Mon, Mar 25, 2019 09:09होमपेज › Kolhapur › ‘सर्व’पक्षीय नगरसेवकांत पदासाठी खदखद

‘सर्व’पक्षीय नगरसेवकांत पदासाठी खदखद

Published On: Jan 18 2018 1:47AM | Last Updated: Jan 18 2018 1:07AM

बुकमार्क करा
कोल्हापूर : सतीश सरीकर 
मर्जीतील नगरसेवकांनाच वारंवार संधी... कारभारी म्हणतील तेच होणार पदाधिकारी... नेत्यांच्या पुढे-मागे करणार्‍यांनाच पुन्हा-पुन्हा पदे... या कारभारामुळे सामान्य नगरसेवकांत प्रचंड खदखद सुरू आहे. त्यातूनच महापालिकेतील सर्वच राजकीय पक्षांतील नगरसेवकांत धुसफुस सुरू आहे. दोन वर्षे गप्प बसलो... आता गप्प बसणार नाही, असे म्हणून दंड थोपटण्याची भाषा केली जात आहे. यापूर्वी पदे भोगलेल्यांना संधी देऊ नये, असे म्हणून नव्याने निवडून आलेल्या नगरसेवकांनी पदासाठी जोरदार आग्रह धरला आहे. त्यामुळे यंदा नेत्यांचीही चांगलीच पंचाईत होणार असल्याची चर्चा महापालिका वर्तुळात सुरू आहे. 

राष्ट्रवादीला जादा पदांमुळे काँग्रेसमध्ये अस्वस्थता
महापालिकेत काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता असली, तरी ते काठावरचे बहुमत आहे. त्यामुळेच शिवसेनेला परिवहन समितीचे सभापतिपद देऊन काँग्रेस-राष्ट्रवादीने आपल्या गोटात ओढले आहे. सत्तेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीने आघाडी केली असली, तरी काँग्रेसचे 29 तर राष्ट्रवादीचे 15 नगरसेवक आहेत. राष्ट्रवादीच्या दुपटीने नगरसेवक असूनही मागील फॉर्म्युल्यानुसार पदे दिली जात असल्याने काँग्रेसमध्ये प्रचंड नाराजी आहे. राष्ट्रवादीच्या सर्वच नगरसेवकांना विविध समित्यांत दोन-दोनवेळा संधी मिळणार आणि सर्वाधिक नगरसेवक असूनही काँग्रेसचे नगरसेवक पदापासून वंचित राहणार असल्याने नगरसेवकांत अस्वस्थता आहे. त्यामुळे काँग्रेसच्या नगरसेवकांतून असंतोष व्यक्त होत आहे. 

बंडखोरी टाळण्यासाठीच नावांची गुप्तता
सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी व विरोधी भाजप-ताराराणी आघाडी यांच्यात प्रचंड ईर्ष्येचे राजकारण आहे. हाताच्या बोटावर मोजण्याइतपत नगरसेवकांचा फरक असल्याने काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी कोणतीही रिस्क घ्यायला तयार नाही. पदे ठराविक आणि इच्छुकांची संख्या जास्त असल्याने नेतेही सावधगिरीचा पवित्रा घेत आहेत. बंडखोरी टाळण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत नावे जाहीर केली जात नसल्याचे वास्तव आहे. विरोधकही सत्ताधार्‍यांतील नाराजांपैकी कोणी गळाला लागतो का? याची चाचपणी करत आहेत. त्याचा फायदा घेऊन नगरसेवक गटनेत्यांवर व नेत्यांवरही पदासाठी किंवा स्थायी समितीत जाण्यासाठी दबाव टाकत असल्याचे सांगण्यात येत आहे. विरोधी भाजप-ताराराणी आघाडीनेही विरोधी पक्षनेतेपद वर्षाआड घेण्याचा निर्णय घेतला आहे. आता भाजपकडे हे पद जाणार असल्याने या पक्षातही इच्छुकांची संख्या जास्त असल्याने धुसफुस सुरू आहे. 

राष्ट्रवादीचे तिघेही इच्छुक
काँग्रेस-राष्ट्रवादीतील सत्तेच्या वाटणीनुसार पुढील स्थायी समिती सभापतिपद राष्ट्रवादीकडे जाणार आहे. राष्ट्रवादीतून अफजल पीरजादे, मेघा पाटील व अजिंक्य चव्हाण हे तीन सदस्य आहेत. चव्हाण यांनी प्राथमिक शिक्षण मंडळ सभापतिपद भूषविले आहे. पीरजादे हे छत्रपती शिवाजी मार्केट विभागीय कार्यालयाचे सभापती आहेत. मेघा पाटील या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांच्या स्नुषा आहेत.

स्थायी समितीसाठी इच्छुकांची धडपड... 
स्थायी समितीतून निवृत्त झालेले काँग्रेसचेच सदस्य आहेत. राष्ट्रवादीचे सर्व सदस्य आहे तेच राहणार आहेत. परिणामी, काँग्रेसमधून इच्छुकांनी जोरदार फिल्डिंग लावली आहे. यात भूपाल शेटे, शोभा कवाळे, संजय मोहिते, प्रतीक्षा पाटील, माधुरी लाड, प्रताप जाधव आदींचा समावेश आहे. ताराराणी आघाडी व भाजपच्या वतीने ज्यांना संधी मिळालेली नाही, त्यांनाच पाठविले जाणार असल्याचे सांगण्यात आले. शिवसेनेचे चारही नगरसेवक स्थायी सदस्यपदासाठी आग्रही आहेत.

शिवसेना फुटीच्या उंबरठ्यावर?
शिवसेनेचे चार नगरसेवक आहेत. सद्यस्थितीत गटनेता नियाज खान यांच्याकडे गटनेतापद व परिवहन समिती सभापती ही दोन पदे आहेत. प्रतिज्ञा उत्तुरे-निल्ले या स्थायी समिती सदस्य आहेत. राहुल चव्हाण व अभिजित चव्हाण कोणत्याच समितीवर नाहीत. त्यामुळे दोघांपैकी एकाला परिवहन सभापतिपद व एकाला स्थायी सदस्यपद द्यावे, अशी त्यांची मागणी आहे. परंतु, राहुल चव्हाण यांना परिवहन सभापतिपद मिळू नये म्हणूनही प्रयत्न सुरू आहेत. खान यांनी गटनेतापद कायम ठेवून स्थायी सदस्यपदी वर्णी लागावी, अशी मागणी केल्याचे सांगण्यात येते. त्याचवेळी राहुल व अभिजित चव्हाण हे पद न मिळाल्यास वेगळा विचार करणार असल्याचे सांगत असल्याची चर्चा आहे. उत्तुरे या  ‘मातोश्री’वरून जो निर्णय येईल तो मान्य करणार असल्याचे सांगत आहेत. एकूणच पदांसाठी अवघे चार नगरसेवक असलेली शिवसेना फुटीच्या उंबरठ्यावर असल्याची चर्चा नगरसेवकांत सुरू आहे. 

विरोधी पक्षनेतेपदावरून भाजपमध्ये धुसफुस
विरोधी पक्षनेते किरण शिराळे यांची मुदत संपत आल्याने दोन-चार दिवसांत त्यांचा राजीनामा घेतला जाणार आहे. भाजप-ताराराणी आघाडीतील वाटाघाटीनुसार सध्या ताराराणी आघाडीकडे विरोधी पक्षनेतेपद आहे. आता पुढील पद हे भाजपकडे जाणार आहे. भाजपमधून आशिष ढवळे, विजय खाडे यांच्यासह इतर दोघे इच्छुक असल्याचे सांगण्यात येते. सर्वजण पदासाठी आग्रही असल्याने विरोधी पक्षनेतेपदावरून भाजपमध्ये धुसफुस सुरू असल्याचेही सांगण्यात आले.