Fri, May 24, 2019 02:30होमपेज › Kolhapur › कोट्यवधींच्या आरटीओ नाक्याचे काम अर्धवट

कोट्यवधींच्या आरटीओ नाक्याचे काम अर्धवट

Published On: Jan 17 2018 1:57AM | Last Updated: Jan 16 2018 11:29PM

बुकमार्क करा
कागल : बा. ल. वंदूरकर

कागल येथे अंदाजे 80 ते 90 कोटी रुपये खर्च करून नव्याने उभारण्यात येत असलेल्या ‘आरटीओ’ नाक्याचे काम गेल्या वर्षभरापासून अर्धवट अवस्थेत पडून आहे. याकडे शासनाचे अधिकारी, ठेकेदार आणि एजन्सीकडून दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे कोट्यवधी रुपयांच्या इमारती वापराविना पडून आहेत. देखभाल आणि दुरुस्ती, तसेच वापर होत नसल्याने इमारतीला ठिकठिकाणी भेगा पडत आहेत. प्रशस्त जागेचा वापर सध्या रात्रीच्या वेळी मद्यपींकडून होत आहे. तर ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना मॉर्निंग वॉक आणि सायंकाळी फिरण्यासाठी मात्र ही जागा सोयीची ठरली आहे. तरुणांकडून क्रिकेट खेळण्याकरितादेखील या जागेचा चांगला वापर होत आहे. या परिसरात कोणत्याही प्रकारची विजेची सोय नाही, पाणी नाही; मात्र विजेची साधने सध्या धूळखात पडून आहेत.

‘आरटीओ’ नाक्याच्या उभारणीकरिता अंदाजे 42 एकरांवर रस्त्याच्या दोन्ही बाजूंना बांधकामे करण्यात आली आहेत. कार्यालय तसेच अधिकारी, कर्मचारी यांना राहण्याकरिता आणि गोडावूनसाठी दोन्ही बाजूंना इमारती बांधण्यात आल्या आहेत. वाहनांच्या पार्किंगसाठीदेखील जागा ठेवण्यात आली आहे. नाक्याच्या उभारणीचे काम अद्ययावत करण्यात येत आहे. सर्व सोयींनीयुक्त नाका उभारण्यात येत आहे; मात्र अद्यापही काही कामे अर्धवट अवस्थेत पडून आहेत. 

गेल्या वर्षभरापासून नाक्यावर कोणत्याही प्रकारची हालचाल दिसून येत नाही. बेवारस स्थितीत इमारती वापराविना पडून आहेत. गेल्या काही दिवसांपासून दोन्ही बाजूंना एखाददुसरा कर्मचारी दिवसा उभा असतो. कोणी आले, तर त्यांना का आल्याचे विचारतात, गाडीचा क्रमांक घेतात इतकेच. या नाक्यावर रात्रीच्या वेळी अंधार पसरलेला असतो. या अंधाराचा फायदा घेऊन जागेचा वापर मद्यपींकडून होत असल्याचे दिसून येते. इमारतींच्या आजूबाजूला रिकाम्या जागेत मद्याच्या रिकाम्या बाटल्या पडलेल्या दिसून येतात. याकडे कोणाचेही लक्ष नाही. जागेत अस्वच्छता निर्माण झाली आहे. इमारतींच्या आजूबाजूला तयार करण्यात आलेला बगीचा वाळून गेला आहे. झाडे सुकलेली आहेत. गोडावून आणि रहिवासासाठी बांधण्यात आलेल्या इमारतींना तडे जाऊ लागले आहेत.

दरम्यान, नाक्याचे बांधकाम पूर्ण होत आले, तरी नाक्याला चौपदरी महामार्ग जोडण्याचे काम झालेले नाही. या कामाला शासनाने परवानगी दिली आहे किंवा नाही याबाबत अधिकृत माहिती मिळत नसली, तरी जोडण्याचे काम अदापही सुरू करण्यात आले नाही. तसेच नाक्याच्या आजूबाजूच्या शेतकर्‍यांच्या अडचणी दूर करण्यात आल्या नाहीत. नाक्यातील पाणी बाजूच्या शेतकर्‍यांच्या शेतात साचून जमीन नापिक बनत आहे, अशा अनेक शेतकर्‍यांच्या तक्रारी आहेत. याची दखल घेण्यात येत नाही. राज्याचे बांधकाममंत्री ना. चंद्रकांत पाटील हे कोल्हापूरचे आहेत. ते अनेक वेळा कागल येथे उभारण्यात येत असलेला नाका पार करून गडहिंग्लज व इतर ठिकाणी जात-येत असतात. त्यांनी या कामाची दखल घ्यावी, अशी मागणी होत आहे.