Thu, Apr 25, 2019 21:26होमपेज › Kolhapur › गाय दूध विक्री दरात २ रु. कपात

गाय दूध विक्री दरात २ रु. कपात

Published On: Jun 15 2018 1:05AM | Last Updated: Jun 15 2018 12:47AMकोल्हापूर : प्रतिनिधी 

गाईच्या दूध विक्री दरात प्रतिलिटर 2 रुपये कपात करण्याचा निर्णय कोल्हापूर जिल्हा दूध संघाने (गोकुळ) घेतला आहे. 21 जूनपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. राज्यातील खासगी व सहकारी अशा 16 दूध संघांनीही उद्यापासूनच गाईच्या दूध विक्री दरात प्रतिलिटर चार रुपयांची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. 

‘गोकुळ’कडे गाईचे दूध पाच लाख पन्‍नास हजार लिटर संकलित होते. यापैकी दोन लाख 20 हजार लिटर दुधाची विक्री होते. उर्वरित दुधापासून पावडर तयार केली जाते. सध्या आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत बाजारातही दूध पावडरचे दर कोसळले आहेत. शिवाय, मागणीही ठप्प आहे. गाय दूध खरेदी दरात वाढ करण्याच्या शासनाच्या सूचना असल्या व संघटनेचे आंदोलन सुरू असले, तरी पावडरच्या दरात वाढत होत नाही, तोपर्यंत खरेदी दरात वाढ अशक्य असल्याचे संघाचे मत आहे. 

दुसरीकडे ज्या ज्यावेळी दूध खरेदी दरात वाढ केली, त्यावेळी दूध विक्री दरातही वाढ करण्यात आली होती. सध्या ‘गोकुळ’चा गाय दूध खरेदीचा प्रतिलिटर दर 25 रुपये आहे, तर विक्रीचा हाच दर 44 रुपये आहे. दूध खरेदी दर वाढल्यानंतर ग्राहकांवर आर्थिक बोजा पडतो. सध्या खरेदी दरातच कपात केल्याने ग्राहकांचाही हा भार हलका व्हावा, यासाठी विक्री दरात प्रतिलिटर 2 रुपये कपात करण्याचा निर्णय ‘गोकुळ’ने घेतला आहे. या निर्णयाने गाय दूध विक्रीत वाढ होण्याची शक्यता आहे. 

राज्यातील 16 दूध संघांनी मात्र उद्यापासून गाईच्या दूध विक्री दरात प्रतिलिटर 4 रुपयांची कपात केली आहे. हा निर्णय घेतलेल्या संघांत सोनाई, गोविंद, स्वराज, जे. डी. थोटे, माउली, नॅचरल, कन्हैय्या, गोशक्‍ती आदी संघांचा समावेश आहे.