Wed, Jun 26, 2019 23:57होमपेज › Kolhapur › ‘संविधान दूत’ रुजवणार लोकशाहीची मूल्ये

‘संविधान दूत’ रुजवणार लोकशाहीची मूल्ये

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

शिवाजी विद्यापीठ डॉ.  बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्रातर्फे संविधानदिनानिमित्त (दि. 26) ‘संविधान दूत’ ही अभिनव योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. याच्या माध्यमातून संविधान दूत लोकशाहीतील संविधानिक मूल्यांचा प्रचार व प्रसार करण्याचे महत्त्वाचे कार्य करणार आहेत.

देशाचे भावी नागरिक सक्षम व प्रगल्भ होऊन स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय व धर्मनिरपेक्षता या मानवी मूल्यांची रुजवात व्हावी, भारतीय संविधानाबद्दल जागृतीच्या द‍ृष्टीने विद्यापीठ कार्यक्षेत्रात विशेष योजना राबविण्याचे डॉ. आंबेडकर केंद्राने ठरविले. त्यानुसार संविधान दूत योजना हाती घेण्यात आली आहे. भारतीय संविधानाबद्दल विद्यार्थी व शिक्षकांत जागृती निर्माण करणे ही प्रकल्पाची प्रमुख उद्दिष्टे आहेत.

डॉ. आंबेडकर केंद्रातर्फे राबविण्यात येणार्‍या समाजोपयोगी उपक्रमांची माहिती समाजातील विविध घटकांपर्यंत पोहोचविण्यासाठी महाविद्यालयीन प्रतिनिधी म्हणून संविधान दूत कार्य करतील. डॉ. आंबेडकर केंद्र व संलग्‍नित महाविद्यालये एकत्रितपणे व्याख्याने, चर्चासत्रे, कार्यशाळा, प्रशिक्षण वर्ग आदी जागृतीपर कार्यक्रम घेतील.   संयुक्‍त संशोधन कार्यही हाती घेण्यात येणार असून, यात शिक्षक, विद्यार्थी यांच्यासह समाजघटकांनाही सामावून घेतले जाणार आहे, अशी माहिती संशोधन व विकास केंद्राचे संचालक डॉ. एस. एस. महाजन यांनी दिली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्राने हाती घेतलेला ‘संविधान दूत’ हा उपक्रम महत्त्वाचा आहे. या माध्यमातून भारतीय संविधानाविषयी विद्यापीठ परिक्षेत्रात जागृती करण्यात येणार असून, संविधानिक मूल्ये व मूलभूत मानवी मूल्यांबाबत विद्यार्थी, नागरिकांना माहिती करून देण्यात येणार आहे.