Fri, Sep 21, 2018 23:03होमपेज › Kolhapur › ‘कंपनी सेक्रेटरी’ एक आकर्षक करिअर : पाटील

‘कंपनी सेक्रेटरी’ एक आकर्षक करिअर : पाटील

Published On: May 29 2018 1:39AM | Last Updated: May 29 2018 12:45AMकोल्हापूर : प्रतिनिधी 

हक्‍काचा रोजगार मिळवून देणार्‍या कॉमर्स क्षेत्रात कंपनी सेक्रेटरी एक आकर्षक करिअर ठरत आहे. या क्षेत्रात विद्यार्थ्यांनी संधी साधावी, असे आवाहन पद्मसिंह पाटील यांनी केले. राजारामपुरीतील व्ही. टी. पाटील सभागृहात आयोजित ‘एज्यु दिशा’ प्रदर्शनात ‘कंपनी सेक्रेटरी : एक आकर्षक करिअर’ या विषयावर त्यांनी विद्यार्थी व पालकांशी संवाद साधला. पाटील म्हणाले, कॉमर्स क्षेत्रात विविध रोजगाराची संधी आहे. यामध्ये चार्टर्ड अकौंटंटच्या बरोबरीने कंपनी सेक्रेटरी या पदाला महत्त्व आले आहे. भारतीय राज्य घटनेनुसार कायद्याने कंपन्यांना हे पद निर्माण करणे अनिवार्य केले आहे.

त्यामुळे कॉमर्स क्षेत्रातील कंपनी सेक्रेटरीबाबत विद्यार्थ्यांनी करिअर करण्यास प्राधान्य द्यावे. बारावीनंतर फौंडेशन, एक्झिकेटिव्ह आणि फायनल अशी तीन वर्षे आणि दोन वर्षे थेट कंपनीत प्रॅक्टिस अशा पाच वर्षांत हा अभ्यासक्रम पूर्ण करता येतो.  गुणाची टक्केवारी कमी असली म्हणून नाराज न होता या क्षेत्रात करिअरला प्राधान्य आहे. केवळ कष्ट करण्याची तयारी ठेवल्यास यश नक्‍की मिळू शकते. विविध कंपन्यांत रोजगारासह स्वत:चा व्यवसाय सुरू करता येतो. याबाबत कोल्हापुरात फारशी जागृती नसल्याने विद्यार्थ्यांना या क्षेत्रात मोठी संधी आहे. अमोल चौगुले यांनी स्वागत केले.