Fri, Jul 19, 2019 20:13होमपेज › Kolhapur › जलसंधारणाची कामे न करणारे ठेकेदार ब्लॅक लिस्टमध्ये

जलसंधारणाची कामे न करणारे ठेकेदार ब्लॅक लिस्टमध्ये

Published On: Jun 29 2018 12:55AM | Last Updated: Jun 28 2018 11:47PMकोल्हापूर : प्रतिनिधी 

निविदा भरूनही कृषी विभागाकडील जलसंधारणाची कामे न केलेल्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्यात आले आहे. कृषी विभागाच्या पत्रानंतर जिल्हा उपनिबंधक अरुण काकडे यांनी संबंधित ठेकदारांना तशा नोटिसा पाठवल्या आहेत. जलसंधारणच्या कामे करण्यास ठेकेदारांचा नकार या मथळ्याखाली ‘पुढारी’मध्ये वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्या वृत्ताची दखल घेऊन कृषी विभागाने ही कारवाई केली. 

जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जलसंधारणाची कामे हाती घेण्यात आली होती. जिल्हा नियोजन समितीतून या कामासाठी कोट्यावधी रूपयांचा निधी दिला होता. 30 मेपूर्वी ही कामे पूर्ण होणे अपेक्षित होते. तथापि, निविदा भरलेल्या ठेकेदारांनी मंजुरी मिळूनही या कामाकडे पाठ फिरवली. परिणामी, कोट्यवधी रुपयांचा या कामासाठीचा निधी तसाच पडून राहिला.  शासनाचे या कामाचे दर परवडत नसल्याचे कारण सांगून ठेकेदारांनी ही कामे केलेली नाहीत. दुसरीकडे यापैकी बहुंताश कामाच्या वर्कऑर्डर 27 मे रोजी दिल्या गेल्या. तीन दिवसांत कमे कशी करायची हाही प्रश्‍न ठेकेदारांसमोर होता. त्यामुळेही या ठेकेदारांनी ही कामेच केलेली नाहीत. कृषी विभागाने अशी कामे न केलेल्या ठेकेदारांची यादी आज जिल्हा उपनिबंधकांकडे पाठवली. या यादीच्या आधारे संबंधित ठेकेदारांना काळ्या यादीत टाकल्याची नोटीस काकडे यांनी बजावली आहे. 

निविदेत माती नाला असा उल्लेख आहे, पण प्रत्यक्षात ज्या गावांत काम करायचे तेथील ग्रामस्थांना मात्र सिमेंट नाला असल्याचे सांगितले आहे, यामुळेही ठेकेदारांनी या कामाकडे पाठ फिरवल्याचे एका ठेकेदाराने सांगितले.