होमपेज › Kolhapur › सायबर क्राईमचा विळखा बनतोय सर्वव्यापी!

सायबर क्राईमचा विळखा बनतोय सर्वव्यापी!

Published On: Feb 14 2018 2:52AM | Last Updated: Feb 14 2018 1:20AMकोल्हापूर : सुनील कदम

माहिती-तंत्रज्ञानाच्या या युगात इंटरनेटच्या माध्यमातून जवळ जवळ संपूर्ण जगच परस्परांशी जोडले गेले आहे. ज्या प्रमाणात आपणाला माहिती-तंत्रज्ञानाच्या जाळ्याने परस्परांशी जोडले आहे, त्याच किंवा त्याहून अधिक मोठ्या प्रमाणात आपल्याभोवती ‘सायबर गुन्हेगारीचा’ विळखा आवळत चाललाय, याची अनेकांना जाणीव नाही.
आजकाल संगणकाच्या माध्यमातून आणि वापरातून आपल्या आजुबाजूला गुन्हेगारी क्षेत्रात घडत असलेल्या घटना विचारात घेता सायबर गुन्हेगारांनी आपल्या सभोवती ‘सायबर सापळा’ लावल्याची जाणीव झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे सायबर क्राईमशी आपला काही संबंध नाही, असे समजून भविष्यात कुणालाही त्यापासून अलिप्त राहता येणार नाही. कारण सायबर  गुन्हेगारांनी आजकाल झाडून सगळ्या क्षेत्रांमध्ये आपले प्रताप दाखवायला सुरूवात केली आहे.

सायबर क्राईम या प्रकाराबाबत समाजात अजूनही आवश्यक त्या प्रमाणात जागरूकता झाल्याचे दिसत नाही, प्रामुख्याने ग्रामीण भागातील जनता अजूनही गुन्हेगारी विश्‍वातील या प्रांताशी म्हणावी तशी परिचित झालेली दिसत नाही. त्याचप्रमाणे सायबर गुन्हेगारी ही प्रामुख्याने संगणकाशी संबंधित असल्याचाही अनेकांचा गैरसमज आहे. मात्र, मोबाईलच्या रूपाने सायबर गुन्हेगारांनी जवळ जवळ प्रत्येकाच्या खिशात आणि घराघरांत शिरकाव केल्याची अनेकांना जाणीव नाही.  आपण कल्पनाही करू शकणार नाही, इतके सायबर गुन्हेगारांचे विश्‍व व्यापक बनले आहे आणि त्यामुळेच भविष्यात प्रत्येकानेच आपण या सायबर सापळ्यात न फसण्यासाठी दक्षता घेण्याची आवश्यकता आहे.
सायबर गुन्हेगारीचे प्रामुख्याने पाच प्रकार दिसत असले तरी या प्रत्येक प्रकाराचे शेकडो उपप्रकारही असल्याचे दिसून येते. संगणकातील माहिती चोरून त्याचा गैरवापर करणे हा यातील पहिला प्रकार आहे. या माध्यमातून हॅकर (संगणक गुन्हेगार) शेकडो गुन्हे करू शकतात. जसे की एखाद्या कंपनीची गोपनीय माहिती दुसर्‍या प्रतिस्पर्धी कंपनीला पुरविणे, एखाद्या राष्ट्राची माहिती दुसर्‍या राष्ट्राला पुरविणे किंवा विकणे, इत्यादी. वैयक्तिक पातळीवरही असे प्रकार होऊ शकतात. जेणेकरून संबंधिताचे वैयक्तिक, सामाजिक, औद्योगिक आणि आर्थिक आयुष्याचे खोबरे होऊ शकते.

यातील दुसरा प्रकार म्हणजे सायबर स्टॉकिंग. या प्रकारात संगणक गुन्हेगार सर्फिंग अथवा चॅटिंगच्या माध्यमातून एखादा व्हायरस आपल्या संगणक अथवा मोबाईल प्रणालीमध्ये घुसवून एखाद्याच्या दैनंदिन आणि आर्थिक व्यवहाराची माहिती मिळवू शकतात. त्याचा गैरवापर करून संबंधिताला गंडा घातला जाऊ शकतो. तिसरा प्रकार आहे हॉकिंगचा. या प्रकारात एखाद्याच्या संगणक प्रणालीमध्ये अनधिकृत मार्गाने प्रवेश करून व्हायरसद्वारे ती संगणक प्रणाली मोडीत काढली जाते किंवा बिघडविली जाते. प्रामुख्याने ऑनलाईन व्यवहारात या प्रकाराशी निगडित गुन्हे घडताना दिसतात.

चौथा प्रकार आहे एखाद्या संगणक प्रणालीवर व्हायरस हल्ला करण्याचा. या माध्यमातून एखादी संगणक प्रणाली गुन्हेगार स्वत:ला हवी तशी वापरू शकतात किंवा संबंधित वापरकर्त्यांच्या नियंत्रणबाह्य बनवू शकतात. ट्रोजन व्हायरसने या माध्यमातून काही दिवसांपूर्वी जगभर धुमाकूळ घातल्याचे उदाहरण ताजेच आहे. 
पाचवा प्रकार म्हणजे पोर्नोग्राफी, अश्‍लील चित्रफिती किंवा मजकूर बनविणे, त्याची विक्री करणे किंवा त्या माध्यमातून एखाद्याची बदनामी करणे इत्यादी प्रकार यात येतात. या सगळ्या बाबी विचारात घेता सायबर गुन्हेगार आजकाल जवळपास प्रत्येकाच्या घरात डोकावत आहेत, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.