव कारागृह महानिरीक्षकांना सादर केला होता. त्यावर डी. जे.सह साथीदारांना येरवडा कारागृहात हलविण्याचे आदेश प्राप्त झाल्यानंतर आज दुपारी त्यांना प्रचंड बंदोबस्तात पुण्याला हलविण्यात आल्याचे अधीक्षक शेळके यांनी सांगितले.अशोक पाटील याच्या दोन मुलांसह अन्य साथीदारांनाही नाशिक अथवा नागपूर कारागृहात हलविण्याबाबत एक-दोन दिवसांत निर्णय शक्य आहे, असेही सांगण्यात आले.

Tags : Kolhapur, D J, partners, moved,  Yerawada Central Jail