Mon, Jun 24, 2019 16:37होमपेज › Kolhapur › महिला, युवतींसह लहान मुलांना जास्त धोका!

महिला, युवतींसह लहान मुलांना जास्त धोका!

Published On: Feb 18 2018 1:58AM | Last Updated: Feb 18 2018 12:51AMकोल्हापूर : सुनील कदम

सायबर गुन्हेगारांपासून लहान मुले, महिला आणि तरुणींना सर्वाधिक धोका संभवत असल्याचे या बाबतीत वेळोवेळी उघडकीस आलेल्या गुन्ह्यांमधून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या बाबतीत सतर्कता बाळगण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे पालकांनी मुलांच्या मोबाईल आणि संगणक वापरावर काही प्रमाणात नियंत्रण आणि नजर ठेवण्याची आवश्यकता आहे. या क्षेत्रात महिलांच्या आणि त्यातही प्रामुख्याने युवतींच्या बाबतीत घडत असलेल्या गुन्ह्यांचे प्रमाण विचारात घेता त्यांनी विशेष सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.

अनेकवेळा पालकांकडून आपल्या मुलांना कधी गरज म्हणून, कधी हट्ट म्हणून तर कधी लाडाने मोबाईल फोन पुरविले जातात. त्यामुळे आजकाल लहान वयातील शालेय मुलांमध्येसुद्धा स्मार्टफोनची क्रेज निर्माण झाली आहे. या माध्यमातून ही मुले आज सहजासहजी व्हॉटस् अ‍ॅप, फेसबुक आणि इंटरनेट वापरताना दिसतात. मात्र, आपली मुले या स्मार्टफोनचा वापर नेमका कशासाठी करतात, याकडे पालकांचे लक्ष असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आपल्या देशात जरी पोर्नोग्राफीला बंदी असली तरी इंटरनेटवर त्याबाबत कोणत्याही मर्यादा नाहीत.

त्यामुळे इंटरनेट वापरता वापरता मुले या पाशात अडकू शकतात. दुसरी बाब म्हणजे मुलांना धमकावून त्यांच्या मदतीने सायबर गुन्हेगारांनी काही गुन्हे केल्याचे प्रकारही समोर आले आहेत. स्मार्ट मोबाईलवर अगदी सहजासहजी अनेक प्रकारच्या गेम उपलब्ध होऊ शकतात. मात्र, यापैकी अनेक गेम या मुलांना सवयीचे गुलाम बनविणार्‍या स्वरूपाच्या आणि काही काही गेम तर मुलांसाठी जीवघेण्या स्वरूपाच्या आहेत. या बाबतीत ‘ब्ल्यू व्हेल’ या गेमचे उदाहरण सर्वांसमोर आहेच. या गेमच्या नादी लागून आजपर्यंत जगभरातील आणि आपल्या राज्यातीलसुद्धा काही मुलांनी प्राण गमावण्याच्या घटना घडलेल्या आहेत.

काही मुलांकडे जरी स्मार्टफोन अथवा स्वतंत्र संगणक नसले तरी अशीही मुले आपल्या पालकांचे स्मार्टफोन अनेकवेळा वापरताना दिसतात. त्यामुळे त्यांना पालकांच्या वेगवेगळ्या स्वरूपाच्या पासवर्डसह इतरही अनेक स्वरूपाची माहिती असते. अशावेळी कुणा त्रयस्थ व्यक्तींकडून या मुलांमार्फत पालकांची किंवा संपूर्ण कुटुंबाची वैयक्तिक आणि गोपनीय माहिती ‘हॅक’ केली जाऊ शकते. त्याचा वापर करून सायबर गुन्हेगार कोणत्याही प्रकारचे गुन्हे करू शकतात. त्यामुळे मुलांच्या स्मार्टफोन आणि संगणक वापराबाबत पालकांनी अत्यंत दक्षता घेण्याची गरज आहे. सायबर गुन्हेगारीत महिलांविषयक घडणार्‍या गुन्ह्यांचे प्रमाण लक्षणीय असून दिवसेंदिवस त्यामध्ये वाढ होताना दिसत आहे.

अनेकवेळा महिला आणि युवतींच्या व्हॉटस् अ‍ॅप आणि फेसबुक वापरात त्यांचा छानसा फोटो डाऊनलोड केलेला दिसतो. मात्र, या फोटोशी एखाद्या सायबर गुन्हेगाराला विकृत पद्धतीने छेडछाड करणे सहज शक्य होते. त्याचप्रमाणे व्हॉटस् अ‍ॅप आणि फेसबुकच्या माध्यमातून युवतींना आपल्या जाळ्यात ओढून त्यांच्या फसवणुकीचे प्रकारही मोठ्या प्रमाणात समोर येताना दिसत आहेत. त्यामुळे या माध्यमातून कुणाचीही फ्रेंडशिप स्वीकारताना किंवा कुणाशी ऑनलाईन चॅटिंग करताना महिला आणि प्रामुख्याने युवतींनी प्रत्येक पाऊल पारखून-निरखून टाकण्याची आवश्यकता आहे. आजकाल शिक्षण, नोकरी आणि व्यवसायाच्या निमित्ताने महिलांना मोठ्या प्रमाणात या यंत्रणेचा आधार घ्यावा लागतो. मात्र, याच यंत्रणेचा वापर करून कुणी आपला गैरफायदा तर घेणार नाही ना, याची त्यांनी दक्षता घेण्याची गरज आहे.