Thu, Jul 18, 2019 02:17होमपेज › Kolhapur › काल हमीभावात वाढ,आज विक्री दरात 

काल हमीभावात वाढ,आज विक्री दरात 

Published On: Jul 06 2018 1:32AM | Last Updated: Jul 06 2018 12:11AMकोल्हापूर : प्रतिनिधी

केंद्र सरकारने चौदा पिकांच्या हमीभावात बुधवारी (ता. 5) वाढ केल्यानंतर गुरुवारी याच पिकांच्या किमतीत घाऊक बाजारात प्रतिक्‍विंटल 200 ते 250 रुपयांची वाढ झाली. हे हमीभाव उत्पादन खर्चाच्या दुप्पट असल्याचा दावा सरकारचा असला, तरी त्यांच्या पदरात तो भाव पडण्यापूर्वीच ग्राहकाच्या खिशाला मात्र अचानक वाढलेल्या दरामुळे कात्री लागली आहे. 

जाहीर केलेले हमीभाव सध्या साठा केलेल्या पिकाला मिळणार की यावर्षीच्या खरीप हंगामातील पिकाला मिळणार याविषयी शेतकर्‍यांतच संभ्रमावस्था आहे. त्यातून शेतकर्‍यांनी आपल्याकडील यापूर्वीचा साठा तसाच ठेवला आहे. त्यामुळे मागणीच्या तुलनेत बाजारात पुरवठाच कमी झाल्याने हे दर वाढल्याचे व्यापारीवर्गाचे मत आहे. केंद्र सरकारने भातासह मका, ज्वारी, बाजरी, नाचणी आदी 14 पिकांच्या हमीभावात वाढ केली. प्रत्यक्षात वाढीव दराप्रमाणे शेतकर्‍यांना कधी पैसे मिळणार हे निश्‍चित नाही; पण दुसरीकडे बाजारातील याच धान्यांच्या दरात मात्र मोठी वाढ झाल्याचे गुरुवारी दिसून आले. 

घाऊक बाजारात मूग प्रतिक्‍विंटल 6300 ते 6500 रुपये, तर उडीदडाळ प्रतिक्‍विंटल 5000 ते 5500 रुपये आहे. तूरडाळ प्रतिक्‍विंटल 5500 ते 5950 रुपये आहे. हरभराडाळ प्रतिक्‍विंटल 4650 ते 4950 रुपये आहे. गेल्या 15 दिवसांत हरभराडाळीच्या दरामध्ये प्रतिकिलो 4 ते 5 रुपयांनी वाढ झाली आहे. ज्वारीचे दर टिकून असून प्रतिक्‍विंटल 1700 ते 3000 रुपये आहे.

घाऊक बाजारात मागणी व पुरवठा यावर दर अवंलबून असतो. मागणी जास्त झाली आणि पुरवठा कमी असेल, तर दर वाढतात. हे अर्थशास्त्राचे तत्त्व आहे. त्यानुसारच या धान्यांचे दर वाढल्याचा दावा व्यापारीवर्गाकडून होत आहे. गेल्या महिन्याभरात चांगला पाऊस झाला नाही. त्यामुळे शेतकर्‍यांचे पेरण्यांचे गणित विस्कळीत झाले आहे. त्यातून त्यांच्याकडे असलेला धान्यसाठा बाजारात आलेला नाही. दरवाढी मागचे हेही एक कारण आहे. 

पुरवठा कमी असल्याने दरवाढ  : मिठारी

मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी असल्याने घाऊक बाजारातील धान्याचे दर वाढले आहेत. शेतकर्‍यांनाही वाढीव हमीभाव देऊन सरकारने दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे; पण हे भाव कधी मिळणार याविषयी शेतकर्‍यांच्यात संभ्रम आहे. त्यामुळे बाजारात धान्य शेतकर्‍यांनी आणले नाही. त्याचाही परिणाम दरवाढीवर झाल्याचे कोल्हापूर ग्रेन मर्चंट असोसिएशनचे माजी अध्यक्ष श्रीनिवास मिठारी यांनी सांगितले.