होमपेज › Kolhapur › तोतया पोलिसांकडून लूटमार

तोतया पोलिसांकडून लूटमार

Published On: May 11 2018 1:37AM | Last Updated: May 10 2018 11:59PMकोल्हापूर : प्रतिनिधी

पुढे चेकिंग सुरू आहे, तुमचे दागिने एका रूमालात बांधून ठेवा... काल येथे लूटमार झाली आहे, दागिने काढून पिशवीत ठेवा असे सांगून वृद्धांना लुटणारा तोतया पोलिस डोकेदुखी बनला आहे. राजारामपुरी, संभाजीनगर पाठोपाठ हातकणंगले तालुक्यातील वाठारनजीक अशीच घटना घडली. 

राजारामपुरीतील दवाखान्यात आलेल्या रमेश शेटे यांना रविवारी सायंकाळी तोतया पोलिसाने लुबाडले. त्यांच्याजवळील सोनसाखळी व अंगठी असा 4 तोळ्यांचा ऐवज संशयिताने काढून घेतला. शेटे त्यांच्या मुलासोबत दवाखान्यात आले होते. एका साथीदाराच्या मदतीने या तोतया पोलिसाने त्यांना लुबाडले. 

मंगळवारी सायंकाळी संभाजीनगरातील रेसकोर्स नाक्याजवळ परशुराम बाळा सोनुले (वय 67, रा. टिंबर मार्केट) यांनाही तोतया पोलिसाने अशाच पद्धतीने लुटले, तर बुधवारी रात्री वाठारनजीक एस.टी. स्टँडसमोरून चालत निघालेले सर्जेराव महादेव तोडकर (वय 56, तळसंदे) यांना तोतया पोलिसाने अडवले. पुढे चेकिंग सुरू आहे. तुमचे घड्याळ, अंगठी, सोनसाखळी एका रूमालात बांधा असे सांगितले. यानंतर तो एका साथीदारासह भरधाव निघून गेला. काही वेळातच आपले दागिने लंपास झाल्याचे तोडकर यांच्या लक्षात आले. 

तोतया पोलिसाने स्वत:जवळील बनावट ओळखपत्र संबंधितांना दाखविले. तसेच अन्य एका साथीदाराच्या मदतीने दागिने रूमालात गुंडाळण्यासाठी मदत करत असल्याचे भासवले. तीनही लुटींमध्ये तोतया पोलिस आणि त्याचा एक साथीदार सामील असल्याचे समोर आले आहे.