होमपेज › Kolhapur › बांधकाम तंत्रज्ञान सुपरफास्ट!

बांधकाम तंत्रज्ञान सुपरफास्ट!

Published On: Jan 16 2018 2:10AM | Last Updated: Jan 15 2018 11:04PM

बुकमार्क करा
कोल्हापूर : विजय पाटील 

‘घर पहावं बांधून,’ असं पूर्वी म्हटलं जात होतं. याचं कारण घर बांधणं म्हणजे दिव्यच असायचं. कारण, घर बांधणीसाठी लागणार्‍या प्रत्येक गोष्टीला वेळ लागायचा. कुशल मनुष्यबळ शोधावे लागायचे; पण आता गरजेतून म्हणा किंवा स्पर्धेतून, बांधकाम क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. याचा परिणाम गगनचुंबी इमारतीसुद्धा गतीने पूर्ण होत आहेत. घर असू दे किंवा व्यावसायिक कामासाठीची इमारत. बांधकाम ही गोष्ट वेळखाऊ आणि मेहनतीची आहे; पण आता नवनव्या तंत्रांमुळे कमी वेळेत बांधकाम साकारले जात आहे. तसेच मानवी मेहनतही कमी झाली आहे. यामुळे बांधकाम क्षेत्र वेगाने विस्तारत आहे. याचा फायदा सर्वच घटकांना होत आहे. 

विटा बदलल्या... गती वाढली
लाल मातीच्या विटा म्हणजेच बांधकाम हे पूर्वांपार समीकरण आता कमी झालं आहे. कारण, लाल मातीच्या विटांचा पुरवठा कमी होऊ लागल्याने त्याला पर्याय म्हणून सिमेंटच्या ब्लॉक (एएसी) विटांचा वापर सुरू झाला आहे. या विटा वजनाने अत्यंत हलक्या आहेतच, त्यापेक्षा त्यांना गिलावाही करण्याची गरज उरत नाही. तसेच त्यांचा आकार तुलनेने मोठा आणि सलग असल्याने अत्यंत कमी वेळेत बांधकाम पूर्ण केले जाते. या एका विटेच्या रचनेवरच भिंत उभी राहते.

स्लॅब म्हणजे लगीनघाई 
एखाद्या इमारतीचा स्लॅब म्हणजे लगीनघाईसारखा प्रकार दिसायचा. स्लॅबसाठी खूप आधीपासून पूर्वतयारी करावी लागे. महिनोन्महिने ही तयारी केली जात असे; पण आता रेडिमिक्स काँक्रीटमुळे ही धावपळ कमी झाली आहे. कारण, तयार काँक्रीटचा सहजपणे स्लॅब पसरला जातो. त्यामुळे यातील वेळ आता निम्म्यावर आला आहे.

स्मार्ट चौकटी, खिडक्या
बांधकामात चौकटी आणि खिडक्या  लाकडीच पाहिजेत, हे समीकरण आता संपुष्टात आले आहे. कारण, यासाठी बाजारात खूप पर्याय उपलब्ध झाले आहेत.  सिमेंटचा कलात्मक पर्याय आहे. यासह प्लायवूड आहे. लोखंडी आणि  अ‍ॅल्युमिनियमबरोबरच आता यूपीव्हीसी हा नवीन पर्याय उपलब्ध झाला आहे. 

गरजेतून तंत्रज्ञान
अनेकवेळा लाल मातीच्या विटांचा पुरवठा कमी होतो. यामुळे बांधकामे ठप्प झाली आहेत. या गरजेतूनच नवनव्या विटांचा पर्याय सुरू झाला. वाळूबाबतही आता नवनवे पर्याय वापरले जात आहेत. पारंपरिक बांधकामांचे स्वरूप नवे तंत्रज्ञान घेऊ लागले आहे. बांधकाम क्षेत्राच्या दृष्टीने ही आधुनिक पहाट मानायला हरकत नाही.

टिकाऊपणासाठी केमिकलचा वापर वाढला
नवनव्या तंत्रांमुळे दर्जाबाबत हयगय होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याला पर्याय म्हणून आता बांधकाम घट्ट आणि मजबूत व्हावे, यासाठी त्यामध्ये केमिकलचा वापर वाढू लागला आहे.

सेंट्रिंगमधील रिस्क कमी
सेंट्रिंगचे काम हे खूप उंचीवर करताना मोठी रिस्क असे. कारण, यापूर्वी अशा कामात खूप अपघात झाले आहेत; पण आता सेंट्रिंगच्या कामासाठी पूर्वीची बांबू लावून मजले करण्याची पद्धत संपली आहे. त्याऐवजी लोखंडी अडक असलेले साहित्य आले आहे. तसेच लिफ्ट आणि सरकत्या जिन्यांचा वापरही यासाठी सुरू झाला आहे. मोठ्या बांधकामांना क्रेन वापरली जाते. यामुळे या कामातील रिस्क कमी झाली आहे.

ग्रीन बिल्डिंग, ग्रीन हाऊस
पर्यावरणाबाबत आता सगळीकडेच जागृती होऊ लागली आहे. शाळेत जाणारी लहान मुले तर पर्यावरणाबाबत आपल्या आई-वडिलांना उपदेश करत असल्याचे चांगले दृश्य घराघरांत दिसू लागले आहे. याचा परिणाम बांधकाम क्षेत्रात ग्रीन हाऊस, ग्रीन बिल्डिंग अशा संकल्पना मूळ धरू लागल्या आहेत. भरपूर प्रकाश, वृक्षारोपण, सांडपाण्याचा पुनर्वापर,  कचरा प्रक्रिया आदींचा यामध्ये समावेश दिसत आहे. कोल्हापूरच्या बांधकाम क्षेत्रात हे चित्र समाधानकारक आहे.

वाळूला पर्याय 
मागील वर्षभरापासून वाळू नसल्याने बांधकामे थांबली होती; पण आता क्रशसँड (आर्टिफिशियल वाळू) चा वापर सुरू झाला आहे. त्यामुळे नदीपात्रातील वाळूवर अवलंबून राहण्याचे दिवस संपले आहेत. क्रशसँड सहज उपलब्ध होत असून, त्यासाठी थांबावे लागत नाही. तसेच नदीपात्रातील वाळूचा दर्जा कमी-जास्त होत असे. त्यामुळे ही वाळू चाळावी लागे. तसेच वाळू सुकवावी लागे; पण क्रशसँडला या गोष्टींसाठी वेळ घालवावा लागत नाही.