Tue, Jul 23, 2019 06:29होमपेज › Kolhapur › खंडणीप्रकरणी पोलिस हवालदारासह तिघांविरुद्ध गुन्हा

खंडणीप्रकरणी पोलिस हवालदारासह तिघांविरुद्ध गुन्हा

Published On: Mar 01 2018 7:22PM | Last Updated: Mar 01 2018 7:22PMजयसिंगपूर : प्रतिनिधी

बांधकाम व्यावसायिकाला धमकी देऊन कमिशनपोटी आठ लाख रुपयांची मागणी केल्याप्रकरणी जयसिंगपूर (ता. शिरोळ) पोलिस ठाण्यातील हवालदार चव्हाणसह तिघांविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. हवालदारासह वैभव खामकर, विकी खामकर (रा. खामकर मळा, जयसिंगपूर) अशी संशयितांची नावे आहेत.

बांधकाम व्यावसायिक लक्ष्मण दादासाहेब कवाळे (वय 28, भारत पेट्रोल पंपाजवळ, आरग, ता. मिरज, जि. सांगली) यांनी जयसिंगपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. खामकर बंधूंच्या ओळखीने कवाळे यांना जयसिंगपूर येथील एका स्थानिक कॉलेजच्या बांधकामाचे यापूर्वी कंत्राट मिळाले होते. 

कमिशनपोटी व्यावसायिकाने खामकर बंधूंना यापूर्वीच चार लाख रुपये दिले होते. पुन्हा आठ लाख रुपयांसाठी त्याच्याकडून तगादा सुरू होता. बांधकाम व्यावसायिकाची मोटार अडवून पैसे द्या, अन्यथा सोडणार नाही, अशी धमकीही देण्यात आली होती. हवालदार चव्हाण यांनीही कवाळे यांना उद्देशून ‘काय विषय असेल तो मिटवून टाका’, असे सांगून समक्ष व दूरध्वनीद्वारेही पैशाची मागणी केल्याचे कवाळे यांनी फिर्यादीत नमूद केले आहे.

कवाळे यांनी स्थानिक पोलिस यंत्रणेकडे धाव घेतली असता, तक्रारीकडे दुर्लक्ष करण्यात आले.त्यामुळे बांधकाम व्यावसायिकाने बुधवारी (दि. 28) रोजी सकाळी विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांची भेट घेऊन लेखी तक्रार केली. 

विशेष पोलिस महानिरीक्षकांनी पोलिस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांच्याशी संपर्क साधून दोषींवर कारवाईच्या सूचना दिल्या, त्यानुसार हवालदार चव्हाण, खामकर बंधूंविरुद्ध खंडणी, अडवणूक करून धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. रात्री उशिरापर्यंत संशयितांना अटक झालेली नव्हती. खंडणीप्रकरणी हवालदाराविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल झाल्याने पोलिस वर्तुळात खळबळ माजली आहे.