Mon, Jun 17, 2019 14:44होमपेज › Kolhapur › प्रत्येक कॉलेजमध्ये समुपदेशन केंद्र सक्‍तीचे

प्रत्येक कॉलेजमध्ये समुपदेशन केंद्र सक्‍तीचे

Published On: Apr 08 2018 2:02AM | Last Updated: Apr 07 2018 11:41PMकोल्हापूर : विजय पाटील 

उच्च शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्याची नियमावली विद्यापीठ अनुदान आयोगाने (युजीसी) बनवली आहे. या नियमावलीचे काटेकोरपणे पालन करण्याचे आदेश देशभरातील विद्यापीठ आणि त्यांच्याशी संलग्‍नित कॉलेजला देण्यात आले आहेत.  विद्यार्थी मानसिकद‍ृष्ट्या सक्षम रहावा यासाठी प्रत्येक कॉलेजमध्ये विद्यार्थी समुपदेशन केंद्र सक्‍तीचे करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. शिक्षणक्षेत्रात गुणांची स्पर्धा मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. याचा परिणाम विद्यार्थ्यांवर होतो, हे स्पष्ट आहे. या सर्व गोष्टींमध्ये विद्यार्थ्यांचे शारीरिक,  मानसिक आणि सामाजिक आरोग्य सक्षम असावे यासाठी युजीसीने नियमावली तयार केली आहे. या नियमावलीनुसार शिक्षण संस्थांचा कॅम्पस हा भयमुक्‍त वातावरणाचा असावा. शिक्षण संस्थांच्या आवारात परवानगीशिवाय कोणालाही प्रवेश देऊ नये. ओळखपत्र सक्‍तीचे तसेच सुरक्षा रक्षक तैनात असावेत, आदींचा समावेश आहे. सहली नेताना विद्यार्थ्यांचा विमा सक्‍तीचा करण्यात आला आहे. 

 नव्या नियमावलीमध्ये प्रत्येक कॉलेजमध्ये विद्यार्थी समुपदेशन केंद्र निर्माण करण्याचे आदेश यामध्ये आहेत. या केंद्रासाठी प्रशिक्षित शिक्षक आणि मानसेवी वैद्यकीय तज्ज्ञांचा समावेश असावा, असे सूचित करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांशी सतत संवाद साधणे, त्यांच्या वागण्यात बदल दिसल्यास त्यांना याबाबत आपुलकीने विचारून निरसन करणे आणि परीक्षा काळात तणावविरहित वातावरण तयार करण्यावर भर देणे आदी मार्गदर्शक सूचना यामध्ये देण्यात आल्या आहेत. काही कॉलेजमध्ये नावापुरती अशी केंद्रे अनेक संस्थांमध्ये सुरू आहेत. त्याचा प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना किती उपयोग होतो हा संशोधनाचा विषय आहे. याचा सारासार विचार करून युजीसीने याबाबत पुन्हा याबाबतची सक्‍ती केली आहे.

Tags : Kolhapur, Counseling centers, mandatory, college