Tue, Jul 16, 2019 01:47होमपेज › Kolhapur › शालिनी सिनेटोन पाडल्याप्रकरणी वटमुखत्यार चांगदेव घुमरेवर गुन्हा 

शालिनी सिनेटोन पाडल्याप्रकरणी वटमुखत्यार चांगदेव घुमरेवर गुन्हा 

Published On: Feb 09 2018 2:00AM | Last Updated: Feb 09 2018 12:14AMकोल्हापूर : प्रतिनिधी 

कोल्हापुरातील ऐतिहासिक शालिनी सिनेटोन पाडल्याप्रकरणी वटमुखत्यारधारक चांगदेव रामभाऊ घुमरे याच्यावर अखेर जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. महापालिकेच्या वतीने कनिष्ठ अभियंता अरुण गवळी यांनी फिर्याद दिली आहे. नगरसेवक भूपाल शेटे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. 

शहरातील ए वॉर्ड रि.स.नं. 1104 मधील भूखंड क्र. 5 व 6 ही जागा रंकाळा तलावाच्या पश्‍चिमेस असून त्यामध्ये शालिनी सिनेटोनच्या इमारती अस्तित्वात होत्या. कोल्हापूर शहर ऐतिहासिक असल्याने महत्त्वाच्या स्थळांची यादी करून त्यास 2003 मध्ये मान्यता झाली आहे. त्या ठरावात शालिनी सिनेटोन ही इमारत हेरिटेज स्थळांच्या यादीमध्ये ग्रेड 3  आहे. त्याप्रमाणे महाराष्ट्र शासन राजपत्र प्रसिद्ध झाले होते. 

जागा मालक तुकोजीराव कृष्णाजीराव पवार यांनी ए वॉर्ड रि.स. नं. 1104 क्षेत्र 1,93,800 चौ. मी. या जागेचा विकास करण्यासाठी मोनिटो एक्सस्पोर्टस् प्रा.लि., नाशिकतर्फे संचालक घुमरे यांना वटमुखत्यारपत्र दिले होते. घुमरे यांनी 25 मार्च 2004 ला दिलेल्या नोटराईज्ड हमीपत्रानुसार भूखंड क्र. 5 व 6 हे शालिनी सिनेटोनसाठी राखीव ठेवायचे आहेत, अशी अट नमूद करून 26 मार्च 2004 ला त्यांच्या रेखांकनास मंजुरी झाली आहे. हेरिटेज कमिटीच्या 21 जून 2017 झालेल्या बैठकीत अस्तित्वातील इमारती या हेतुतः यादीतून इमारतीचे नाव कमी करण्यात यावे यासाठी अनधिकृतरीत्या बांधकाम पाडल्याने संबंधितावर गुन्हा दाखल करण्यात यावे, असा निर्णय झाला आहे. तसेच कोल्हापूर शहराच्या मंजूर विकास नियंत्रण नियमावलीनुसार अस्तित्वातील बांधकामे पाडण्यापूर्वी महापालिकेची परवानगी घेणे आवश्यक होते. परंतु, इमारती पाडण्यास वटमुखत्यारधारक यांनी कोणतीही परवानगी घेतलेली नाही. शालिनी स्टुडिओच्या इमारती मे 2009 च्या सुमारास पाडण्यात आल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम 1966 चे कलम 52 नुसार वटमुखत्यारधारक घुमरे यांनी गुन्हा केला आहे. त्यानुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, असे गवळी यांनी तक्रार अर्जात म्हटले आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.