Mon, Jun 17, 2019 14:18होमपेज › Kolhapur › देशव्यापी चक्काजाम : महामार्गावर ट्रकच्या काचा फोडल्या

देशव्यापी चक्काजाम : महामार्गावर ट्रकच्या काचा फोडल्या

Published On: Jul 23 2018 1:08AM | Last Updated: Jul 23 2018 1:00AMकोल्हापूर : प्रतिनिधी

वाहतूकदारांचे विविध मागण्यांसाठी सुरू असलेले देशव्यापी चक्काजाम आंदोलन रविवारी तिसर्‍या दिवशीही सुरूच होते. आंदोलकांनी विविध ठिकाणी ट्रकच्या काचा फोडल्या, तर चाकातील हवा सोडण्यात आली. त्यामुळे महामार्गावर काहीकाळ वातावरण तणावपूर्ण बनले. उजळाईवाडी येथे पोलिसांनी हस्तक्षेप करून आंदोलकांना समज दिली. तीन दिवसांत जिल्ह्यातील सुमारे 70 ते 75 कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे.

नियमित होणारी डिझेल, पेट्रोल दरवाढ रद्द करावी, टोल प्रक्रिया पारदर्शक करावी, थर्ड पार्टी प्रीमियममधील वार्षिक दरवाढ रद्द करा, पर्यटन वाहनांसाठी दीर्घमुदतीचे ऑल इंडिया परमिट द्यावे, जीएसटी ई-बिलातील अडचणी व भाडे देण्यासाठी होणारा विलंब यात सुधारणा करावी, आदी मागण्यांसाठी शुक्रवारपासून बेमुदत देशव्यापी चक्काजाम आंदोलन सुरू आहे. तीन दिवस आंदोलन सुरू असल्याने विविध वस्तू, मालाच्या आवक-जावकवर परिणाम झाला आहे. खत आणि सिमेंट घेऊन येणार्‍या रेल्वे वॅगन तीन दिवस आल्या नसल्याने जिल्ह्यातील खत आणि सिमेंटची आवक मंदावली आहे. तर जिल्ह्यातून रेल्वे वॅगनद्वारे निर्यात होणारी साखरही जाऊ शकली नाही. विक्रेत्यांनी यापूर्वी मालाचा स्टॉक केलेला असल्याने मंदीचा फारसा परिणाम 
दिसून येत नाही. मात्र, अशीच स्थिती राहिल्यास खताचा तुटवडा निर्माण होण्याचा धोका आहे.

आंदोलनात शहरास जिल्ह्यातील  विविध संघटनांचे दहा ते पंधरा हजारांहून अधिक ट्रक चालक सहभागी झाले आहेत. आंदोलनाच्या तिसर्‍या दिवशी रविवारी लॉरी ऑपरेटर्स असोसिएशनच्या वतीने भरारी पथकाने  मार्केट  यार्ड, रेल्वे गुड्स यार्ड येथील मालाची वाहतूक बंद करून परराज्यातील ट्रक रस्त्याकडेला लावण्यास भाग पाडले. मार्केट यार्डमधील मालाची आवक-जावक बंद असल्याने हमालांचे काम बंद झाले आहे. बंदमधून औषध, पालेभाज्या व दूध वगळण्यात आले आहे.

आंदोलनाची व्याप्ती वाढविण्यासाठी असोसिएशनतर्फे गोकुळ शिरगाव, कागल औद्योगिक वसाहत, शिरोली, सरनोबतवाडी, उजळाईवाडी आदी ठिकाणी कार्यकर्ते पाठवण्यात आले होते. आंदोलकांनी वाहतूक करणारे ट्रक अडवून बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. यावेळी आंदोलकांनी ट्रकच्या चाकातील हवा सोडली. त्यामुळे अनेक ठिकाणी आंदोलक, ट्रकचालक आणि पोलिस यांच्यात किरकोळ वादावादी झाली. आंदोलनामुळे ट्रक चालक, क्लीनर यांची मोठी पंचाईत झाली.

बाजार समितीत 40 लाखांची उलाढाल घटली 

चक्काजामचा परिणाम बाजार समितीत जाणवून आला. रविवारी समितीत 30 ते 40 लाख रुपयांची उलाढाल घटली.समितीत कांदा-बटाट्याची दररोज 50 ते 60 ट्रक आवक होते. रविवारी कांदा-बटाटा विभागाला सुट्टी असल्यामुळे आवक झाली नाही. मात्र फळे, भाजीपाला या विभागात स्पष्ट परिणाम दिसून आले. सुमारे 40 टक्के आवक घटल्याचे समिती प्रशासनाकडून सांगण्यात आले. दररोज भाजीपाला व फळे या विभागात सहाशे ते सातशे वाहने शेतमाल घेऊन येतात. कर्नाटकातून मोठ्या प्रमाणात भाज्यांची आवक होते. मात्र, बंदमुळे रविवारी या दोन्ही विभागात साडेतीनशेच्या आसपासच वाहनातून शेतमालाची आवक झाली.

उजळाईवाडीजवळ चक्काजामला हिंसक वळण

उजळाईवाडी : वार्ताहर

पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर उजळाईवाडीजवळ वाहतूकदार आंदोलकांनी गनिमी काव्याने रविवारी दुपारी आंदोलन करत महामार्गावरून जाणार्‍या ट्रकच्या काचा फोडल्या व नंतर येणारे सर्वच मालवाहतूक ट्रक अडवून काही ट्रकच्या चाकातील हवा सोडून दिल्याने सुमारे एक तास मालवाहूक ठप्प झाली होती.

काही मालवाहतूक ट्रक गुजरात, मुंबईवरून बंगळूरकडे जात होते, तर काही बंगळूरहून पुणे-मुंबईकडे जात होते. हे ट्रक अडवत आंदोलकांनी उजळाईवाडीजवळ काचा फोडल्या. समर्थ मंगल कार्यालयासमोर मालवाहतूक ट्रक अडवले. काही ट्रकच्या चाकमधील हवा सोडली.

सकाळी कणेरीवाडीजवळही आंदोलन करून ट्रक अडवण्यात आले. दरम्यान, उजळाईवाडी येथे एका आंदोलकाला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे समजताच कोल्हापूर जिल्हा लॉरी असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष जाधव, उपाध्यक्ष भाऊ भोसले, हेमंत डिसले, श्रीरंग पाटील, विजय पोवार, गोविंद पाटील, मनोज पाटील आदींसह शिरोळ येथीलही आंदोलकांनी गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यात येऊन सहायक पोलिस निरीक्षक युवराज खाडे यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.

शिरोली एमआयडीसीत कोट्यवधींची उलाढाल ठप्प

शिये : वार्ताहर

तीन दिवसांपासून सुरू असलेल्या देशव्यापी चक्काजाम आंदोलनाने शिरोली औद्योगिक वसाहतसह परिसरातील कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प झाली. रविवारी आंदोलकांनी आक्रमक होत नागाव फाटा येथे पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको करत ट्रान्स्पोर्टची वाहने रोखली. दरम्यान, लवकर तोडगा न निघाल्यास आंदोलन चिघळले जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

असोसिएशन ऑफ नागाव, शिरोली  या  संघटनेसह वाहनधारकांचा उत्स्फूर्तपणे सहभाग वाढला असून, आंदोलकांनी महामार्गासह शिरोली एमआयडीसी, नागाव व सांगली फाटा येथील मार्बल झोन येथे बंदचे आवाहन करत मोटारसायकल रॅली काढली. दरम्यान, आंदोलनात सहभागी न झालेल्या वाहनधारकांवर असोसिएशन नियमानुसार दंडात्मक कारवाई केली जात आहे.

याप्रसंगी असोसिएशनचे अध्यक्ष कुलभूषण कोळी, उपाध्यक्ष जावेद पुणेकर, मन्सूर नदाफ, सेक्रेटरी महेंद्र पाटील, दिलीप शिरोळे, योगेश रेळेकर,  शिवशंकर नेलोगल, प्रभाकर यद्रे,  अमोल लोंढे, राहुल चौगुले, राहुल घाटगे, सिद्धू कारके, जे. पी. सिंग, गणेश गुर्जर, बाबासाहेब आलाट, विष्णुपंत पाटील यांच्यासह ट्रान्स्पोर्ट व्यावसायिक व चालक, मालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.