होमपेज › Kolhapur › बसस्थानक स्वच्छतेचा राज्यपातळीवर ठेका

बसस्थानक स्वच्छतेचा राज्यपातळीवर ठेका

Published On: Jan 06 2018 1:22AM | Last Updated: Jan 05 2018 11:45PM

बुकमार्क करा
कागल : प्रतिनिधी

राज्यातील बसस्थानकांची साफसफाई आता स्थानिक ठेकेदारांऐवजी पहिल्यांदाच थेट राज्यपातळीवरून निश्‍चित करण्यात आलेल्या ठेकेदारांमार्फत करण्यात येणार आहे. कराराप्रमाणे बसस्थानकाचा कोपरान्कोपरा देखील चकाचक होणार आहे. 

गेल्या डिसेंबर महिन्यापासून याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. लहान-मोठ्या बसस्थानकानुसार शिफ्टनुसारही साफसफाई करण्यात येणार आहे. साफसफाई करण्याकरिता अत्याधुनिक मशीनरींचा वापर केला जाणार आहे. त्यामुळे नजीकच्या काळात सर्व बसस्थानके चकाचक दिसणार आहेत. काही दिवसांपूर्वी प्रायोगिक तत्त्वावर एजन्सीमार्फत मोजक्या बसस्थानकांची स्वच्छता करण्यात आली होती. त्यानंतर आता राज्यभर स्वच्छतेचा ठेका देण्यात आला आहे. 

गेल्या 7 डिसेंबरपासून या नव्या निर्णयाची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. कराराप्रमाणे स्वच्छतेसाठी अत्याधुनिक मशीनरी, उपकरणे तसेच आवश्यक असलेले केमिकल वापरून दोन, तीन शिफ्टनुसार केली जाणार आहे. बस स्थानकामध्ये कोणत्याही ठिकाणी कचरा किंवा धूळ देखील राहणार नाही, याची काळजी घेतली जाणार आहे. बसस्थानकावरील शौचालये, मुतारी यांची देखील स्वच्छता केली जाणार आहे.

बहुतांशी बसस्थानकांमध्ये कचरा मोठ्या प्रमाणात साठत असतो. इमारतीच्या आजूबाजूला मागे कचर्‍यांचे ढीग लागले आहेत. कँटिनचे सांडपाणी साचून दुर्गंधी सुटलेली असते. शौचालये आणि मुतार्‍यांची स्वच्छता वेळेवर होत नसल्यामुळे प्रवाशांना दुर्गंधीला सामोरे जावे लागते. सकाळी स्वच्छता केल्यानंतर दुसर्‍या दिवशीच स्वच्छता केली जाते. त्यामुळे सायंकाळी कचरा पडलेला दिसून येतो. 

नवीन करारानुसार स्वच्छतेचा दर हा स्क्‍वेअर फुटानुसार ठरविण्यात आल्याचे सांगण्यात येते. पूर्वी तालुका पातळीवरील बसस्थानकाच्या स्वच्छतेसाठी महिन्याला अंदाजे सात ते आठ हजार रुपये खर्च येत असे, तशा पद्धतीचा ठेका दिला जात असे. आता या खर्चाचा आकडा चांगलाच असण्याची शक्यता व्यक्‍त केली जात आहे. दरम्यान, शिवशाही बस सुरू झाल्या. त्याचबरोबर खासगी बस वाहतूक सुरू करण्यात आली. आता स्वच्छतेचा ठेका देखील देण्यात आला.