Wed, Jan 23, 2019 14:46होमपेज › Kolhapur › फौजदाराला धक्‍काबुक्‍की; मनपा परिवहन सभापतीवर गुन्हा

फौजदाराला धक्‍काबुक्‍की; मनपा परिवहन सभापतीवर गुन्हा

Published On: Sep 11 2018 1:36AM | Last Updated: Sep 11 2018 1:26AMकोल्हापूर : प्रतिनिधी

शाहूपुरी पोलिस ठाण्यातील उपनिरीक्षक सचिन पांढरे व पोलिसांच्या अंगावर धावून जाऊन शिवीगाळ, धक्‍काबुक्‍की व धमकी दिल्याप्रकरणी मनपा परिवहन समितीचे सभापती राहुल सुभाष चव्हाण यांच्याविरुद्ध शाहूपुरी पोलिस ठाण्यात सोमवारी गुन्हा दाखल झाला. अटकेसाठी शाहूपुरी, रमणमळा, फॉर्महाऊसवर पोलिसांनी छापे टाकले. मात्र, ते सापडले नाहीत.

व्हीनस कॉर्नरजवळील एका हॉटेलसमोर रविवारी मध्यरात्री ही घटना घडली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये घटनाक्रम कैद झाला आहे. या प्रकाराची पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी दखल घेतली आहे. अटक टाळण्यासाठी चव्हाण मध्यरात्रीपासून पसार झाल्याचे पोलिस निरीक्षक संजय मोरे यांनी सांगितले.

रविवारी रात्री दोन गटांतील काही तरुण हॉटेलात जेवणासाठी आले होते. मालकांनी हॉटेल बंद झाल्याने जेवण मिळणार नाही, असे सांगितले. त्यानंतर दोन्हीही गटातील तरुणांत वादावादी, हाणामारी झाली. तणाव निर्माण झाला.

एका गटाने शिवसेनेचे नगरसेवक व परिवहन समिती सभापती राहुल चव्हाण यांच्याशी संपर्क साधला. चव्हाण समर्थकांसमवेत दाखल झाले. त्यांनी तरुणांची समजूत काढून वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. याच दरम्यान ‘शाहूपुरी’चे फौजदार पांढरे चौकात आले. जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. पांढरे यांनी चव्हाण यांच्यासह दोन्ही गटांतील तरुणांना घरी जाण्यास सांगितले.

यावेळी चव्हाण यांनी फौजदार पांढरे यांना ‘बघून घेतो, मी कोण आहे, माहीत आहे का?’ अशी भाषा वापरून धमकी दिल्याने वाद वाढला. चव्हाण फौजदारांच्या अंगावर धावून गेले. झटापट, शिवीगाळ, धक्‍काबुक्‍की झाली. फौजदारांनी वरिष्ठाधिकार्‍यांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली.  चव्हाण यांच्यावर शासकीय अधिकारी, कर्मचार्‍यांच्या अंगावर धावून जाऊन शिवीगाळ, धक्‍काबुक्‍की, धमकी दिल्याप्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.