Wed, Jul 17, 2019 12:35होमपेज › Kolhapur › ‘थर्टी फर्स्ट’चे काऊंटडाऊन सुरू

‘थर्टी फर्स्ट’चे काऊंटडाऊन सुरू

Published On: Dec 22 2017 1:26AM | Last Updated: Dec 22 2017 12:02AM

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

नववर्षाचे स्वागत आता जल्लोषी स्वरूप धारण करत असून दिवसेेंदिवस या जल्लोषात वाढच होत आहे. 31 डिसेंबरला आता 10 दिवस उरल्याने ‘थर्टी फर्स्ट’चे काऊंटडाऊनही सुरू झाले आहे. ‘थर्टी फर्स्ट’ची पार्टी कुठे? याचेही नियोजन सुरू असून हॉटेल व्यवसायिकांची लगबग सुरू झाली आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी हॉटेल व्यवसायिकांनी विविध योजनांची आतापासूनच बरसात करायला सुरुवात केली आहे. पोलिसांनीही सज्जता ठेवली असून गर्दीच्या ठिकाणावर यंदा गोपनीय पद्धतीने वॉच ठेवला जाणार आहे. 

अलीकडच्या काही वर्षांत इंग्रजी नववर्षाच्या स्वागताचे जल्लोषी फॅड बळावले आहे. पूर्वी गुढीपाडव्याला नववर्षाच्या शुभेच्छा देणारे आता मात्र ‘थर्टी फर्स्ट’ला जल्लोष करून 1 जानेवारीलाच ‘हॅपी न्यू इयर’ म्हणून नववर्ष साजरे करत आहेत. नववर्षाच्या पहिल्या दिवसाची पूर्वसंध्या त्यासाठी जल्लोषात न्हाऊन निघू लागली आहे. दिवसेंदिवस ‘थर्टी फर्स्ट’चा जल्लोष वाढत असून शहरातील हॉटेलमधील हे जल्लोषी वातावरण अगदी गावांतील ढाब्यांवरही केव्हाच जाऊन पोहोचले आहे. 

कोल्हापूर शहरात ‘थर्टी फर्स्ट’च्या निमित्ताने कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत आहे. शहर व परिसरातील पर्यटनस्थळे तसेच संभाव्य गर्दीच्या ठिकाणी दरवर्षी थर्टी फर्स्टसाठी झुंबड उडत असते. या पार्श्‍वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न उद्भवू नये, यासाठी पोलिस यंत्रणेने आतापासूनच नियोजन केले आहे. अशा ठिकाणावर दरवर्षीप्रमाणे करडी नजर राहिलच. याशिवाय गोपनीय पद्धतीनेही वॉच ठेवला जाणार आहे. 

शहरातील प्रत्येक मोक्याच्या ठिकाणी दरवर्षी विविध हॉटेल्सच्या जाहिरातबाजीचे फलक तेच सांगत असतात. विविध हॉटेल्सनी ग्राहकांवर विविध योजनांची बरसात करायला आतापासूनच सुरू केली आहे. परमिट रूम बार असेल त्या हॉटेलमध्ये तर ‘थर्टी फर्स्ट’च्या निमित्ताने तुफान गर्दी उसळते. अशा ठिकाणी असलेला गोंधळ टाळण्यासाठी निर्व्यसनी ग्राहक सिगारेट, दारूला बंदी असलेल्या हॉटेलला विशेष पसंती देतात. मात्र, अशी हॉटेल्स शोधताना त्यांना काहीशी शोधाशोध करावी लागत असते. परमिट रूम बार असणार्‍या हॉटेलचालकांनी केवळ भोजनासाठी म्हणूनही ग्राहकांची स्वतंत्र सोय करण्यास सुरुवात केली आहे. मटन विक्रेत्यांनी आतापासून ‘थर्टी फर्स्ट’ची तयारी सुरू केली आहे. वॉईन शॉपमध्ये तर ‘थर्टी फर्स्ट’निमित्त दारूच्या बाटल्या खरेदीवर ग्लास, डायरी, पेन अशा भेटवस्तू दिल्या जातात. यंदाही ती प्रथा कायम राहील. हॉटेलला कंटाळलेली मंडळी मात्र निसर्गाच्या सानिध्यात ‘थर्टी फर्स्ट’ साजरा करण्याचे नियोजन करत असून अशा पार्ट्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढच होत आहे. 

‘थर्टी फर्स्ट’चे महत्त्व वाढतच गेल्याने हॉटेलला न जाणारी मंडळी घरीदेखील खास बेत केल्याशिवाय राहत नाहीत. हे सर्व प्रचलित होत चालले असून त्यामुळेच आतापासूनच ‘थर्टी फर्स्ट’चे काऊंटडाऊन सुरू झाले आहे.