Fri, Jul 19, 2019 01:33होमपेज › Kolhapur › निम्मी फी भरून प्रवेश न देणार्‍या संस्थांवर फौजदारी

निम्मी फी भरून प्रवेश न देणार्‍या संस्थांवर फौजदारी

Published On: Aug 28 2018 1:26AM | Last Updated: Aug 28 2018 1:04AMकोल्हापूर : प्रतिनिधी

राजर्षी शाहू महाराज शिक्षण शुल्क योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना निम्मी फी भरून प्रवेश देण्याचे निर्देश सर्व महाविद्यालयांना राज्य सरकारने दिले आहेत. जी महाविद्यालये निम्मी फी भरून प्रवेश देणार नाहीत, प्रवेशास टाळाटाळ करतील, अशा शिक्षण संस्थांची परवानगी रद्द करण्याबरोबरच त्यांच्यावर फौजदारी दाखल करण्याचा इशारा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी दिला. यासंदर्भात मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत शासकीय आदेशात दुरुस्ती करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

राजर्षी शाहू महाराज शिक्षण शुल्क योजनेच्या प्रभावी अंमलबजावणी आढावा घेण्यासाठी शिवाजी विद्यापीठाच्या नॅनो टेक्नॉलॉजी विभागात आयोजित बैठकीनंतर पालकमंत्री पाटील प्रसारमाध्यमांशी बोलत होते. पालकमंत्री पाटील म्हणाले, डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह योजनेंतर्गत कोल्हापुरात राज्यातील पहिले मराठा विद्यार्थ्यांसाठीचे वसतिगृह सुरू करण्यात आले आहे. या वसतिगृहाची विद्यार्थी क्षमता 72 असून, आतापर्यंत 19 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. आवश्यकता भासल्यास आणखी एक वसतिगृह तयार केले जाईल. या योजनेंतर्गत सांगली येथे वसतिगृह तयार झाले आहे. आगामी काळात राज्यातील 10 जिल्ह्यांत मराठा विद्यार्थ्यांसाठीची वसतिगृहे सुरू केली जातील. या वसतिगृहात विद्यार्थ्यांनी रहायला यावे, असे आवाहनही त्यांनी केले. राजर्षी शाहू महाराज शिक्षण शुल्क योजना आणि निर्वाह भत्ता योजना यासंदर्भातील माहितीचे फलक सर्व महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांच्या माहितीसाठी महाविद्यालयाच्या प्रवेश द्वाराजवळ ठळकपणे लावावेत, असे निर्देशही पालकमंत्री पाटील यांनी यावेळी दिले.