Wed, Apr 01, 2020 23:50होमपेज › Kolhapur › भारतीय उद्योगांनाही कोरोनाचा फटका

भारतीय उद्योगांनाही कोरोनाचा फटका

Last Updated: Feb 22 2020 1:35AM

भारतीय अर्थव्यवस्थाकोल्हापूर : विशेष प्रतिनिधी 

कोरोना व्हायरसचे आता भारतीय अर्थव्यवस्थेवरही परिणाम जाणवू लागले आहेत. चीनमधून आयात थांबल्यामुळे देशातील औषध व्यवसाय, स्मार्ट फोन व्यवसाय, सोलर उद्योग यासह काही व्यवसायांवर त्याचे प्रतिकूल परिणाम जाणवत आहेत. चीनमध्ये कोरोना विषाणूची ही स्थिती आणखी काही आठवडे तशीच राहिली तर भारतात औषधांच्या तुटवड्यासह त्याच्या किमतीही वाढू शकतात, असा निष्कर्ष फेडरेशन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज (फिक्की) यांनी आपल्या पाहणी अहवालात काढला आहे. 

‘फिक्की’च्या पाहणी अहवालात भारतातील सध्या उपलब्ध कच्च्या मालाची स्थिती पाहता फेब्रुवारीअखेरपर्यंत तो पुरेल, अशी स्थिती असली तरी मार्चच्या उत्तरार्धात मात्र ही स्थिती चिंताजनक वळणावर जाईल. औषधांचा तुटवडा निर्माण होऊन दरही वाढू शकतात तसेच एप्रिलपासून स्मार्ट फोनची चणचणही भासू लागेल, असे स्पष्ट केले आहे.

भारतामध्ये औषध व्यवसायात लागणार्‍या मूलद्रव्यांपैकी (अ‍ॅक्टिव्ह इनग्रेडियंटस्-एपी) 70 टक्के मूलद्रव्ये चीनकडून आयात केली जातात. तर पेनिसिलीन समूहाच्या मूलद्रव्यांसाठी भारत चीनवर 90 टक्के अवलंबून आहे. पॅरॅसिटामॉल, आयबुप्रूफेल, काही प्रतिजैविके आणि मधुमेहावरील औषधांसाठी अ‍ॅक्टिव्ह इनग्रेडियंटस्चा मोठ्या प्रमाणात वापरतात. या मूलद्रव्यांची आयात महिनाभर थंडावली आहे. भारतीय उद्योगात सर्वसाधारणपणे दोन महिने पुरेल इतका साठा करण्याची पद्धत आहे. चीनमध्ये विषाणूचा वाढता फैलाव, तेथे निर्माण झालेली एकूण चिंताजनक स्थिती पाहता आता भारतीय औषध उद्योगातील साठा काही दिवसांपुरता शिल्लक राहिला आहे. याविषयी सध्या केंद्रीय पातळीवर दोन मतप्रवाह आहेत. केंद्र सरकारकडून एप्रिल अखेरपर्यंत चिंता करण्याची स्थिती नाही, असा निर्वाळा देण्यात येत असला तरी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मार्चमध्येच टंचाईसदृश स्थिती लक्षात घेऊन ही मूलद्रव्ये उपलब्ध करण्यासाठी नवा कृती आराखडा तयार करण्यास सुरुवात केली आहे. तर ‘फिक्की’ने मात्र फेब्रुवारीनंतर ही स्थिती चिंताजनक असेल, असे स्पष्ट केले आहे.

स्मार्ट फोन, सोलर पॅनेल्स उद्योगांत अडचणी...

औषध उद्योगाबरोबर भारतातील दूरसंचार क्षेत्राचे चीनवर मोठे अवलंबित्व आहे. स्मार्ट फोनच्या सुट्या भागांपैकी (बॅटरी, डिस्प्ले पॅनल, कॅमेरा, प्रिंटेड सर्किट बोर्डस्) 85 टक्के सुटे भाग म्हणजे महिन्याला 7 ते 8 हजार कोटी रुपयांचा माल चीनमधून आयात केला जातो. या उद्योगात आणखी दोन ते तीन आठवडे पुरेल इतका कच्चा माल उपलब्ध आहे. चीनमधील स्थिती सुधारली नाही तर नव्या आर्थिक वर्षाच्या प्रारंभाला भारतात स्मार्ट फोन्सची चणचण जाणवू शकते. याखेरीज सोलर मशिनसाठी चीनमधून मोठ्या प्रमाणात सोलर पॅनल्स आयात केली जातात. काही केमिकल इंडस्ट्रीजना लागणारी रसायनांची आयातही चीनकडून होते. हा सर्व उद्योग सध्या अडचणीच्या तोंडावर आहे, असे ‘फिक्की’चे म्हणणे आहे.