Mon, Apr 22, 2019 11:41होमपेज › Kolhapur › मराठा आरक्षण आंदोलनाला नगरसेवकांचा पाठिंबा

मराठा आरक्षण आंदोलनाला नगरसेवकांचा पाठिंबा

Published On: Aug 14 2018 1:09AM | Last Updated: Aug 14 2018 12:37AMकोल्हापूर ः प्रतिनिधी 

बारा बलुतेदारांचा पोशिंदा राहिलेल्या मराठा समाजाला आता मागासलेपण आले आहे. त्यामुळे घटनेत तरतूद करून मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, अशी ठाम मागणी महापालिकेच्या महासभेत सोमवारी करण्यात आली. मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने आरक्षण मागणीसाठी सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सभा तहकूब करण्यात आली. त्यानंतर महापौर सौ. शोभा बोंद्रे यांच्यासह काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी महापालिकेतून दसरा चौकापर्यंत मोर्चाने जाऊन ठिय्या आंदोलनात भाग घेतला. 

सभेत ज्येष्ठ नगरसेवक प्रा. जयंत पाटील म्हणाले, राज्यात बहुसंख्य असलेला मराठा समाज आरक्षण मागतोय. कुठल्याही समाजाचे आरक्षण काढून न घेता मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी गेली दोन वर्षे समाजाने मागणी लावून धरली आहे. त्यासाठी राज्यात न भूतो न भविष्यती, असे 58 मोर्चे अत्यंत शांततेत काढण्यात आले. नुकताच 9 ऑगस्टला महाराष्ट्र बंद पाळण्यात आला. इतर सर्वच समाजांचा मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे. कोल्हापूर महापालिका ही मातृसंस्था आहे. त्यामुळे आरक्षण आंदोलनाला सर्व नगरसेवकांनी सभा तहकूब करून पाठिंबा द्यावा, अशी सूचना केली. प्राथमिक शिक्षण मंडळ सभापती अशोक जाधव यांनी मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारने समाजाचा अंत पाहू नये. घटनेत तरतूद करून सरकारने त्वरित आरक्षण द्यावे. 

सौ. निलोफर आजरेकर म्हणाल्या, मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करून ओबीसी आरक्षणाला धक्‍का न लावता त्वरित आरक्षण द्यावे. त्यासाठी राज्य सरकारने तामिळनाडूच्या धर्तीवर अध्यादेश काढून केंद्र सरकारला विनंती करावी. त्यानुसार घटनेत बदल करून मराठा समाजाला आरक्षण द्यावे, असे सांगितले. भूपाल शेटे यांनी आरक्षण मिळण्यासाठी मराठा समाजाची मागणी रास्त आहे. राज्य मागासवर्ग आयोगाकडून अहवाल घेऊन राज्य सरकारने त्वरित आरक्षण द्यावे, अशी मागणी केली. सौ. रूपाराणी निकम यांनी मराठा समाजाला संघर्षाशिवाय काही मिळाले नसल्याचे सांगितले. राजसिंह शेळके यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, तसेच धनगर समाजालाही आरक्षण द्यावे, अशी मागणी केली. 

घोषणांनी मोर्चाचा मार्ग दणाणला

महापालिकेतून दसरा चौकाकडे जाताना नगरसेवकांनी ‘एक मराठा, लाख मराठा..., मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे...’ यासह इतर घोषणांनी मोर्चाचा मार्ग दणाणून सोडला. ठिय्या आंदोलनात उपमहापौर महेश सावंत, काँग्रेस गटनेता शारंगधर देशमुख, प्रा. जयंत पाटील, भूपाल शेटे, सुभाष बुचडे, मधुकर रामाणे, सचिन चव्हाण, अफजल पिरजादे, अशोक जाधव, सुनील पाटील, संदीप कवाळे, श्रावण फडतारे, लाला भोसले, संजय मोहिते, अजिंक्य चव्हाण, इंद्रजित बोंद्रे, वनिता देठे, अ‍ॅड. सूरमंजिरी लाटकर, दीपा मगदूम, अनुराधा खेडकर, उमा बनछोडे, शोभा कवाळे, रिना कांबळे, वहिदा सौदागर, सरिता मोरे, माधवी गवंडी, अश्‍विनी रामाणे, वृषाली कदम, निलोफर आजरेकर, छाया पोवार, जयश्री चव्हाण, माधुरी लाड, आशपाक आजरेकर आदींनी ठिय्या आंदोलनात भाग घेतला. पक्षाचे

प्रमोशन थांबवा...

महापालिका महासभेत भाजप गटनेता विजय सूर्यवंशी यांनीही भाजप-ताराराणी आघाडीचा मराठा आरक्षण आंदोलनाला पाठिंबा असल्याचे सांगितले. त्यानंतर भाजप सरकारने मराठा आरक्षणासाठी प्रयत्न केल्याचे ते सांगू लागले. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी त्याला आक्षेप घेतला. नगरसेवकांच्या वतीने पाठिंबा द्यायचा आहे, असे म्हणून काँग्रेस गटनेता शारंगधर देशमुख यांनी पक्षाचे तुणतुणे वाजवू नका, पक्षाचे प्रमोशन करू नका, असे सूर्यवंशी यांना सुनावले. 

सूर्यवंशी म्हणाले, 2010 ला राज्य मागासवर्ग आयोगाची निर्मिती झाली नाही; पण 2014 मध्ये आयोग स्थापन करण्यात आला. मराठा समाजाला त्वरित आरक्षण देण्यासाठी आयोगाला लवकर मत देण्याची सूचना केली होती. मराठा आरक्षणासाठी सरकार सकारात्मक आहे. सर्व पातळीवर टिकणारे आरक्षण देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. सरकारने मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल केली आहेत. फीमध्ये सवलत दिली आहे. कर्जात सूट दिली आहे, असे सांगितले. 

त्यावर देशमुख व अर्जुन माने भडकले. त्यांनी कुणाला किती सवलती दिल्या, त्या विद्यार्थ्यांची नावे सांगण्याचे आव्हान सूर्यवंशी यांना दिले. सूर्यवंशी यांच्या भाषणानंतर सभागृहात गोंधळ उडाला. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी त्यांना जोरदार विरोध केला. फक्‍त नगरसेवकांच्या वतीने, आम्ही मराठा आरक्षण आंदोलनाला पाठिंबा देत आहोत, या ठिकाणी पक्ष बाजूला ठेवू या, असे सांगितले. अन्यथा राज्यात वीसहून अधिक लोकांनी आरक्षणासाठी आत्महत्या केल्या आहेत. तसे असते तर आम्ही भाजप सरकारचा निषेधही करू शकलो असतो. तसेच आरक्षण आमच्या हक्‍काचे असून सुविधा देऊन सरकार उपकार करत नसल्याचेही देशमुख यांनी सांगितले. त्यानंतर सत्ताधारी काँंग्रेस-राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी ‘आरक्षण आमच्या हक्‍काचे, नाही कुणाच्या बापाचे,’ असे म्हणून सभागृह दणाणून सोडले. त्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादीचे नगरसेवक सभागृहातून थेट दसरा चौकात गेले. 

सभागृहातच ठिय्या आंदोलन

भाजप-ताराराणी आघाडीच्या नगरसेवकांनी महापौरांनी सभा तहकूब केल्यानंतरही सभागृहातच बसून मराठा आंदोलनाला पाठिंबा दिला. यात ताराराणी आघाडी गटनेता सत्यजित कदम, विरोधी पक्षनेता विलास वास्कर, स्थायी समिती सभापती आशिष ढवळे यांच्यासह शेखर कुसाळे, किरण नकाते, राजसिंह शेळके, किरण शिराळे, सीमा कदम, कविता माने, भाग्यश्री शेटके, अर्चना पागर, स्मिता माने, रूपाराणी निकम, मेहजबीन सुभेदार, मनीषा कुंभार, सुनंदा मोहिते, उमा इंगळे, जयश्री जाधव, गीता गुरव, अश्‍विनी बारामते, अजित ठाणेकर, विजय खाडे, कमलाकर भोपळे, रत्नेश शिरोळकर आदींनी सभागृहातच ठिय्या आंदोलन केले.