Thu, Apr 25, 2019 13:29होमपेज › Kolhapur › गाय दूध उत्पादक वार्‍यावर!

गाय दूध उत्पादक वार्‍यावर!

Published On: Jun 25 2018 1:47AM | Last Updated: Jun 25 2018 12:26AMकोल्हापूर : प्रतिनिधी 

गाय दूध संकलन व दराबाबत संघांकडून मनमानी सुरू आहे. दुसरीकडे दर कमी करणाऱया संघावर कारवाईचे दिलेले शासनाचे आश्‍वासनही हवेत आहे, अशा परिस्थितीत गाय दूध उत्पादकाला कोणी वालीच नसल्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे. कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाने गायीच्या विक्री दरात प्रति लिटर दोन रुपयांची कपात करताना तेवढीच कपात खरेदी दरातही केली आहे. 21 जूनपासून या निर्णयाची अंमलबजवणी सुरू झाली.  गायीच्या दुधापासून पावडर बनवली जाते, या पावडरचे आंतरराष्ट्रीय बाजारातील दर कोसळले आहेत. दुसरीकडे पावडरची मागणीही ठप्प आहे. ही कारणे सांगून संघांनी गायीच्या दूध खरेदी व विक्री दरात कपात केली आहे. 

राज्य शासनाने गायीचा प्रति लिटर दर 26 रुपये निश्‍चित केला आहे. या दरापेक्षा कमी दराने दूध खरेदी करणार्‍या संघावर कारवाईचा इशारा दिला होता. तरीही संघांनी आहे त्या दरात प्रति लिटर दोन रुपयांची कपात केली. त्यामुळे गोकुळसह राज्यातील 16 संघांना संचालक मंडळ बरखास्तीचा इशारा नोटिसीद्वारे दिला गेला. या निर्णयाविरोधात संघांनी दुग्धविकास मंत्री प्रा. महादेव जानकर यांच्याकडे दाद मागितली. काही संघांनी न्यायालयाचेही दरवाजे ठोठावले. मंत्र्यांनी या निर्णयाला तात्पुरती स्थगिती दिली. त्यामुळे संघांवरील कारवाई टळली. त्यानंतर गायीच्या दूध खरेदी दरात कपात होणार नाही असे वाटत होते, पण गेल्या आठवड्यात गोकुळसह राज्यातील इतर 16 संघांनी गाय दुधाच्या विक्री दराबरोबरच खरेदी दरातही कपात करून शासनाच्या आदेशालाच केराची टोपली दाखवली. 

म्हशीच्या तुलनेत जातिवंत गायीची दूध उत्पादकता जास्त आहे. त्यामुळे अलीकडच्या काही वर्षांत म्हशीपेक्षा गायीच्या दूध उत्पादनाकडे शेतकरी वळला आहे. मुक्‍त गोठा पद्धत व त्यासाठी मिळणार्‍या अनुदानामुळे अनेक म्हैस दूध उत्पादकांनी गायींची संख्या वाढवली आहे. पूर्वी गोकुळकडे एकूण दूध संकलनाच्या 80 टक्के म्हैस दूध तर उर्वरित 20 टक्के गाय दूध संकलित होत होते. आता हेच म्हैस दुधापेक्षा गायीचे संकलन जास्त झाले आहे. दुसरीकडे गायीच्या दुधापासून तयार करण्यात येणार्‍या पावडरला बाजारात मागणी नाही, दरही कोसळले आहे. त्यामुळे संघांसमोर अडचणी आल्याने संघांनी दूध खरेदी व विक्री दरातच कपात केली. त्याचा फटका मात्र गाय दूध उत्पादकांना बसला आहे.+

प्रति लिटर 19 रुपयांचा तोटा

‘गोकुळ’कडून कार्यक्षेत्रात प्रति लिटर 23 रुपये तर कार्यक्षेत्राबाहेर प्रति लिटर 18 रुपये दराने गाय दुधाची खरेदी केली जाते. हेच दूध प्रक्रिया करून प्रति लिटर 42 रुपये दराने विकले जाते. दरातील ही तफावत पाहता शेतकर्‍यांना प्रति लिटर 19 रुपयांचा तोटा सहन करावा लागतो.