Fri, Apr 26, 2019 20:10होमपेज › Kolhapur › नगरसेवक संभाजी जाधव यांची अभियंता सरनोबतांना शिवीगाळ

नगरसेवक संभाजी जाधव यांची अभियंता सरनोबतांना शिवीगाळ

Published On: Jan 30 2018 1:51AM | Last Updated: Jan 30 2018 12:12AMकोल्हापूर : प्रतिनिधी

महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेता व भाजपचे नगरसेवक संभाजी जाधव यांनी शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांना त्यांच्या कार्यालयात जाऊन शिवीगाळ केली. तसेच माझी कामे न केल्यास बघून घेण्याची धमकीही दिली. सोमवारी सायंकाळी सातच्या सुमारास घडलेल्या या घटनेने महापालिकेत काही काळ तणाव निर्माण झाला होता. तत्पूर्वी दुपारी दोनच्या सुमारास राष्ट्रवादीच्या नगरसेविका अनुराधा खेडकर यांचे पती माजी उपमहापौर सचिन खेडकर यांनी वाहन लावण्याच्या कारणावरून माजी सैनिक असलेल्या सिक्युरिटी गार्डना शिवीगाळ करून महापालिका चौकातील झाडाला फासावर लटकविण्याची धमकी दिली. 

काही दिवसांपूर्वी महापालिकेतील एका कर्मचायार्ने उद्यानातील मुलीशी गैरवर्तन केले होते. त्याप्रकरणी संबंधित कर्मचार्‍यावर विनयभंगाचा गुन्हाही दाखल झाला आहे. संबंधित कर्मचार्‍याची पत्नी त्यासंदर्भात शहर अभियंता सरनोबत यांना भेटण्यास आली होती. परंतु, सरनोबत हे 31 जानेवारीला मुख्यमंत्री कार्यालयात होणार्‍या श्री अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या कामात व्यस्त असल्याने त्यांची भेट होऊ शकली नाही. मात्र, त्या महिलेला भेट का दिली नाही? आणि त्या कर्मचार्‍यावर कारवाई का केली? म्हणून नगरसेवक जाधव हे सरनोबत यांच्या कार्यालयात आले. त्यांनी सरनोबत यांचा एकेरी शब्दात उल्लेख करून शिवीगाळ केल्याची महापालिका वर्तुळात चर्चा सुरू होती. त्यामुळे महापालिकेतील उपस्थित अधिकार्‍यांत भीतीचे वातावरण पसरले होते. 

दरम्यान, महापालिका चौकात वाहनांची प्रचंड कोंडी होते. त्यामुळे अधिकारी व पदाधिकार्‍यांनाही वाहने बाहेर काढणे मुश्किलीचे बनते. परिणामी चौकातील वाहने लावण्याला शिस्त लागावी म्हणून आयुक्‍त अभिजित चौधरी यांनी पदाधिकारी, नगरसेवक व अधिकार्‍याशिवाय कोणाचीच वाहने महापालिका चौकात सोडू नयेत, असे आदेश दिले आहेत. त्याची अंमलबजावणी सिक्युरिटी गार्डनी सोमवारपासून सुरू केली. माजी उपमहापौर खेडकर दुपारी दोनच्या सुमारास महापालिकेत आले. त्यांनी दुसरीकडे वाहन लावण्याची विनंती सिक्युरिटी गार्डनी केली. त्यावरून खेडकर यांनी गार्डना अश्‍लील शिवीगाळ करून धमकीही दिली. अखेर नगरसेवक ईश्‍वर परमार यांनी खेडकर यांची समजूत काढून त्यांना शिवीगाळ न करण्याची विनंती केली. तसेच त्यांना इतरत्र नेले. त्यानंतर सर्व सिक्युरिटी गार्डनी आयुक्‍त चौधरी यांची भेट घेऊन घटनेची माहिती दिली.