Mon, Jul 22, 2019 00:44होमपेज › Kolhapur › साहेब....आमचा प्रभाग कुठला हो..?

साहेब....आमचा प्रभाग कुठला हो..?

Published On: Dec 14 2017 2:18AM | Last Updated: Dec 13 2017 11:46PM

बुकमार्क करा

आजरा : प्रतिनिधी 

आजरा ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रूपांतर झाल्यानंतर 8 डिसेंबर रोजी प्रभागरचना व प्रभागनिहाय आरक्षण सोडत पार पडली. सदर प्रभागरचना ही गुगलद्वारे निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या निकषाप्रमाणे केली असल्याचा दावा संबंधित अधिकार्‍यांकडून केला जात असला तरी प्रभागनिहाय गल्लीवार रचना या प्रभागरचनेच्या पार्श्‍वभूमीवर लावण्यात आलेल्या गुगल मॅपवरील नकाशा वरून सर्व सामान्यांना सहजासहजी समजत नसल्याने साहेब आमचा प्रभाग कुठला हो, असा प्रश्‍न आजरा शहरवासीयांकडून विचारला जात असल्याचे चित्र ठळकपणे दिसत आहे. गेले दोन दिवस या प्रश्‍नाचे उत्तर शहरवासीयांना न मिळाल्याने प्रभागरचनेबाबत संभ्रमावस्था कायम आहे. 

8 डिसेंबर रोजी उपविभागीय अधिकारी डॉ. संपत खिलारी यांच्या अध्यक्षतेखाली प्रभागरचना व आरक्षण सोडत पार पडली. त्यावर प्राथमिक स्वरूपात दिनांक 11 रोजी जिल्हाधिकार्‍यांनी शिक्‍कामोर्तब केले आहे. ही प्रभागरचना जाहीर करताना गुगल मॅपचा आधार घेण्यात आला असल्याचे सांगितले जाते. प्रभागवार चतुःसीमा ही आरक्षण सोडतीवेळी सांगण्यात आल्या. प्रत्यक्षात मात्र हे प्रभाग अगदी काटकोनात नसून दोन कोपर्‍यांच्या मध्ये कमी जास्त फरक स्पष्टपणे दिसत आहे. त्यामुळे केवळ चतुःसीमावरून प्रभाग समजून घेणे अडचणीचे ठरत आहे.

प्रभागरचनेबाबत व आरक्षण सोडतीबाबत हरकती घेण्याकरिता 18 डिसेंबरपर्यंतचा कालावधी देण्यात आला आहे. वास्तविक गुगल मॅपबरोबरच किमान त्यामध्ये अंतरभूत होणार्‍या गल्ल्या, वस्त्या यांची स्पष्ट यादी पाहण्याकरिता उपलब्ध करून देणे आवश्यक होते. पण गेले चार दिवस तशी यादी शहरवासीयांना कोठेच पाहावयास मिळालेली नाही. नकाशावरून तुमचा तुम्ही प्रभाग समजून घ्या, असे ठराविक पठडीतील उत्तर नगरपंचायत कर्मचार्‍यांकडून शहरवासीयांना मिळत आहे. शहरवासीयांचे प्रभाग रचनेबाबतचे अनेक प्रश्‍न सध्या तरी अनुत्तरीत दिसत आहेत. 

काहींनी थेट लेखी मागणी करून प्रभागवार माहिती मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. कागदोपत्री हरकत घेण्याची अंतिम तारीख 18 डिसेंबर असली तरीही अद्याप लेखी स्वरूपातील सविस्तर प्रभागरचना उपलब्ध न होऊ शकल्याने हरकतीदारांनाही अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. शहरवासीयांच्या प्रतिक्रिया पाहता सदर प्रभागरचनेबाबत मोठ्या प्रमाणावर हरकती दाखल होण्याची शक्यता आहे. त्याद‍ृष्टीने काही संबंधित मंडळींनी हालचालीही सुरू केल्या आहेत.  

या सर्व प्रकारात नगरपंचायत निवडणुकीला सामोरे जाणार्‍या संभाव्य इच्छुकांची मोठी अडचण होत आहे. गेली वर्षभर इच्छुकांनी प्रभागवार मशागत व पेरणीही केली आहे. प्रत्यक्षात मात्र एकतर या प्रभागात इच्छुकांचे मतदानच नाही तर प्रभागावर आरक्षणाचे संकटही ओढवले आहे. त्यामुळे अनेकांनी निवडणुकीपर्यंत तयार झालेल्या नवीन प्रभागामध्ये नव्याने पेरणी करण्यास सुरुवात केली आहे.