Thu, Jul 18, 2019 02:06होमपेज › Kolhapur › सीपीआर प्रशासनाची पकड ढिली

सीपीआर प्रशासनाची पकड ढिली

Published On: Jun 28 2018 1:32AM | Last Updated: Jun 28 2018 12:52AMकोल्हापूर : प्रतिनिधी 
गेल्या काही महिन्यांपासून सीपीआरमधील डॉक्टर, नर्सेससह इतर कर्मचार्‍यांचा मनमानी कारभार सुरू आहे. रुग्णांवर वेळेवर उपचार देण्यातही सीपीआर प्रशासन अपयशी ठरू  लागले आहे. मात्र, याचे गांभीर्य ना अभ्यागत समितीला ना प्रशासनातील वरिष्ठ अधिकार्‍यांना, अशीच परिस्थिती येथे पाहावयास मिळत आहे. एखादी गंभीर समस्या निर्माण होण्याअगोदर प्रशासनाने या सर्वांना ‘डोस’ देणे गरजेचे आहे. 

सीपीआर रुग्णालय डॉक्टरांचा निष्काळजीपणा, बोगस प्रमाणपत्रे, पैसे घेणारे कर्मचारी, औषधे अशा विविध कारणांनी चर्चेत होते. सीपीआर बचाव कृती समिती आणि विविध राजकीय पक्षांनी वेळोवेळी आंदोलने केल्याने रुग्णालयाचे आरोग्य सुधारत आहे. त्यातच गेल्या तीन वर्षांत अभ्यागत समितीमधील कर्तव्य दक्ष सदस्य, मंत्री, आमदार, खासदार यांनी शासकीय पातळीवर प्रयत्न करून सीपीआरला कोट्यवधी रुपये निधी मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला.त्यामुळेच येथे दर्जेदार सीटीस्कॅन, ट्रॉमा केअरसह शेंडा पार्क येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विविध सोयी सुविधांचे काम सुरू आहेत. दुसरीकडे कामचुकार कर्मचार्‍यांमुळे सीपीआर पुन्हा एका चर्चेत येऊ लागले आहे. हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच कर्मचारी निष्ठेने काम करत आहेत. 

सीपीआरला नवीन अधिष्ठाता मिळाला असून, त्यांच्याकडून सीपीआरबाबत अनेक अपेक्षा आहेत.प्रभारी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, प्रभारी अधिष्ठाता डॉ. रघूजी थोरात, वैद्यकीय अधीक्षक शिशिर मिरगुंडे यांनी प्रभारी पदभार सांभाळत सीपीआर रुग्णालयास उर्जीत अवस्था आणली आहे.पण गेल्या काही दिवसांपासून सीपीआर प्रशासनाची कर्मचार्‍यांवरील पकड ढिली झाली आहे. कोणाचाच कोणाशी ताळमेळ नसल्यासारखी परिस्थिती आहे. त्यामुळे रुग्णांसह नातेवाईकांत तीव्र नाराजी आहे. प्रभारी अधिकार्‍यांनी सीपीआरला कडक शिस्त लावली होती. त्यामुळेच बेेशिस्त व काम चुकार कर्मचार्‍यांना  जरब बसला होता. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पुन्हा बेशिस्त, कामचुकारांची मनमानी वाढली आहे. 

रुग्णसेवेपेक्षा काही डॉक्टर, परिचारक, परिचारिका, कर्मचार्‍यांना  रूग्णांना उपचाराऐवजी हॉटस्अपवर मनोरंजन करण्यात आनंद वाटतो. त्यामुळे तासंतास रुग्ण बेडवर उपचारांच्या प्रतीक्षेत पडून राहतो. सीपीआर प्रशासनाने कामचुकार कर्मचार्‍यांवर वेळीच कारवाई केली नाही तर एखादी गंभीर समस्या निर्माण होईल.