होमपेज › Kolhapur › क्रिकेटच्या इतिहासाचा खजिना खुला

क्रिकेटच्या इतिहासाचा खजिना खुला

Published On: Feb 05 2018 1:30AM | Last Updated: Feb 05 2018 12:30AMकोल्हापूर : क्रीडा प्रतिनिधी 

मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि भारतीय संघाचा कर्णधार व क्रिकेट मैदानावरील वादळ विराट कोहलीच्या बॅटसोबत सेल्फी काढण्याची संधी क्रीडाप्रेमी कोल्हापूरकरांनी आवर्जून साधली. कोल्हापूर क्रिकेट असो.च्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित ‘ब्लेडस् ऑफ ग्लोरी’ या क्रिकेट साहित्याचे विशेष प्रदर्शन क्रीडानगरी कोल्हापुरात आयोजित केले आहे. 

रविवारी राजर्षी शाहू स्मारक भवन येथे या प्रदर्शनाचे उद्घाटन आमदार राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते झाले. त्यांनी कोल्हापूरच्या क्रिकेट विकासासाठी भरघोस निधी देण्याची ग्वाही दिली. दरम्यान, जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी या प्रदर्शनाला भेट देऊन पाहणी करून माहिती घेतली. विशेष म्हणजे, सचिन व विराटच्या बॅटस्सोबत त्यांनी सेल्फीही घेतली.  

पुण्यातील उद्योजक व क्रिकेटप्रेमी रोहन पाटे यांच्या अथक प्रयत्न आणि परिश्रमातून क्रिकेटविषयीचे हे अनोखे प्रदर्शन निर्माण झाले आहे. कोल्हापुरात क्रिकेट या खेळाला लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्यापासूनची शतकी परंपरा आहे. इथल्या क्रिकेटप्रेमी व क्रीडा रसिकांना हा खजिना पाहता यावा आणि क्रिकेट असोसिएशनला मदतीचे पाठबळ मिळावे, या उद्देशाने प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. उद्घाटनावेळी केडीसीएचे अध्यक्ष आर. ए. तथा बाळ पाटणकर, ज्येष्ठ संचालक अण्णासाहेब हेरवाडे, उपाध्यक्ष चेतन चौगुले, सचिव रामेश कदम, ब्लेड ऑफ ग्लोरीचे अमोल माने, उद्योगपती व्ही. बी. पाटील, चाटे शिक्षण समूहाचे प्रा. डॉ. भारत खराटे आदी उपस्थित होते.

संग्रहालयात असलेल्या वस्तूंकडे केवळ शोभेच्या वस्तू किंवा ऐतिहासिक पाऊलखुणा म्हणून न पाहता, संग्रहालये किंवा त्या अनुषंगाने होणारी प्रदर्शने ही ज्ञानप्राप्तीसाठी असतात. पुन्हा-पुन्हा संग्रहालयात जाऊन ज्ञान घेणे आणि नवीन ज्ञान मिळवणे यासाठी प्रयत्नांची गरज आहे. भारतात ऐतिहासिक, वैज्ञानिक संग्रहालये आहेत. परंतु, खेळाचेही एक संग्रहालय जगप्रसिद्ध आहे. तेही आपल्या राज्यात पुणे येथे आहे. क्रिकेटवरील प्रेमासाठी क्रिकेटप्रेमी रोहन पाटे या क्रिकेट ध्येयवेड्याने ब्लेडस् ऑफ ग्लोरी हे क्रिकेटला वाहिलेले एकमेव संग्रहालय उभा केले आहे. क्रिकेटला वाहिलेले म्हणजे या ठिकाणी बॉलपासून हेल्मेटपर्यंत सारे काही आहे. या संग्रहालयातील प्रत्येक वस्तू प्रेरणा, स्फुरण देणार्‍या अशाच आहेत. प्रत्येक वस्तूमागे एक घटना, इतिहास दडला गेला आहे. या संग्रहालयातून प्रेरणा घेऊन नवीन खेळाडू उदयास आले पाहिजेत, हा हेतू असल्याचे बाळ पाटणकर यांनी प्रास्ताविकात सांगितले. स्वागत अभिजित भोसले यांनी केले, तर आभार केदार गयावळ यांनी मानले.