Thu, Apr 25, 2019 23:29होमपेज › Kolhapur › ‘प्राधिकरणा’त अडकले बांधकाम परवाने

‘प्राधिकरणा’त अडकले बांधकाम परवाने

Published On: Dec 16 2017 2:06AM | Last Updated: Dec 16 2017 1:38AM

बुकमार्क करा

कोल्हापूर : अनिल देशमुख

नव्याने स्थापन झालेल्या कोल्हापूर नागरी विकास प्राधिकरणात बांधकामे परवाने अडकले आहेत. प्राधिकरण स्थापन झाल्याने शहरालगताच्या गावांत नवीन बांधकामे परवाने स्थगित करण्यात आले आहेत. नव्याने बांधकाम परवान्याचे येणारे प्रस्ताव स्वीकारण्याचेही बंद करण्यात आले आहे. याचा मोठा फटका नागरिकांना बसत आहे.

कोल्हापूर महापालिकेची हद्दवाढ करावी, अशी मागणी होती. त्याला हद्दवाढीत समावेश केल्या जाणार्‍या प्रस्तावित गावांचा विरोध होता. यामुळे राज्य शासनाने महापालिकेसह शहरालगतच्या 42 गावांचा समावेश असलेल्या कोल्हापूर नागरी विकास प्राधिकरणाची स्थापना केली. दि.15 ऑगस्ट रोजी राज्य शासनाने या प्राधिकरणाची घोषणा केली. त्याबाबतचे राजपत्रपही प्रसिद्ध करण्यात आले. ‘ड’ वर्ग महापालिकेसाठी प्रथमच प्राधिकरणाची स्थापना झाल्याने त्याच्या कामाचे स्वरूप, नियमावली, कर्मचारी वर्गवारी, आकृतीबंध आदी सर्वच बाबी नव्याने केल्या जाणार असल्याने प्राधिकरण स्थापन होऊन चार महिने झाले तरी त्याचे काम अद्याप सुरू झालेले नाही.

प्राधिकरणाचे काम सुरू झाले नसले तरी प्रशासनाने प्राधिकरण स्थापन झाल्याने ग्रामीण भागात देण्यात येणारे बांधकाम परवाने स्थगित केले आहेत. प्राधिकरणात समावेश असलेल्या गावांतील बांधकामासाठी नव्याने येणारे प्रस्तावही स्वीकारण्याचे बंद केले आहे. प्राधिकरणाची स्थापना झाली आहे, यामुळे स्थापनेपासून पुढील तारखेचे परवाने द्यायचे कसे? असा प्रश्‍न नगररचना, प्रांत कार्यालयातील यंत्रणसमोर निर्माण झाला आहे. याबाबत परवाने द्यावेत की नाही, याबाबत करवीर प्रांत कार्यालयाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मार्गदर्शन मागवले आहे.

गेल्या महिन्याभरापासून बांधकाम परवाने बंद झाले आहेत, त्याचा फटका नागरिकांना बसत आहे. अनेकांचे बांधकाम परवान्याचे प्रस्ताव प्रलंबित आहेत. बांधकाम परवाने नसल्याने कर्जाचा मार्गही अवघड झाला आहे. यापूर्वी सादर केलेल्या बांधकाम परवान्यातील त्रुटींची पूर्तताही पूर्ण करून घेतली जात नाही. यामुळे नागरिकांचे हाल सुरू आहेत. महिन्याभरापासून बांधकाम परवानेच मिळत नसल्याने नागरिकांत साशंकतेचे वातावरण आहे. याबाबत तातडीने निर्णय घेऊन प्राधिकरणाचे काम सुरू होईपर्यंत बांधकामे परवाने पूर्वीप्रमाणेच देण्यात यावे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

परवान्यांबाबत मार्गदर्शन मागवले आहे : इथापे

प्राधिकरण स्थापन झाल्यानंतरही बांधकाम परवाने कसे द्यायचे, असा सवाल उपस्थित झाला आहे. यानंतर बांधकाम परवाने देण्याचे तसेच नव्याने प्रस्ताव देण्याचे सध्या बंद आहे. परवाने देण्याबाबत वरिष्ठांकडे मार्गदर्शन मागवले आहे. त्याबाबत जो निर्णय होईल, त्यानुसार कार्यवाही केली जाईल, असे करवीरचे प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी सांगितले.